shitu books and stories free download online pdf in Marathi

शितू

शितू


मध्यंतरी दोन दिवस शितू वाचली, गो.नि. दांडेकरांची. त्यांनी प्रस्तावनेत लिहिलय, दोनेक वर्ष शितू माझ्याजवळ होती. आता तिची पाठवणी करतोय. लेखक आपल्या कलाक्रुतीवर लेकरासारखं प्रेम करतो तेच प्रतित झालं त्यातून आणि मग उलगडलेल्या प्रत्येक पानातून.

पापभिरु अप्पा एका कुळवाड्याचं घर जळत असताना त्या आगीत शिरुन कुळवाड्याच्या म्हातारीचं गाठोडं बाहेर आणतात. यात त्यांची पाठ बरीच भाजते.ते आजारी पडतात तर बायको अन्नाचा कणही ग्रहण न करता त्यांची सेवा करते. थोरला किरपन मुलगा सदू.

धाकट्याच्या वेळेला गरोदर रहाते पण क्षयाने ग्रस्त ती बाळाला अप्पांकडे सोडून जाते. हाच तो विशू, दांडगट असतो, खोडसाळ असतो. अभ्यासात लक्ष नसतं याचं.

शितू एका कुळवाड्याची लेक. बालविवाह होतो तिचा नि दुसऱ्याच दिवशी नवरा गतप्राण होतो.तिला माहेरी आणून सोडतात.मग तिचे वडील एका तिशीच्या बाप्यासोबत तिचं न्हावेर लावतात पण तोही दर्यात डुबतो. घो खाई नाव पडतं शितूला. बाप विहिरीत टाकायला न्हेतो तर विशू आडवा येतो, अप्पा आडवे येतात. शितूची सुटका होते. शितूच्या वडलांनंतर भाग्या नावाचा कुडवाळी म्हातारा तिला आश्रय देतो. अप्पा तिचे वडील होतात. तिला विद्या शिकवतात, तिच्या कोवळ्या मनावर संस्कार करतात.

विशू तिचा सवंगडी होतो. विशूला बऱ्याचदा ती मारापासनं वाचवते. एकदा तर विशू वानराला मारण्यासाठी बंदूक घेऊन जातो. शितू मधे येते. बंदुकीतनं छर्रा तिच्या हातीला लागून जातो. हात रक्तबंबाळ होतो. आप्पा विशूला रागे भरतील म्हणून शितू सांगते, वानरांनी हात फोडला. अशी ती दोघं जवळ येत असतात. त्यांची मैत्री सदूला खूपते कारण शितू कुळवाड्याची पोर असते.

एकदा विशू एका गरीब बाईच्या झाडाची रामफळं काढायला जातो. शितू त्याला रोखते. तो आदळआपट करत तिथून निघतो नि एकाच्या अननसाच्या बागेत शिरतो. तिथेही वादावादी होते, शितू त्याला अडवते तर तो शितूवर लाथाबुक्क्यांनी प्रहार करतो. नेमकं सदूचं ऐकून अप्पा तिथे येतात. त्यानंतर अप्पा विशूशी बोलत नाहीत व शितूलाही बोलू देत नाहीत विशूशी. विशूला शितूचा अबोला असह्य होतो.

अप्पा विशूच्या मामास पत्र पाठवून विशूला घेऊन जा म्हणून सांगतात. रागावलेला विशू मामांसोबत जातो. जाताना शितूला निरोप देत नाही. शितू फार दु:खी होते. अप्पाही दु:खी होतात. विशू तिथे मामीच्या प्रेमळ छत्रछायेखाली शिकतो, मेट्रिक होतो नि मग गावी येतो. उंचापुरा विशू पाहून शितू मोहित होते तर वीसेक वर्षांची तरुणी शितू पाहून विशू तिच्यासाठी वेडा होतो.

गावात गंगा आली असते. त्यानिमित्ताने देवळात नाटक चालू असतं. शितूही कडेला जाऊन बसते. कंदीलाच्या उजेडात तिला दिसतं की विशू तिच्याकडेच पहातोय. तिला कसंसच होतं. ती पळतपळत झोपडीत येते. विशूही तिच्या मागून येतो तशी मागीलदारी आंब्याकडे वळते. विशू तिला शोधून निघून जातो.

त्याच रात्री अप्पा नाटकाहून घरी परतले असता मागिलदारी लघुशंकेस जातात. तिथे अंधारात त्यांचा पाय तांबड्या नागावर पडतो. नाग त्यांना दंश करतो. ते हेलपाटतात. विशू रे, शितू गो अशी आर्त हाक आंगणात जमलेल्या पाहुण्यांना ऐकू येते. पाहुणे त्यांना उचलून ओसरीवर आणतात. वैद्य अप्पांना तपासतात पण व्यर्थ.

पहाटे शितूला भाग्या उठवून अप्पांबद्दल सांगतो. शितू धावत जाते. अप्पा़कडे पहाताच तिला कळतं की आता आपण पुर्णपणे अनाथ झालो आहोत. ती हंबरडा फोडते पण विशू म्हणतो, शितू वेडी की काय तू अप्पांना झोप लागलीय.

सगळे शितूला सांगतात विशूला सावर म्हणून कारण विशू त्यांना सांगत असतो की खबरदार,कुणी अप्पांना हात लावाल तर. शेवटी कशीबशी शितू विशूला समजावते. आईच्या मायेने त्याला मांडीवर घेते. ऩतरही तीच विशूचं सारं करत असते पण सदूला तिचा वावर खपत नाही. तो वाटणी करुन घेतो नि दुसरीकडे रहायला जातो. विशूचं नि शितूचं एकत्र रहाणं काही कुचाळक्या करणाऱ्यांना पटत नाही.

शितू तिच्या मामीकडे रहायला जाते पण विशू इकडे आजारी पडतो. भाग्या शितूला बोलवायला जातो. नदी पार करुन येताना शितू बुडते. भाग्याला एकटाच आलेला पाहून विशू विचारतो, शितू कुठेय? तर तो सांगतो शितू तुम्हाला भेटायला येत होती पण नदीत बुडाली. विशू नदीच्या सगळ्या अंगांनी शितूला शोधतो. अखेर पहाटे फुगलेला शितूचा अचेतन देह वरती येतो.

दांडेकरांची शितू खरंच शब्द न शब्द वाचावी अशी आहे. मधुर भाषाशैली आहे त्यांची.

--गीता गरुड.


Share

NEW REALESED