Kaalay tasme nam - 7 books and stories free download online pdf in Marathi

कालाय तस्मै नमः - 7

कालाय_तस्मै_नमः| भाग ७


भूतकाळात फेरफटका

अरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात घरातील सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?”


श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. आणि जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील मी नक्की येईन. ह्या घराला, तुम्हाला माझी गरज असताना मी तुमच्या सोबत असेन. आणि मलाही ह्या घरात तिच्या बाबतीत जे झाले सतत तेच तेच आठवून गुदमरून गेल्या सारखे होते. त्यामुळे तू मला परवानगी दे.”


माईंनाही मनातून त्याचे बोलणे पटले, पण आईचं काळीज होतं ते. त्यात श्रीपाद त्यांची दुधावरची साय म्हणजे कैवल्यलाही घेऊन जाणार म्हटल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. श्रीपादने जवळ घेत माईंना पोटभर रडू दिले.

गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. भास्कर संगीताही श्रीपाद जाणार म्हटल्यावर थोडेसे धास्तावले. इतके दिवस तशी जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, पण आता मात्र त्यांना सगळं बघावं लागणार होते. श्रीपादने त्यांनाही समजावले. जिथे जाणार आहे तिथला पत्ता आणि नंबर कळवेन काहीही गरज पडली तर कुठल्याही क्षणी तू मला कळवु शकतोस हेही सांगितले.सगळ्या मुली काही दिवस राहून सासरी परत गेल्या होत्या. लाडक्या वहिनीच्या जाण्याने त्यांनाही घर सुने वाटत होते. श्रीधर मंदा आता परत जाणार होते. अशोक , विजयने त्यांना स्वतःकडे येण्याची गळ घातल्याने तिकडे जाऊन मग ते तसेच जाणार होते.


श्रीपाद एकेक कामं हातावेगळी करत होता. भास्करला सगळ्या गोष्टी सांगत होता. श्रीपादने नाही म्हटलं तरी माई काका , कैवल्य आणि भास्करच्या कुटुंबाचा विचार करून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. भास्करला मदतीची गरज पडेल आणि ती त्याला कुणाकडेही मागावी लागू नये ह्याची काळजी घेण्याची कल्पना अरुंधतीची होती. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे श्रीपादने काही गुंतवणूक केली होती. इतरांकडून त्यांना तशी फारशी अपेक्षाही नव्हती. भास्करला मात्र जबाबदारी बघूनच दडपण आले. “दादा, मला नाही जमणार रे हे सगळे. तूच बघ ना,” तो श्रीपादला म्हणू लागला. तसा श्रीपाद म्हणाला, “असं करून नाही चालणार भास्कर. माझ्या वाटणीच्या गोष्टी मी करणारच आहे. पण तू इथे आहेस म्हणजे अडीअडचणीच्या वेळी तुला हे सगळं माहिती हवं. संगीताला सगळं माहिती आहे तिची मदत घे. ती अरुंधतीचीच बहीण आहे तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत ती तुझ्यासोबत खंबीरपणे उभी असेल.” सगळी कागदपत्रे त्याच्या हातात सोपवत श्रीपादने समजावले.श्रीपाद आणि कैवल्यच्या निघण्याचा दिवस आला. मनाला समजावत माई सगळी तयारी करत होत्या. काही दिवस अरुंधतीचे आईबाबा त्या दोघांसोबत राहणार होते. ते दोघे नेमके कुठे जाणार आहेत हे कुणालाही सांगितले नव्हते. सगळी व्यवस्था झाली की काय ते कळवतो असे श्रीपादने सांगितले होते. काकांनीही फारसे काही न विचारता होकार दिला होता पण तरीही त्यांना ते पचवणे अवघडच जात होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने श्रीपाद, कैवल्य आणि अरुंधतीचे आईबाबा निघाले. गेल्या काही दिवसांत कैवल्यच्या वागण्यात खूप बदल झाले होते. तीन-चार वर्षांचे ते लेकरू अचानक खूप समंजस झाले होते. अरुंधतीच्या आजारपणाच्या काळात त्याला तिच्यापासून दूर ठेवलं जात असल्याने कदाचित आता आपल्याला आई शिवायच रहावे लागणार ही नोंद त्याच्या बालमनाने घेतली होती. त्यामुळे बाबांनी जायचं म्हटल्यावर त्याने चुपचाप मान डोलावली होती.


श्रीपादलाही आईविना लेकरू म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतीची सवय त्याला होऊ द्यायची नव्हती. ते त्याच्या आईला अरुंधतीलाही आवडले नसते. म्हणूनच तो दूर निघाला होता. येणारा नवीन प्रवास बरेच काही नवीन घेऊन स्वागतासाठी तयार होता.


इकडे काका आणि भास्कर घरी आले होते. घरी आल्यावर मोकळे मोकळे घर बघून काकांना कसेतरी झाले पण आता ह्याची सवय करून घ्यावीच लागणार होती. संगीता आणि भास्कर समीरच्या साथीने आता माई काकांना सांभाळण्यासाठी तयार झाले होते.


दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षांमागून वर्षे जात होती. प्रत्येक सणावाराच्या दिवशी माईकाकांना दिवसभर श्रीपाद येईल असे वाटत असे पण तसे काही घडत नसे. शेवटी त्यांनी आता आशाच सोडून दिली होती. मधल्या दिवसांमध्ये घरात आणखी 'नातू' आले होते. पण ‘ती’ च्या येण्याची चाहूल कुठेच नव्हती. शब्द दिल्याप्रमाणे दरवर्षी काका सगळ्यांना घेऊन कुलदैवताला जात होते. चार वर्षे लोटली होती आणि मग संगीताने ती बातमी दिली.संगीताची परिस्थिती नाजूकच होती. त्यामुळे तिला माहेरी न पाठवता तिच्या आईलाच माईंनी बोलावून घेतले होते. पूर्ण नऊ महिने त्या येऊन जाऊन राहत होत्या.


संगीताला डोहाळेही विचित्रच लागत होते. पण तिच्या आईला मात्र कुठेतरी ह्या सगळ्यामुळे अरुंधतीची आठवण येत होती. कारण अरुंधतीच्या जन्मावेळी तिच्या आईला म्हणजेच संगीताच्या मावशीला असेच डोहाळे होते. घरात सतत पूजा व्हावी जपजाप्य सुरू असावे, सतत मंत्रोच्चार कानावर पडत राहावेत असे तिला वाटत होते. तिने तसे बोलून दाखवताच काकांनीही यथाशक्ती सगळ्या गोष्टी करणे सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय संगीताचा त्रास हळूहळू कमी झाला. तिची प्रकृतीही स्थिर झाली. आणि घराला मिळालेला तो शाप दूर होण्याची आशा काकांच्या मनात निर्माण झाली.


हे सगळं बघून त्या दोन व्यक्तींनी मात्र पुन्हा आपली तयारी सुरू केली होती. पण ह्यावेळी त्यांना प्रत्येक केलेल्या वाराचे प्रत्युत्तर लगेच मिळणार आहे ह्याची कल्पना नव्हती.


काका आणि माईंची पुर्वपुण्याई अन् अरुंधतीने दिलेल्या बलिदानाचे फळ म्हणून ‘स्वरा’ सुखरूप जन्माला आली होती. तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी काकांना भेटण्यासाठी बोलावले. डॉक्टर ओळखीचेच असल्याने काकांना समजले काहीतरी वेगळं आहे.


काका आत गेले तसे डॉक्टर म्हणाले, “काका, मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप वर्षांपासून ओळखतो. पण आजचा अनुभव खूप वेगळा होता. नऊ महिने जिथे मला संगीता सुखरूप राहील का नाही ह्याची खात्री नव्हती तिथे सगळं नीट पार पडणं हा चमत्कार होता. त्यात आज आम्ही ऑपरेशनची तयारी ठेवली होती. कारण कुठल्याही प्रकारचा धोका नको होता. पण आतमध्ये जाताच एक वेगळं वातावरण मी अनुभवलं. संगीताच्या आसपास कुणीतरी वावरत आहे असं मला जाणवलं. आश्चर्य म्हणजे इतर कुणालाही हे जाणवलं नाही. ते जे काही होतं ते खूप आश्वासक होतं. जणूकाही धीर देत आहे. सगळं नीट होईल घाई करू नका असे शब्द ही मला ऐकू आले. मला वाटलं मला भास झाला पण संगीताने मला नंतर सांगितले की डॉक्टर तो भास नव्हता ती माझी ताई होती. माझी आणि बाळाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून ती सतत माझ्या उशाशी बसून होती. ताई म्हणजे अरुंधतीच न काका?” काकांनी डोळ्यातले पाणी टिपत होकारार्थी मान डोलावली.


डॉक्टर पुढे म्हणाले, “खरे तर मी फारसा देवावर विश्वास नाही ठेवत, पण गेले काही महिने मी जे अनुभवले त्यावरून माझा त्या सकारात्मक शक्तीवर मात्र पूर्ण विश्वास बसत आहे. बाळ आणि बाळाची आई अगदी ठणठणीत आहेत.” काका त्यांचे आभार मानून बाहेर आले.


संगीताला ज्या खोलीत ठेवले होते तिथे आले. समीर कुतूहलाने ते छोटंसं गाठोडं बघत होता. तुझी बहीण आहे असं सांगताच त्याला खूप आनंद झाला. माईंनी बाळाला काकांच्या हातात दिले. तिचे डोळे हुबेहूब अरुंधतीसारखे होते. प्रेमळ दुसऱ्याला आश्वस्त करणारे. काकांकडे बघत बाळाने हळूच डोळे मिचकावले. जणूकाही ते सांगत होतं आता मी आले आहे न आता सगळे नीट होईल. काकाही हळूच हसले.


आणि आजचा दिवस होता बारश्याचा. स्वराने तिच्या काकाला श्रीपादला घरी येण्यासाठी भाग पाडले होते. सोबत कैवल्य ही आला होता.


काका भूतकाळातून बाहेर आले. पहाट झाली होती. दूरवरून मंदिरातली काकडआरती ऐकू येत होती. सगळे घर तसे अजूनही झोपेच्या आधीनच होते.


काका मात्र जागे झाले. आन्हिके उरकून त्यांनी देवपूजा आणि पादुकांची पूजा केली. एकीकडे तोंडाने रोजची स्तोत्रे म्हणणे सुरू होते. पण आज अचानकच त्यांना संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावेसे वाटले त्यांनी खड्या आवाजात सुरू केले,


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।

भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥१॥


पहिल्या दोन ओळी म्हणत असतानाच अजून कुणीतरी आपल्या सोबत म्हणत आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. मागे वळून बघताच त्यांना समजलं, दुसरं कोण असणार - कैवल्य होता तो. गालातल्या गालात हसत काकांनी स्तोत्र तसेच सुरू ठेवले.


प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥


लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥


नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥


द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥५॥


विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥


जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥


अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥


॥इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥


‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत देवाला नमस्कार करून ते कैवल्य जवळ आले. एवढासा तो पण अंघोळ उरकून तिथे येऊन बसला होता. काकांनी विचारले, “इतक्या लवकर का उठलास?”


“मला जाग आली आजोबा. मग तुम्ही उठला आहात हे कळले बाबांनी अंघोळीची तयारी केली होती मग काय मी आवरले आणि येऊन बसलो. तुम्ही स्तोत्र म्हणू लागलात मलाही वाटलं म्हणावं मग मी ही सुरू केले. बरोबर म्हटलं ना मी?”

“अगदी बरोबर. कुणी शिकवलं तुला?”

“आईने.”


काका क्षणभर गोंधळले. “आईने?”


“हो. ती कधी कधी माझ्या स्वप्नात येते. खूप बोलते माझ्याशी. हे तिनेच शिकवलं मला.” तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या श्रीपादने त्याला हाक मारली आणि माई उठली आहे तिच्याकडे जा अस सांगितलं.


तो काकांकडे वळून पाहत म्हणाला, “ती भेटते त्याला स्वप्नात की काय मला नाही माहित, पण सगळ्या चांगल्या गोष्टी त्याला देऊन जाते. आता कदाचित नाही भेटणार. होईल त्याला सवय.” इतकंच बोलून तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत काका तिथेच थांबले. मग वळून पादुकांकडे बघितलं आणि हात जोडून म्हणाले, “सगळं काही तूच सांभाळ आता.....”


समोरून कितीही साधं सरळ वाटलं तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असते. निराशेचे क्षण येतात, मन उदास होते, सगळं नकोसं वाटतं. अशा वेळी आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर सगळं सोपवून मोकळं व्हावं. मनापासून त्याला साद घालत योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करावी. मार्ग नक्की मिळतो. तसे संकेत मिळतात. स्वतःला मदत करण्यासाठी आधी आपण तयार व्हावे तरच तो ही आपल्याला मदत करतो.


क्रमशः

#स्वतःला_शोधताना

#गौरीहर्षल


ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.