psi base - baseless basis books and stories free download online pdf in Marathi

साई आधार - निराधारांचा आधार

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!
निराधार आभाळाचा तोच भार साहे ! “

मी असं म्हणेन की, " निराधार बालकांचा तोच भार साहे."
विशाल दादा !

माझी आणि विशाल दादाची भेट खूप योगायोगाने झाली. दादाला भेटणं हे नशिबातच होत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साधारण एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे.. सप्टेंबर २०२० . माझा वाढदिवस अश्या ठिकाणी साजरा करूया ज्यामुळे ऐन कोरोना काळात गरजू लोकांना मदत होईल, अशी इच्छा अनिलने व्यक्त केली. आमच्या ओळखीचे स्पर्श फाउंडेशन चे संस्थापक श्री सूरज सावंत यांच्याकडे आम्ही हे मनोगत मांडले. त्यांनी आम्हाला दोन तीन अनाथ आश्रम आणि साई आधार बद्दल सांगितले. सगळी चाचपणी केल्यानंतर आम्ही साई आधार ला जायचं ठरवलं. एक तर साई आधार आम्ही राहतो त्या ठिकाणावरून जवळ होते. कोरोना काळात आम्हाला लांबचा प्रवास करायचा नव्हता. दुसरं म्हणजे मी नवीनच गाडी शिकले होते त्यामुळे एका दिवसात खूप लांबचा पल्ला गाठू शकेन की नाही याची खात्री नव्हती. हे सगळ लक्षात घेता.. आम्ही साई आधारला जायचं नक्की केलं.
साई आधारला जाईपर्यंत तो एक अनाथ आश्रम आहे आणि आपल्याला जमेल तेवढी त्यांना मदत करायची आहे येवढंच मनात होतं. जायच्या आधी दादाशी एक दोनदा बोलून सध्याची गरज काय आहे, मुलांसाठी काय काय हवं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची जमवाजमव केली . ठरल्या दिवशी आम्ही सकाळी लवकर साई आधारला जायला निघालो.मी घरातून निघाल्यापासून ते तेथे पोहचेपर्यंत दादाने मला दोन तीन वेळा तरी फोन करून चौकशी केली व ताई सावकाश ये, प्रवासात काही अडचण आली तर फोन कर असे सांगितले. साई आधार विरार येथील भाताने गावापासून जवळच असलेल्या थळ्याचा पाडा इथे आहे.. मुख्य हायवे सोडून ३.५ कि. मी. कच्चा रस्ता आहे.. त्यामुळे दादाने मला काळजीने सांगितलं असाव. परंतु आम्हाला काही अडचण आली नाही आणि आम्ही दोघे साई आधारला पोहचलो. दादा बाहेरच वाट बघत उभा होता. दादाची आणि माझी ही पहिली भेट पण आम्हा दोघांनाही वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. कोणतीही औपचारिकता दादाच्या वागण्यात नव्हती. त्यामुळे खूप दिवसांनी सख्खे भाऊ बहिण भेटावेत अशी ती भेट झाली.
घरात गेल्यावर सगळी चिमणी पाखरं जमली. त्यांच्याशी दादाने आमची ओळख करून दिली. आम्ही यांना काय म्हणायचं असा प्रश्न एका चिमुरड्याने केला . दादा सहज बोलून गेला “आत्या”, ही तुमची आत्या आहे. त्या दिवसापासून आजतागायत आमचं बहिणभावाच नात अगदी घट्ट होत गेलं. पहिल्या भेटीत दादाचा जीवन प्रवास जाणून घ्यायची संधी मिळाली.. आज मी तुम्हा सगळ्यांसमोर त्याचे काम व त्याकरीता त्याने केलेला खडतर प्रवास मांडणार आहे..
दादा मूळचा कोकणातील ... वडिलांचा वसईला छापखाना होता. त्यामुळे सर्व कुटुंब वसईत स्थायीक होते. दादा सात महिन्यांचा असताना त्याची आई त्याला सोडून देवाघरी गेली. आज्जीने , आई बनून दादाचा सांभाळ केला. वडीलांच्या छापखान्याच्या कमाई वरती या तिघांचा उदरनिर्वाह चालू होता.पण वडील व्यसनाधीन होते. व्यसन भल्या भल्या लोकांना कर्जबाजारी करते. यांचे पण असेच झाले.. लोकांची देणी फेडण्यासाठी छापखाना विकावा लागला. वडिलांनी अंथरूण धरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. आता आज्जी हा एकमेव दादाचा आधार होता. घरात दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. भूक माणसाला कोणतंही काम करायला लावते . छोटा विशाल जवळच असलेल्या साई मंदिरात पडेल ती कामे करू लागला. जसं की लादी पुसणे, भाविकांच्या चप्पल सांभाळणे. या बरोबरीने तो हायवे वर जावून गाड्यांच्या काचा पुसणे, दर शनिवारी लिंबू मिरचीचा आकडा विकणे अशी कामे पण करू लागला.. त्यातून जी मिळकत होईल त्यात आज्जी नातवाच पोट कसं तरी भरू लागलं. काळ पुढे पुढे सरकत होता. एक दिवस वयपरत्वे आज्जी पण हे जग सोडून गेली. कोणी असो किंवा नसो जगावं तर लागणारच. पोटाच्या भुकेला मनाच्या भावना कश्या कळणार. पोटाची खळगी भरण्यासाठी दादाने आपली रोजची कामे चालूच ठेवली.पण त्यात रोजचे जेवण मिळेल तेवढे पैसे पण मिळेनासे झाले.मग छोट्या विशालने परिस्थिती पुढे हात टेकले आणि हातात वाडगा घेवून साई मंदिराच्या आवारात भिक मागू लागला.
आपला समाज पण कसा आहे बघा. जेंव्हा दादा कष्ट करून पैसे कमवायचा प्रयत्न करत होता तेंव्हा त्याला लोक पैसे द्यायचे नाहीत. उलट त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागायचे .पण जेंव्हा भीक मागू लागला तेंव्हा मात्र तेच लोक त्याच्या वाडग्यात पैसे टाकू लागले. भीक दिली की दान केल्याचं समाधान मिळतं ना ही आपली मानसिकता. भीक मागताना दादा एकटाच नसायचा. तिथे पण त्याच हळू हळू एक कुटुंब तयार झालं. दोन तीन मुले, एक कुष्ट रोगी आणि एक एच आय व्ही बाधित महिला जिचे कोणी नव्हते ,असे हे सगळे मिळून भीक मागत. अश्या परिस्थितीत पण दादाने त्याचे शिक्षण सोडले नाही. तो जवळच्या सरकारी शाळेत जावून शिकत होता. सरकारी शाळेत जायचं अजून एक कारण म्हणजे तिथे फ्री मध्ये जेवण मिळायच त्यामुळे शाळेत गेला की एक वेळ तरी त्याचं पोट भरायचं. दिवसभर हे दादाचं कुटुंब अन्न आणि पैसे मिळवण्यासाठी इथे तिथे विखुरलेले असायच पण संध्याकाळी मात्र ते एकत्र जमायचे. साई मंदिराच्या शेजारीच एक पत्र्याची शेड होती. तिथे संध्याकाळी एकत्र यायचे. त्या शेड ला त्यांनी नाव दिले ' साई आधार '
दिवसामागून दिवस जात होते. दादाचे शिक्षण पण चालू होते. दहावी पास झाल्यावर त्याने वसईच्या कॉलेजमध्ये आर्ट्स साईड ला एडमिशन घेतले. काही चांगल्या लोकांमुळे त्याची कॉलेज फी पण माफ केली गेली. दादा बारावी उत्तीर्ण झाल्यावर दादाने मानसशास्त्रात पदवी घेण्याचे ठरवले. पदवीचा अभ्यास करत करत तो वसई मध्ये एका सिनेमा गृहाच्या बाहेर वॉचमनच काम करू लागला. दिवसा अभ्यास आणि रात्री वॉचमनचं काम दोन्ही चालू होत. नशिबाने दादाला साथ दिली त्याला मानस शास्त्रात गोल्ड मेडल मिळाले. त्यावेळचे वसईचे आमदार श्री हितेंद्र ठाकूर यांनी दादाच्या परिश्रमाचे फळ म्हणून त्याला शिर्डी येथे एका हॉटेल मध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीस लावले आणि थोडी आर्थिक मदत पण केली. दादाला आता थोडे चांगले दिवस आले होते. हळू हळू दादाने पैसे जमवत भागीदारीत शिर्डीत हॉटेल सुरू केले. चार पैसे गाठीशी राहू लागले.पण पैश्याचा माज त्याला कधीच आला नाही. तो आपले पूर्व आयुष्य विसरला नव्हता. आपण जे वाईट दिवस बघितले अशी वेळ कोणत्याही मुलावर येवू नये यासाठी निराधार बालकांचा सांभाळ करण्याचा निर्णय त्याने घेतला. असे किती तरी निर्णय आपल्या सारखी माणसे रोजच्या आयुष्यात घेतात पण त्याच कसोशीने पालन हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोक करतात. दादा त्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अश्या लोकांमध्ये मोडतो. त्यावेळी केलेला संकल्प अजूनही तेवढ्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे तो आजही पाळतो.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारु।
अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।

शिर्डीत असताना दादा साईबाबा मंदिराबाहेर रोज एका आज्जी आणि तिच्या नातवंडाला भिक मागताना बघायचा. आजीची सून आणि मुलगा एका अपघातात मरण पावले होते. आज्जी कुष्ट रोगी होती. दादा तिला आणि त्या मुलाला घेवुन वसईला आला आणि वसईतील एका ओळखीच्या डॉक्टरांकडे तिचा इलाज चालू केला.पण आज्जी जास्त दिवस हे जग बघू नाही शकली. आता तिच्या नातवाची पूर्ण जबाबदारी दादावर आली.. ह्याच मुलापासून सुरू झालेले दादाचे काम आजपर्यंत अखंड चालू आहे. मुलांना सांभाळायचे म्हणले तर स्वतःची जागा हवी. सगळा सारासार विचार करून दादाने शिर्डीतील हॉटेलमधील भागीदारी मोडली आणि मिळालेल्या पैशातून थळ्याचा पाडा ,भाताने, विरार येथे एक जागा विकत घेतली. तिथे पत्राचे शेड उभारले. इथेही शेड पत्र्याचेच होते पण हक्काचे स्वतःच्या मालकीचे होते. या जागेबरोबरच असलेल्या जमापुंजीतून दादाने एक सेकंड ह्यांड टेम्पो विकत घेतला आणि लोकांची मिळेल ती टेम्पो भाड्यांची ऑर्डर घेवून तो साई आधार चालवू लागला.
हे सगळं चालू असतानाच त्याच्या आयुष्यात अंकिता वहिनी आली. वहिनीच्या वडिलांचा वीट भट्टीचा व्यवसाय होता. अंकिता घरासाठी हातभार लावण्यासाठी वसई मध्ये ब्युटी पार्लर चालवायची . एका मोठ्या आजारपणात अंकिताचे वडील देवाघरी गेले. आई तर आधीच मरण पावली होती .अंकिता निराधार झाली. दादाने तिचे दुःख जाणले तिला लग्नासाठी मागणी घातली. दादाने लग्नाअगोदर अंकिताला साई आधार बद्दल माहिती दिली. भविष्यात पण माझं काम असच सुरू राहील हे सांगितलं. अंकिता खूप समजूतदार होती. तिने आनंदाने सगळ्याचा स्वीकार केला. येवढ्या वर्षानंतर सुद्धा आजच्या घडीला वहिनी प्रत्येक सुख दुःखात दादाच्या बरोबर भक्कमपणे उभी आहे. येणाऱ्या प्रत्येक मुलाची ती यशोदा आहे.
विशाल आणि अंकिताचा संसार पत्र्याच्या शेड मध्ये छान फुलू लागला. दादाने हळू हळू त्या शेडचे रूपांतर दगड विटांच्या पक्क्या घरात केले. साई आधार मध्ये दिवसेंदिवस एक एक मुल येत होते. दादा टेम्पोची भाडी घेवून पूर्ण महाराष्ट्रात फिरायचा. जिथे कुठे त्याला अशी निराधार मुले दिसत ज्यांना आईवडील नाही आहेत अश्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घेवून, स्थानिक पोलिस स्टेशनच्या सर्व अटींची पूर्तता , सर्व शासकीय नियमांचे पालन करून दादा त्यांना साई आधार मध्ये घेवून येत असे. यामध्ये त्याला काही मुले मंदिराच्या बाहेर भीक मागताना, काही दारूचे फुगे विकताना भेटली आहेत. काहींच्या शेतकरी आईवडिलांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली होती. नातेवाईकांना जड झालेल्या अश्या सर्व मुलांचा दादा आज 'आबासाहेब 'आहे तर वहिनी 'आई ' . सगळ्या जाती धर्माची मुले त्याच्याकडे राहतात. कसलाही भेदभाव नाही. सगळी मुले शिवाजी महाराजांची भक्त आहेत. त्यांचे पोवाडे गातात. भजन कीर्तन करतात. मुले दिवाळीच्या पणत्या, कंदील स्वतः बनवतात. मुली शिवणकाम, विणकाम भरतकाम शिकल्या आहेत. काहींनी ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला आहे. मुले पथनाट्य पण सादर करतात.त्यातून शेतकऱ्यांना संदेश दिला जातो. 'आत्महत्या करू नका. त्याने काही सध्या होणार नाही. परिस्थितीचा सामना करा'.
साई आधार मधील रमेश वाघने या वर्षी तर जम्पिंग रोप या स्पर्धेत पूर्ण भारतात दुसरा नंबर पटकावून महाराष्ट्राला सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहे. दादा वहिनी कधी नसतील तर मोठी मुले लहान मुलांची काळजी घेतात. त्यांच्या स्वच्छतेपासून ते अगदी अभ्यासापर्यंत लक्ष्य मोठी मुले ठेवतात. इथल्या मुलांच्या अंगी असे वेगवेगळे कलागुण तर आहेतच त्याबरोबर ही सगळी मुले नियमित शाळेत पण जातात. जवळच असलेल्या सरकारी शाळेत ही मुळे दहावी पर्यंतचे शिक्षण घेतात. पुढे कॉलेजसाठी ही मुले नाशिक जवळील त्रंबकेश्वर या ठिकाणी जातात. येथील कॉलेजच्या प्राचार्य दादाच्या ओळखीच्या आहेत. त्यांना दादाच्या कामाबद्दल सर्व माहिती आहे . त्यांच्या मदतीने या मुलांची अगदी माफक फीमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची सोय होते. मुले तिथे राहून ' कमवा आणि शिका ' हे धोरण अवलंबतात. जे मिळेल ते काम करून मुले आपला होईल तेवढा खर्च करतात. बाकी कुठे अडले तर दादा आहेच उभा.
आतापर्यंत ७० ते ८० मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःच्या गावी परत गेली आहेत. यामध्ये काहींनी मेकॅनिक, काहींनी इलेक्ट्रिक काम, तर काहींनी सुतारकामाचं प्रशिक्षण घेतलं आहे. ३/४ मुलींची लग्ने झाली आहेत. त्यासुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. दादा येवढ्या लहान वयात दोन तीन नातवंडांचा आजोबा आहे. या लग्न झालेल्या मुली दर दिवाळीला माहेरी येतात. जी मुले त्यांच्या गावी जावून सेटल झाली आहेत ती पण वर्षातून एकदा तरी दादाला भेटायला येतात.
कोरोना काळात इतरांसारखे साई आधारने पण वाईट दिवस बघितले. भेट/ दान देणारे बंद झाले. काम मिळेनास झालं. सगळीकडून येणारी मदत पण कमी झाली. अश्या वेळी मुलांचे पालनपोषण करण्यासाठी दादाला टेम्पो विकावा लागला. मुले जंगलात जावून कंदमुळे,फळे आणून त्यावर भूक भागवू लागली. तर कधी नुसतं लोणचे आणि भात यावरच दिवस घालवला जाई .पण या सगळ्यांची सहनशक्ती एवढी जास्त होती की त्यांनी यावर पण मात केली. हळू हळू दिवस बदलले. कोरोनाचा कहर ओसरू लागला. लोकं साई आधारला येवू लागले. दादाला एका भल्या माणसाने त्याची इको गाडी चालवायला दिली. दादा त्या गाडीने विरार ते फाऊंटन हॉटेलपर्यंत लोकांची ने आण करून पैसे कमवू लागला. मुली कुठे लग्न समारंभ असेल तिथे पार्लरच्या ऑर्डरी मिळवू लागल्या. पुन्हा साई आधार मध्ये चैतन्य आले. आता हळू हळू साई आधार पूर्वपदावर येत आहे.

सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला !!

होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा !!

दादाला आतापर्यंतच्या कामासाठी बरेच पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यात
1. विजयवंत पुरस्कार
2. स्वामी विवेकानंद युवा सन्मान
3. ब्राह्मण सभा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार
4. नाना पालकर स्मृती पुरस्कार
आदींचा समावेश आहे.
काहींचा बाप, काहींचा दादा, काहींचा सासरा तर काहींचा आधार!! असा हा विशाल दादा.
विशाल दादाचा हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. त्यात त्याला वहिनीची भक्कम साथ आहे. या त्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे.
विशाल दादा आणि वहिनीच्या या कार्यापुढे नतमस्तक होवून मी लिखाण आवरत घेते.

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व