Need .. books and stories free download online pdf in Marathi

गरज..

अर्चना... पाच वाजले उठ लवकर..

हो ... उठते...

मला रोज पहाटे पाच वाजता उठायची सवयच लागली होती. उठल्यानंतर अंघोळ करायची आणि मग गल्लीतल्या नळावर पाणी भरण्यासाठी रांगेत जाऊन उभी रहायची. रांग मोठीच असायची. आजही रांग मोठीच होती. आज माझा शाळेत सहामाही परीक्षेचा पहिला पेपर होता. माझ्या मनात रांगेत फक्त एकच विचार होता. आज पेपर आहे आज तरी लवकर काम आवरु दे..

अर्चना.. पुढे हो गं.. माझा हंडा ठेवते हा तुझ्या मागे..

(माझंच लक्षच नव्हतं..)

अगं... अर्चना... अर्चना... कुठे आहे लक्ष तुझं बाळा??

सॉरी हा आजी काही बोललात का????

काय गं काय झालं..??? तु कसल्या विचारात आहेस..??
काही नाही ओ आजी सहजच...
तब्येत ठीक आहे ना तुझी ??
ती भवानी कुठे आहे ?? झोपले का अजुन ???
हो ठीक आहे तब्येत माझी.. आणि आई झोपले, बाळ उठलं नाही ना अजुन.
हो का...तशी पण ती कुठे तुला जगुन देते..
जाऊ दे ना आजी.. तुम्ही नका त्रास करुन घेऊ. चला, पाणी आलं.
पाणी आल्यानंतर मी पटकन् घरातील सर्व पाणी भरून घेतलं. घरी गेल्यानंतर बघितलं तर साडे सात वाजुन गेलेले मग लगेच मी भाकरी भाजी बनवुन घेतली.
आई.. आई...
काय आहे ??? काय झालं तुला सकाळी सकाळी ओरडायला..
आई उठ ना.. आज लवकर. बघ ना आठ वाजुन गेलेत मला नऊ वाजता शाळेत जायचं आहे.
का आज कुठे चाललीस हिंडायला..??
अगं आज पासून परीक्षा आहे माझी.
नक्की का...???
हो गं उठ ना, तु जा आवरुन घे तुझं मी बाळाच्या शेजारी बसते.
हो बस इथे उठवु नको त्याला आवाज नको करु तुझा.
आई उठुन गेली पण मला तेवढा वेळ जरा पुस्तक हातात घेऊन अभ्यसावर नजर टाकता आली.
अर्चना.. अर्चना..
आई काय गं.??
चहा कुठे आहे???
बनवला नाही मी अजुन, तु ये इकडे बनवते मी पटकन्..
का तुला माहित नाही का??? मला अंघोळीनंतर लगेच चहा लागतो.
हो सॉरी हा मी विसरलीच आज.. बनवते लगेच..
आईनी माझ्या नावाने बडबड सुरु केली होती. पण मी मनात ठरवलंच होतं. आई किती काही बोलली तरी मी प्रतीसाद देणार नाही.
आई... चहा झाला आहे.. घे तु.. मी तोपर्यंत कपडे धुवायला घेते.
कुठे चाललीस तु?? तुला घाई तरी का झाले?? नक्की परीक्क्षाच आहे ना ?? की चाललीस कोणाला भेटायला..
माझ्यावर आईच्या बोलण्याचा खुप परिणाम होत होता, पण माझ्याकडे सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय ही नव्हता. तसंही सावत्र आई माझी, तिच्याकडून मला सख्ख्या आईचं सुख आणि आईची माया नव्हतीच मिळणार. परिस्थिती ही आमच्या दोघींची सारखीच होती..माझ्या जन्मानंतर तीन वर्षांनी आई एका आजाराने त्रस्त होती. आईवर ईलाज करण्यासाठी बाबांकडे हवे तेवढे पैसेही नव्हते. त्या वर्षांतच आई मला आणि बाबांना सोडुन गेली. मी अवघ्या तीन वर्षांची होती. मला समज नव्हती की खायचं ही माहित नव्हतं. मग बाबांनी मला सांभाळण्यासाठी दुसरं लग्न केलं आणि ही आई माझ्या आयुष्यात आली. ती बाबांसोबत ही व्यवस्थित नव्हती वागत. बाबांनाही वाटेल त्या शब्दांत बोलायची. पण बाबा माझ्यासाठी सहन करायचे.
आई गरोदर आहे समजलं आणि काही दिवसांतच बाबांचा अपघात झाला. बाबाही मला सोडून गेले. बाबांना माहित होतं, की ही आई मला सख्ख्या आईची माया नाही देऊ शकत पण मी बहिण म्हणुन तिच्या होणाऱ्या बाळाला ताईची माया देऊ शकते. बाबांचा अपघात झाला आणि बाबांना जेव्हा समजलं ते आता आमच्या सोबत नाही राहणार, त्याचवेळी मला त्यांनी हेच सांगितलं की,
"अर्चना, तुझी आई मी या आईच्या रुपात परत नाही आणु शकलो, पण तुझ्या आयुष्यात एक भाऊ किंवा बहिणीची जबाबदारी तुझ्यावर सोपवुन मी ही आता तुझ्यापासुन लांब जाणार आहे, मला खरंच तुझं वाईट वाटतं माझ्यामुळेच तुला आई आणि बाबाची माया आणि प्रेम नाही मिळाले."

आई बाबा या दोघांची गरज मला आज खुप होती. ते माझ्यासोबत नव्हते. जी आई माझ्या आयुष्यात आज आहे. तिच्या मुलाला माझी भविष्यात खरी गरज आहे हे विसरुन मला कुठेच जाता येणार नाही.

माझ्या गरजेसाठी त्याची गरज मी दुर नाही करु शकत. माझ्या आईपेक्षा त्याची ताई आज महत्वाची आहे.