Rutu Badalat jaati - 1 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..1









ऋतू बदलत जाती........१

एका सुंदर प्रभाती तो एक महागडी स्पोर्टस् कार घेवून निघालेल ..रस्ता तसा घाटातला नसला तरी फारच वळणदार ,शांत, चकचकीत पण किंचित धुक्याने वेढलेला होता ,त्याची गाडीही म्हणून संथ गतीनेच पुढे चालत होती..दुतर्फा गुलमोहर आणि बकुळीने बहरलेला तो रस्ता कधीच संपूच नये असेच वाटत होते त्याला...आणि का नाही वाटणार शहराच्या धकधकीतुन आज तो अशा शांत,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या..ठिकाणी आला होता...पक्ष्यांची चिवचिवाट आणि मातीचा मृदगंध बर्‍याच दिवसांनी अनुभवत होता तो..,त्याने कारच्या सगळ्या खिडक्या उघडून दिल्या गाडीचं वरच छतही उघड केलं..स्टेअरींग व्हिल वरचे दोन्ही हात वर आकाशाकडे उंचाऊन एक दिर्घ श्वास घेतला..जणू असं केल्याने तोही त्या ब्रम्ह देवाने सजवलेल्या निसर्ग देवतेच्या हास्यात.. सामावून जाईल...हो हास्यच तर आहे ...हा मृदगंध..ही फुलांनी केलेली रंगांची उधळण..ही पक्षांची चिवचिव....झऱ्याची खळखळ.. आणि खोडकर वाऱ्या संग सळसळणारी ही पानं...हास्यच आहे निसर्ग देवतेच....जे...सुखवस्तूंनी सजलेल्या ईमारतींच्या गावांत..नाही....शहरांत विरून गेलय ते..पण तो का आला होता ईथं...तर त्याला काही दिवस तरी मनासारखे जगायचे होते..त्या संवेदना हरवलेल्या पण जीवलग म्हणवणाऱ्या मनुष्यरूपी यंत्रांपासून दूर.....पण माहीत होते त्याला तो जास्त काळ असा नाही राहू शकणार...म्हणूनच..आणि...म्हणूनच...ह्या नश्वर शरीराचा त्याग करून...त्यालाही ह्या हास्यात विलीन व्हायचे होते....पण...पण...काही दिवस तरी जगण्याचा आनंद घेवून..

त्याने अलगद डोळे बंद केले..परत तिथला सुगंध श्वासात भरून घेतला, गाडी मात्र सुरुच होती.
तेवढ्यात कुणाच्या किंचाळण्याने त्याने डोळे खाडकन उघडले, क्षणात हात स्टेरींग व्हिलवर, आणि पाय ब्रेकवर पडले त्याचे,करकचून ब्रेक मारून गाडी थांबली.त्या आवाजने आसपासच्या झाडांवर विसावलेले पक्षी उडून गेले.त्याने एक दिर्घश्वास घेतला, काहीतरी भयंकर घडायच्या आधी त्याने गाडी थांबवली होती. तोंडावरून एक हात फीरवला आणि बाहेर आला. समोर ती उभी होती विस्मयाने चकीत होवून,आधीच मोठे असलेले डोळे अजून मोठे करून,फिक्कट गुलाबी रंगाच्या सलवार सुट मध्ये, वार्याच्या तालावर भुरभुरणारे तीचे केस आणि आणि ओढणी सावरत...

"कोण आहेस तू ..वेडी आहेस का? आता वर पोचली असती ..जर मी ब्रेक लावला नसता तर.."तो चिडला , ती फक्त त्याच्याकडे टकमक बघत होती.

" मुकि आहेस का ..बोल काहीतरी... का माझी भाषा समजत नाही तुला ...."त्याने तिच्या हाताला पकडून हलवलं ती एक पाऊल पुढे झाली, अजूनही तिचे डोळे विस्फारलेलेच होते एकवार त्याच्याकडे ..त्याने पकडलेला हाताकडे आणि एकवार स्वतःच्या पायाकडे बघत होती..तीला समजत नव्हते काय करावे,तीने एका हाताची मुठ घट्ट केली आणि तो हात आकाशात उंचावला.

" शक्तिमान समजतेस का स्वतःला की हात वर करून आकाशात उडून जाशील म्हणुन.."तो

पण त्यांतर तिच्या चेहऱ्यावर चे भाव बदलले,चिंता काळजीचे मेघ तीच्या चेहऱ्यावर दाटू लागले तसा तो नरमला.
तो वळला आणि परत गाडीत बसला,बघतो तर ती त्याच्या गाडीत बसली होती.

"मला लिफ्ट द्याल... प्लीज ..!!अखेर तिच्या लालचुटुक रसरशीत ओठांतुन शब्द निघाले.

"तुम्ही ऑल रेडी माझ्या गाडीत बसल्या आहेत मिस.. बाय द वे कुठे जायचं आहे तुम्हाला..?" तो

"ह्या रोडवर पुढे निरामय नावाचा एक बंगला आहे तेथेच" ती


"आणि वाटल्यास ..... यापुढे लिफ्टसाठी असले स्टंट करू नका.." म्हणत त्याने गाडी सुरु केली.

"थँक्यू.. मी ह्या लिफ्ट ची कधीपासूनच वाट बघत होते..."ती

"केव्हापासून ...म्हणायचं आहे का तुम्हाला ...."त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

तिने एक स्मित दिले.पण दुसऱ्या क्षणाला तिच्या चेहऱ्यावर एक उदासी पसरली.

पूर्ण रस्ताभरुन ती त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही, नाही की तो तिच्यासोबत काही बोलत होता, पण अधून मधून त्याचे तिचे निरीक्षण करणे सुरुच होते.गोरा नितळ रंग, कोरीव भुवया ,सरळ बारीक नाक , लालचुटूक बारीक ओठ आणि त्यावर तिचे भूर भूर उडणारे सरळ लांब केस.. कोणाचाही हृदयाचा ठोका चुकवायला पुरेसे होते,पण मधेच तिच्या चेहऱ्यावर हसू येत होते तर लगेच उदासीनता ,कदाचित तिच्या मनातल्या विचारांनी चेहऱ्यावर ऊन सावल्यांचा खेळ सुरू केला होता.त्या क्षणाला बघणार्‍याला मात्र कदाचित ती वेडी भासली असती.आणि हो तसच झालं ,त्यालाही ती थोडी विचित्र वाटली.

"एवढी सुंदर मुलगी आणि ती वेडी .."आपल्याच विचाराने तो थोडा हळहळला.
निरामय बंगला आला तेव्हा त्याने गाडी थांबवली रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला होता तो.

त्याने गाडी थांबवली आणि तिच्याकडे वळून बघितलं तर ती गाडीच्या बाहेर होती त्याला आश्चर्य वाटलं.

त्याला 'थँक्स' म्हणून ती भरभर पाऊल टाकत गेट कडे वळली जणूकाही तिकडे आत मध्ये तिला काहीतरी खेचत आहे.गेट जवळ पोहचल्यावर तिने एकदा मागे वळून बघितले ,त्याची कार तिथेच उभी होती. तिने त्याच्याकडे स्मित केलं ,त्याने ही उत्तरादाखल तिला स्मित दिलं .आणि गाडी पुढे ढकलली. तिने गेट कडे बघितलं फार मोठे अवजड गेट होते ते ,एक पहारेकरीही बसला होता तिथं, पण तिला कोण अडवणार तिचंच तर घर होतं ते. ती आत आली पण दिवाणखान्यात कुणीच नव्हतं .थोडंसं जुन्या धाटणीच , भलंमोठ ते घर ,त्यातलं उंची फर्निचर श्रीमंतीची झाक नक्कीच दाखवत होते... पण ती तिथे नाही थांबली तिची पावले झपझप एका खोली कडे जात होती, जशी जशी ती जवळ जात होती तसा तसा एका तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडत होता, तशी तिची गती अजून वाढली, तिच हृदय धडधड करायला लागलं.तिने समोर बघितल सहा सात महिन्यांचे बाळ झोक्यामध्ये रडत होतं ,त्याच्या बाजूला दुधाची बाटली पडली होती. कदाचित झोक्याला आतुन टेकवून ठेवलेली ती बाटली तो पित असतांनी सटकून खाली पडली असेल म्हणून तो रडायला लागला असेल.. ती पळतच त्या बाळ जवळ गेली. आणि बाटली उचलून त्याच्या तोंडाशी धरू.. पण ती बाटली हातात येत नव्हती, ...आता तिने बाळाला उचलायला हात केला पण तिचे हात रिकामेच वर येत होते.. नव्हती उचलू शकत होती ती त्या बाळाला ना त्या बाटलीला.. पण तरीही ती परत परत हात बाळा च्या खाली घालत होती पण ते रिकामेच वर येत होते. कदाचित कुठल्या एका प्रयत्नात ते तिच्या हातात येईल, पण नाही ..नाही येत होते ते तिच्या हातात. हतबल झाली ती, एक जोरात आर्त किंकाळी तिच्या तोंडातून निघाली. पण त्या चार भिंतींमध्ये ती कुणालाच ऐकू गेली नाही. रडत होती ती ..तिचं मन रडत होते ,तिचे डोळे वाहत होते.. समोरच बाळही रडत होते..

तेवढ्यात तिला बाल्कनीत कोणीतरी आहे. कोणीतरी बोलत आहे अस़ वाटलं, ती बाल्कनीत गेली .तिथे एक मुलगी फोनवर कुणाशी तरी हसून खिदळून बोलत होती.

"....सुवर्णा... "तिने जोरात आरोळी ठोकली. "सावी तिकडे रडतेय आणि तू इथे फोनवर बोलून राहिली आहेस .....जा माझ्या सावीला बघ.. उचल तिला..." पण त्या मुलीवर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम नाही झाला. तिच्या कानावर तिचे शब्द पडलेच नव्हते, तीने पुढे जावून फोन खेचण्यासाठी हात पुढे केला, पण तो हातात आलाच नाही.ती कोसळली.. परत कोसळली . तशीच गुडघ्यावर तिथेच बसून हमसाहमशी रडायला लागली .आत मध्ये तिचं बाळ रडत होतं आणि बाहेर ती ..
अचानक तिला काहीतरी आठवले ती उठली आणि भरभर जीना चढून वर गेली एका रूम मध्ये
तिने इकडेतिकडे बघितलं.

"अनि.. अनि.. कुठे आहात तुम्ही अनि...? अनि बाथरूम मध्ये आहात का... ?अनि..तुम्ही गॅलरीत आहात का...? अनि कुठे गेलात...? अनि सावी रडतेय हो... आपली.. ! अनि अनि
कुठे गेला तुम्ही..? आपल्या बाळाला असे एकटेच सोडून ...अनि अनि आपली सावी रडतेय हो.."अश्रू अखंड वाहत होते तिचे, परत तीला काहीतरी आठवले परत ती भरभर जीना उतरून खाली आली, एका कोपऱ्यातल्या रुम मध्ये गेली. तिथं एक सत्तर ऐंशी वर्षाची स्त्री आरामखुर्चीवर बसून पुस्तक वाचत होती.

"आजी.. आजी.. उठा ना.. सावी रडतेय हो... ती सुवर्णा तीच्याकडे लक्ष नाही देत.. आजी आजी माझ्या सावीला बघाहो ..तिला घ्या हो.." पण आजींच्या कानावर तिचे हे शब्द पडत नव्हते .परत हतबल झाली ती.. घरभर सैरावैरा पळत होती. कुणी दिसते का? कुणाला मी दिसते का ?कुणाला मी ऐकू जाते का? बघत होती पण तिला कोणीच भेटत नव्हते, ना किचनमध्ये.. ना गार्डनमध्ये कोणीच नव्हते त्या दिवशी घरात आणि असते तरी तिला कुणी ऐकू शकले असते का...??

एवढी हतबल , एवढी दुःखी याआधी ती कधीच झाली नव्हती खूप सुखी संसार होता तिचा .ती तिची सावी आणि नि ...सर्व काही क्षणार्धात बदलले...

ऋतू बदलत जाती,
अवखळ क्षण हे निसटत जाती,
आज सोबतीला आहे जे,
उद्या सोबत सोडूनही जाती..
ऋतू बदलत जाती....

*****

क्रमक्षः

भेटूया पुढच्या भागात...

धन्यवाद..

©® शुभा.