Raga books and stories free download online pdf in Marathi

राग

राग

काही दिवसांपासून सचिन एकाकी पडून अस्वस्थ झाला होता.त्याचे जवळचे मित्रही त्याच्याशी अंतर ठेवून वागू लागले होते. कालच त्याचे व त्याच्या पत्नीचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. ती भांडण करून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तर तो आणखीनच एकाकी पडला होता. तसा तो खूप सज्जन व लोकांना संकट समयी मदत करणारा, प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दु:खात सहभागी होणारा खूप प्रेमळ व्यक्ती होता. इतरांना दु:ख झालं तर तो हळहळ व्यक्त करायचा. पण त्याच्या रागामुळे त्याने केलेले प्रेम, त्याने इतरांना केलेली मदत निष्फळ व्हायची.

काल त्याच्या पत्नीने त्याचा आवडता शर्ट प्रेस करून न ठेवल्याने तो आपल्या पत्नीला खूप बोलला होता. खूप दिवसांपासून ती त्याचे शांतपणे ऐकून घेत होती. पण काल तिच्याही संयमाचा बांध फुटला व तिने त्याला उलट उत्तर द्यायला सुरुवात केली. आपली पत्नी आपल्याला उलट बोलते यामुळे त्याचा पुरुषी स्वाभिमान दुखावला गेला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने एलईडी उचलून फरशीवर जोरात आपटला. क्षणार्धात त्या एलईडीचा चुराडा झाला. तो एलईडी तिच्या वडीलांनी लग्नामध्ये दिला होता. त्यामुळे आता ‍तिलाही राग अनावर झाला.

ती रागाच्या भरात म्हणाली, "माझ्या वडीलांनी दिलेला एलईडी तुम्ही का फोडला? आता तुमचा राग सहन करणं माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. मी जर येथेच राहिले तर नक्कीच माझ्या जीवाचे काहीतरी बरे-वाईट करून घेईन. त्यामुळे मी आता या घरात एक क्षणही थांबणार नाही. "

सचिनचा राग आणखी गेला नव्हता. तो रागातच बोलला,

"जा. मला तुझी गरज नाही."

तिलाही खूप राग आला. ती म्हणाली, "मला एकटीलाच संसाराची गरज नाही. संसार दोघांचा असतो. पण तुम्हालाच त्याची गरज नाही. आता तुम्ही बोलावले तरी मी परत येणार नाही."

सचिन पुन्हा चिडला.तो रागातच बोलला, “तु गेल्यावर तेवढाच एकटा आनंदात राहीन मी.लवकर निघून जा."

आता त्याला उलट बोललं तर भांडण आणखी वाढेल असा विचार करून तिने आपली बॅग भरली व ती आपल्या माहेरी निघून गेली.

ती गेल्यावर थोडयावेळाने सचिनचा राग शांत झाला.त्यावेळी त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. खरं तर शर्ट प्रेस न केल्यामुळे तो तिच्यावर चिडलाच नव्हता. ऑफीसमधील कामाचा त्याच्यावर ताण आला होता व त्या ताणामुळे त्याला चिडचिड होवू लागली होती.त्याचा राग त्याने आपल्या पत्नीवर काढला होता.

काही दिवसांपासून असेच होत होते. मित्रांसोबत भांडण झाले, ऑफीसमध्ये काम वाढले, पैशाचे टेंशन आले अशा इतर कारणांमुळे आलेल्या ताणाचा राग तो क्षुल्लक कारणावरून आपल्या पत्नीवर काढत होता. ती सहनशील होती. तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. ती त्याला वेळोवेळी समजून घेत होती. पण तीही एक माणूसच होती म्हणूनच आज तिच्याही सहनशीतलेचा बांध फुटला होता. आजपर्यंत तिने सहन केलेल्या सर्व गोष्टी त्याला बोलून आपले मन मोकळे केले होते. पण ती आपल्याला उलट बोलली या गैरसमजातून त्याने तिला गरज नसल्याची भाषा बोलून परके केले होते. ती माहेरी जावून आता दोन दिवस झाले होते. तो बाहेर हॉटेलमध्ये जेवण करु लागला. त्याचे कपडे त्यालाच धुवावे लागु लागले. बाहेरच्या जेवणाने त्याचे आरोग्य ढासळले. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याने घराला उकीरडयाचे स्वरूप आले.आता त्याला क्षणाक्षणाला तिची आठवण येऊ लागली. ती जवळ नसल्यामुळे तिची किंमत कळू लागली. ती गेल्यापासून त्याला जास्तच एकाकी व अस्वस्थ वाटू लागले.तो बराच वेळ एकटयातच रडला. काही वेळाने त्याला त्याच्या ‘प्रभास’ नावाच्या मित्राची आठवण आली. तो मित्र सध्या पुण्याला होता.

समाजात व मित्र परिवारात प्रभासला खूप मान भेटायचा. सर्व मित्र परिवार त्याला आदर्श मानायचा.या संकटातून प्रभासच आपल्याला वाट दाखवेल असा सचिनला पक्का विश्वास होता. त्याने त्याची भेट घ्यायची ठरवले. प्रभासचा वेळ घेवून तो त्याला भेटायला पुण्याला गेला. सचिनने त्याला सर्व हकीकत सांगीतली. प्रभासने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.

प्रभासने त्याला बोलायला सुरुवात केली. “ हे बघ. तु माझा लहाणनपणापासूनचा मित्र आहेस. त्यामुळे मी तुला सुरुवातीपासून खूप चांगले ओळखतो.तु खूप चांगला आहेस. इतरांबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम आहे. तु स्वत:च्या आधी दुसऱ्यांचा विचार करतो.सर्व मित्रांच्या, पाहुण्यांच्या कार्यक्रमामध्ये पुढे होवून झटतोस. कोणालाही अडचण आली तरी तु अर्ध्या रात्री सुद्धा हजर असतोस. तरी तुझ्या सोबत असे का घडते ?”

सचिन म्हणाला, “ हो ना. मी पण तोच विचार करतोय.मी स्वत:चं नुकसान झालं तरी पर्वा न करता इतरांना खुष ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग असे का घडते?”

“त्याचे कारण तुझा राग आहे.” प्रभास शांतपणे पण तितक्याच स्पष्टपणे म्हणाला.

सचिन शांतपणे त्याचे बोलणे ऐकू लागला.

प्रभास पुढे म्हणाला, “ तु सर्वांसाठी एवढे करतोस. पण तुझा राग त्यावर पाणी फिरवतो. मग तु कोणासाठी काय केलेस हे सर्वजचण विसरून जातात. फक्त तु रागीट आहेस इतकंच लक्षात ठेवतात.”

सचिनला त्याचे म्हणणे पटले. सचिन म्हणाला, “ मग राग घालवण्यासाठी काय करु? त्यावर काय उपाय आहे?”

प्रभास शांतपणे म्हणाला, “ रागावर इतक्या सहजासहजी नियंत्रण मिळवता येत नाही.”

“रागामुळे माझे खूप नुकसान झाले आहे. मला काहीतरी उपाय सांग मी त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीन.” सचिन काकुळतीला येवून म्हणाला.

“ पहिल्यांदा तु तुला राग कशाचा आला आहे? याचे कारण शोध. बऱ्याच वेळा आपल्याला कशाचा राग आला आहे” हेच कळत नाही व आपण चिडचिड करत राहतो. ते कारण सापडल्यावर खरंच हे कारण आपल्या जवळच्या माणसांवर राग व्यक्त करून त्यांचे मन दुखवण्या इतके मोठे आहे का? याचा विचार कर. बऱ्याच वेळा ते कारणही खूप क्षुल्लक असते. जर कारण मोठे असले तरी त्यावर शांतपणे विचार करून उपाययोजना करण्याचा प्रत्यन कर. कारण समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर काहीतरी उपाय असतोच. आपल्याला खरं तर आपल्या मनासारखे कोणी वागले नाही, आपला अपेक्षाभंग झाला तसेच एखाद्या कामाचा किंवा पैशांचा ताण आला तर आपल्याला त्या तणावातून चिडचिड होते व राग येतो. त्या रागाला खतपाणी मिळत राहिले तर राग अनावर होवून आपल्या तोंडून अपशब्द निघतात. वस्तूंची तोडफोड होते.आपला आपल्यावर ताबा राहत नाही. परिणामी त्याचा आपल्या व समोरच्या व्यक्तीच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. घरातील वातावरूण दुषित होते.आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. मग आपण इतरांसाठी कितीही खस्ता खाल्ल्या तरी त्याची किंमत शुन्य होते. त्यामुळे रागावर नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे.”

प्रभासच्या बोलण्यातील शब्द न् शब्द त्याला अमृतासारखा वाटत होता. त्याच्या बोलण्यातून रागामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव त्याला झाली. तो प्रभासला म्हणाला, “मी तुला यापुर्वीच भेटायला हवे होते.”

प्रभास म्हणाला, “ आणखी वेळ गेलेली नाही. कोणाकडून अपेक्षा करणं सोडून दे. काही गोष्टींकडे मुद्दाम दुर्लक्ष करायला शिक. समोरची व्यक्ती ही शेवटी माणूसच आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडून क्षुल्लक चुका होणारच. त्या चुकांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष कर. तसेच सकारात्मक विचारांचे पुस्तके वाच व त्यामधील विचार प्रत्यक्षात आपल्या स्वभावात उतरवण्याचे प्रयत्न कर. प्रयत्नाने तुझा राग नक्कीच जाईल.”

प्रभासच्या बोलण्याने सचिन खूप प्रभावित झाला. आता काहीही करून रागावर नियंत्रण मिळवायचेच असे ठरवून प्रत्यक्षात अंमलात आणणे सुरु केले. सकारात्मक विचारांची पुस्तके वाचणे चालू केले. चांगल्या विचारांचे खतपाणी त्याच्या मनाला मिळाल्यामुळे त्याला आता ताजेतवाने झाल्यासारखे वाटु लागले. आता त्याची पत्नी माहेरी जावून आता आठ दिवस झाले होते. त्याला तिच्याकडे जावेसे वाटत होते. पण आधी आपण आपल्यामध्ये सुधारणा करु व मग तिला परत आणू असे त्याने ठरवले.आता तो आपल्या दुरावलेल्या मित्रांनाही जावून बोलू लागला. आठच दिवसात त्याने आपल्या वर्तनात खूप बदल केला. कार्यालयातील सहकारी, मित्र यांच्यामध्ये तो आता खूप चांगला वागू लागला.

सकाळी लवकर उठून कपडयांचा साचलेला ढिग धूवून काढायचा त्याने ठरवले. पण रात्री खूप वेळ वाचत बसल्यामुळे त्याला सकाळी लवकर उठता आले नाही. उठेपर्यंत ऑफीसची वेळ होत आली होती. त्याने गडबडीत आवरले व ऑफीस गाठले. दुपारी चार वाजता त्याने आपल्या पत्नीला फोन केला. पण तिने फोन उचलला नाही. त्याने तिला मोबाईलवर सॉरी म्हणून मेसेज केला पण तिचा रिप्लाय आला नाही. त्यामुळे त्याला थोडावेळ वाईट वाटले. पण क्षणभरच. कारण सकारात्मक विचारांचा प्रभाव. अपेक्षाभंग झाल्यास दु:ख्‍ करायचे नाही असा विचार मनात येवून तिला सुट्टीच्या दिवशी आणायला जायचे असे त्याने मनात ठरवले.

ऑफीस सुटल्यानंतर रात्री तो घरी आला. तर त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. काही दिवसांपासून त्या भागांमध्ये चोरांचा खूप सुळसुळाट झाला होता. दिवसाच काही ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्याने दबक्या पावलाने, सावधगिरीने घरात प्रवेश केला. पाहतो तर काय? घर खूप स्वच्छ झाले होते. तेथे लक्ष्मीचा हात फिरला होता. कपडे वाळण्यासाठी बांधलेल्या दोरीकडे त्याचे लक्ष गेले तर त्या दोरींवर त्याचे इतक्या दिवसांपासून धुवायचे राहिलेले कपडे धूवून वाळण्यासाठी टाकलेले होते. त्याने थोडे पुढे होत स्वयंपाक घरात पाहिले. तर त्याची पत्नी स्वयंपाक करत असलेली त्याला दिसली. क्षणभर त्याचा त्यावर विश्वासच बसला नाही. त्याचे डोळे पाणावले. त्याच्या लक्षात आले. त्याच्या पत्नीकडे घराची एक चावी शिल्लक होती. तिने त्याच चावीने घर उघडले होते. ती नसताना घराला आलेले उकीरडयाचे रूप व ती आल्यानंतर घराला आलेले घरपण यामधील फरक त्याला स्पष्ट जाणवला. त्याची चाहूल लागताच तिने मागे वळून पाहिले.

तो तिच्याकडे पाहत भावनाविवश होवून म्हणाला, “ का गेली होतीस मला सोडून? तुझ्या शिवाय माझे कोण आहे ? ”

ती म्हणाली,

“ मी फक्त शरीराने तिकडे गेले होते. मनाने तर तुमच्याजवळच होते.”

तो म्हणाला, “तु दूर गेल्यावर मला तुझी किंमत कळाली.आता तुझ्यावर कधीच रागावणार नाही.”

ती म्हणाली, “ आता मीही कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही.”

दोघांच्याही डोळयात अश्रू दाटून आले. सुप्त प्रेम भावना उफाळून वर आल्या. दोघेही जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत विसावले. पुन्हा कधीच न दुरावण्यासाठी.

Share

NEW REALESED