Death - a ceremony books and stories free download online pdf in Marathi

मृत्यू - एक सोहळा

मृत्यू या छोट्याशा शब्दात प्रचंड भय सामावलेलं, नुसता शब्द ऐकला तरी काहींच्या काळजात धस्स होतं.. अनेक भावनांचा कल्लोळ माजतो..

मृत्यू हे प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे.. तरीही इतर सजीवांपेक्षा मानव प्राणीच मृत्युचं भय बाळगून असतो ...

जन्म आणि मृत्यू या दोन घटनांभोवती फिरणारी अखंड सृष्टी , जन्म हा एक आनंदाचा सोहळा .. तर मृत्यू मात्र दुःख , यातना या भावनांचा डोंगर हेच समीकरण रूढ झालेलं..

जसा जन्म विधीलिखित तसाच मृत्यूही..त्याची वेळ कोणालाच माहित नाही . येणारा मृत्यू बालपणात असेल, तरुणाईत की अगदी शंभरी गाठल्यावर..!!

आणि या मृत्युला जर एक आनंदाचा सोहळा करायचा असेल तर ??

तेही शक्य आहे..

त्यासाठी जगण्यावर प्रेम करता आलं पाहिजे..

आता तुम्ही म्हणाल ते तर आम्ही करतोच की..

जगण्यावर प्रेम म्हणजे नक्की काय??

शरीरावर की मालकीच्या वस्तूवर प्रेम म्हणजे जगण्यावर प्रेम ??

थोड खोलात जाऊन विचार केल्यावर समजेल की जगण्यावर किंवा जीवनावर प्रेम म्हणजे जीवनाचा अनुभव हवाहवासा वाटणे..

उदाहरणार्थ.. माझ्याकडे स्वतःची गाडी आहे.. ही गाडी असणं म्हणजे भौतिक सुख ..पण त्या गाडीमुळे मिळणारा ड्रायव्हिंगचा अनुभव आणि त्या अनुभवामुळे मनाला होणारा आनंद .... हे खरं जीवनावरचं प्रेम...

जीवन म्हणजे लागोपाठ घडणाऱ्या घटनांची ,अनुभवांची मालिका...

व्यक्ती , वस्तू किंवा स्मृती यांच्याशी जोडला गेलेला संबंध आणि त्यातून मिळणारा अनुभव मला हवा हवासा वाटतो..

माणूस बऱ्याचदा भौतिक सुखांमध्ये रममाण होतो आणि त्यालाच आनंद म्हणायला लागतो..

Your legacy is not your physical assets.

आपलं काम, आपले विचार आणि आपण जोडलेली माणसं हीच आपली खरी पूंजी ..

संबंध , अनुबंध , प्रेम नसलं की माणसाचं आयुष्य हृदयहिन चोथा आहे आणि तो अतीताण आला की मरू शकतो.. प्रेमाची शक्ती त्यावर वरदान आहे..
दुसरं कोणी आपल्यावर प्रेम करेल हे आपल्या हातात नाही पण आपण स्वतः, स्वतः वरती प्रेम करून आपल्या आनंदी जगण्याची चावी आपल्या हातात ठेवू शकतो..

कधीतरी अचानक आलेला मृत्यूचा अनुभव ह्या सत्याची जाणीव करून देतो..

Life is what happens to you when you are busy making other plans" असे एक वाक्य आहे.. पण याची उकल होई पर्यंत बराच उशीर झालेला असतो म्हणूनच मृत्यूच्या अगोदर आयुष्य जगायला शिकुया..

हीच अनुभूती लवकरात लवकर यावी म्हणून एकदा तरी प्रत्येकाला मृत्यूचे जवळून दर्शन झालेच पाहिजे.त्यामुळे आपल्या वाट्याला येणारा प्रत्येक क्षण आपण भरभरून जगू..

काहीजण "मी" "माझं" यामध्ये बुडालेले आहेत.. माझे नातेवाईक , माझी संपत्ती , माझी मुलं अशांना मृत्युची जास्त भीती वाटते...

"मी" "माझं" नावाच्या पिंजऱ्यातून सुटणाचे दोनच मार्ग एक प्रेम आणि दुसरं अध्यात्म...
ज्याची जशी शक्ती, प्रकृती तशी मुक्तीची चावी त्याने वापरावी आणि "मी"नावाच्या पिंजऱ्यातून सुटका करून घ्यावी.

एकदा का तुमची "मी" "माझं" यातून सुटका झाली की आयुष्य एक सुंदर अनुभव बनून जाते आणि मृत्यू फक्त एक नाममात्र प्रक्रिया होते. याचाच अर्थ शरीराच्या मृत्यूअगोदर अहंकाराचा मृत्यू व्हावा..

थोड भूतकाळात डोकावून बघितलं तर काही महान व्यक्तींनी आणि संतांनी स्वतःहून देह त्याग केला आहे.. विनोबा भावे , संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी आपण सर्व जण ऐकून आहोतच..

एकंदरीत काय ,आपल्याला वाटतं तेवढा मृत्यू भयावह नाही आहे.

बऱ्याच लोकांचे आयुष्य हे त्यांना जडलेल्या एखाद्या शारीरिक व्याधीमुळे किंवा वृध्दत्वामुळे गांजलेलं असतं.. त्यांना यातून मुक्ती हवी असते. अशा लोकांसाठी मात्र मृत्यू हे वरदान ठरतं..

मृत्यू आयुष्य जगायला शिकवतो. म्हणून तो महत्वाचा आहे..जसं आयुष्य सुंदर आहे.तसाच मृत्यूही सुंदर असावा आणि त्याचा सोहळाही सुंदर असावा

संत पलटू म्हणतात...

"पलटू बडे बेवकूफ वे..
होने आसिक जाही..
सिस ( शिर) उतारे हात से सहज आसिकी नाही.."

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व