Shyamachi Patre - 1 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 1

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र पहिले

कधी पाहीन मी ते दृश्य बरें !प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वादतूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते ! तूं म्हणालास, ' होय. मी त्या संघांत आहें. परंतु माझ्यावर रागावूं नका. माझी कींव करा. माझी चूक मला आज कळली. तुमच्या व्याख्यानानें नवीन दृष्टि मिळाली. माझा एकांगीपणा गेला.' तुझे ते शब्द ऐकून सध्दित झालों होतों. तुझा हात मी हातांत घेतला. तुझ्याकडे आशावादी दृष्टीनें मी पाहिलें. तुझ्या पाठीवरुन मी हात फिरविला व म्हटलें ' वसंत, आतां माझ्या काँग्रेसच्या झेंडयाखालीं ये. तूं काँग्रेसचा हो. तिची सेवा कर; भक्ती कर. काँग्रेसची सेवा म्हणजे भारताची सेवा. भारताची पवित्र परंपरा जर कोणी चालवीत असेल, त्या परंपरेंतील चांगले घेऊन जर कोणी पुढें जात असेल तर ती काँग्रेस होय. भारताचा आत्मा जर कोणी ओळखला असेल तर तो काँग्रेसनें. भारतीय इतिहासांतील सोनेरी धागा हातीं घेऊन जर कोणी नवीन इतिहास घडवित असेल तर ती काँग्रेस होंय. ' वसंता, त्या सभेनंतर तुझी-माझी भेट परत झाली नाहीं. तुझा पत्ता मिळेना. परंतु तूं माझ्या डोळयांसमोर अनेकदा येत असस, आणि आज अकस्मात् पत्र मिळालें. जणूं हरवलेलें निधान सापडलें. पत्र वाचून किती आनंद झाला ! तुझी मूर्ति पुन्हां डोळयांसमोर आहे असें वाटलें. तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून दिलास, हें वाचून अपार समाधान झालें. भ्रामक जाळयांतून मुक्त झालास. डबक्यांतून बाहेर पडलास. मला भीति वाटत होती. हा दिलदार व उदार वृत्तीचा तरुण मुलगा जातीय चिखलांत फसतो की काय, अशी शंका मनांत येई. परंतु तुझी ती त्यावेळची कावरी-बावरी वृत्ति आठवून पुन्हां वाटे कीं हा तरुण सत्पथावर येईल. मी ईश्वरची प्रार्थना करीत असें कीं माझा वसंत संकुचित वृत्तीचा न होवो. देवानें का ती प्रार्थना ऐकली?

वसंता, मी देवाची एकच प्रार्थना करीत असतों कीं ' या देंशांतील तरुणांस सदबुध्दि दे. अखंड भारताचे सारे सच्चे उपासक होवोत. हिंदु-मुसलमान एक होवोत. क्षुद्र भेद नष्ट होवोत. तरुण लोक अनुदार व संकुचित वृत्तीचे न होवोत. माझ्या काँग्रेसला यश येवो. कारण ती सर्वांचे कल्याण करू पहात आहे. तिच्या झेंडयाखालीं नवभारत उभा राहूं दे आणि जगाचे डोळे दिपूं देत.' तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडलास एवढयानें तुझें कर्तव्य पुरें झालें असें नाही. आपण वाईटाचा त्याग केलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर सत्कर्माचाहि आरंभ केला पाहिजे. तूं संघ सोडलास. ठीक. परंतु एवढयानें भागणार नाहीं. पूर्वीं तूं ज्या तळमळीनें संघाची सेवा करीत होतास, त्याच तळमळीनें तूं आतां काँग्रेसची सेवा कर. तूं म्हणशील मी कोणती सेवा करुं? सेवा अनेक प्रकारची पडली आहे. महात्माजींनी सेवेची अनेक क्षेत्रें उघडी केलीं आहेत. त्या महापुरुषानें जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रकाश पाडला आहे. ख्रिस्त एकदां लोकांना म्हणाला, ' अरे इकडे या. कोळी जाळें टाकतो व मासे पकडतो. परंतु मी माणसें पकडतो. माणसें कशी पकडावीं तें मी दाखवतो. या इकडे. 'महात्माजी जणूं तसें सांगत आहेत. त्या महापुरुषाच्या प्रतिमेला अंत नाहीं. नवीन नवीन कामें, नवीन नवीन उद्योग ते दाखवीतच आहे. हें काम नसेल आवडत तर तें घ्या असें ते सांगत आहेत. खादीचें काम घ्या; हरिजनसेवा करा; साक्षरता-प्रसार हाती घ्या; स्वच्छतेचे धडे दया; राष्ट्रभाषा सर्वंत्र न्या; हिंदुमुस्लीम-ऐक्याचे पुरस्कर्ते बना; दारु बंदी करा; ग्रामोद्योग उचला; मधुसंवर्धन विद्या शिका; वर्धा शिक्षण पध्दतीचे प्रयोग करा; शेतक-यांची-कामगारांची काँग्रेसला अविरोधी अशी संघटना करा. एक का दोन, अनेक कामें आहेत. परंतु वसंता, यांतील एखादें काम घेऊन तूं बसावेंस असें सध्यां मला वाटत नाहीं. महात्माजींनी सेवेचीं अनेक क्षेत्रें दाखविलीं आहेत. परंतु सेवकांची उणीव आहे. आपापल्या आवडीचीं सेवेचीं कामें उचलतील असे हजारों तरुण दृष्टीस पडत नाहींत. सेवकांचा पुरवठा कसा होईल हा माझ्यासमोर प्रश्र आहे. आज कांही कष्टाळू थोर सेवक ठायी ठायीं ही सेवेचीं कामें करीत आहेत. सेवेचे स्थिर असे नंदादीप ठायीं ठायीं हीं लावीत आहेत. ती महत्त्वाची गोष्ट आहे यांत शंका नाहीं. जनतेंत सेवेच्या द्वाराच सर्वांनीं गेलें पाहिजे. समज, एखाद्या जिल्हयांत दहा कार्यकर्ते दहा ठिकाणीं कोणती तरी एक सेवा हाती घेऊन तेथें पाय रोंवून उभे आहेत. याचा काय परिणाम होईल? मी एका खेडेगांवांत एक काम घेऊन बसलों आहें. रोज लोकांशीं संबंध येत आहे. मी त्यांच्यांत उठत आहें, बसत आहें. आजारीपणांत सेवा करीत आहें. मुलांना शिकतीत आहें. अन्यायाची दाद लावीत आहें. तर हळू-हळू माझ्याभोंवती पांचपन्नास माणसें निष्ठेचीं जमा होतील. त्यांचे माझे निकट संबंध येतील. एक भ्रातृमंडळ जणूं निर्माण होईल. आणि उद्यां चळवळ झाली तर माझ्या पाठोपाठ ही सारी मंडळी येईल. मी म्हणजे पन्नास माणसें असे दहावीस कार्यंकर्ते जिल्हयांत असतील तर त्यांच्यापाठीमागें हजार सेवक, हजार सैनिक उद्यां येतील. महाराष्ट्रांत असे शंभर कार्यकर्ते जर स्थिरतेनें कार्य करतील तर दहा हजारांची सत्याग्रही सेना ते उभी करतील. अर्थात, हे शंभर सेवक निष्ठेने निरहंकारपणे सेवा करीत राहिले तर.

असे सेवक ही मोठी शक्ति आहे. परंतु सेवेला सर्ववेळ देणा-या अशा सेवकांना साथ द्यायला शेंकडो हजारों दुय्यम सेवक उभे राहिले पाहिजेत. सेवेचें वातावरण, सेवेचा ध्यास, ध्येयवादित्वाची हवा, राष्ट्रीयत्वाचा विचार सर्वत्र नुसता भरुन राहिला पहिजे. आणि हें कशानें होईल?सेवादलासारख्या संस्थेच्या प्रसाराने हें कार्य होईल असें वाटतें. काँग्रेसच्या सेवादलाची प्रचंड संघटना उभी केली पाहिजे. सेवादल सर्वत्र सेवेची आवड उत्पन्न करील. खेळ खेळतां खेळतां, कवाईत करतां करतां राष्ट्रीयत्वाची अमर भावना सर्वांना शिकवील. आपण कांही तरी फावल्या वेळांत केलें पाहिजे, ही भावना सेवादल सर्वांच्या मनावर बिंबवील. सेवादल सेवकांचा पुरवठा करील, आणि मुख्य म्हणजे व्यापक व उदार अशी ख-या राष्ट्रीयत्वाची कल्पना नव-तरुणांच्या मनांत रुजवील, नवीन तरुणांच्या हृदयात शुध्द राष्ट्रीयतेची सर्वसंग्राहक, अशी विशाल दृष्टि नसेल तर उद्यां नवभारत कसा उभा राहाणार?वसंता, म्हणून तुला मी काँग्रेसच्या सेवादलास वाहून घे, असें सांगत आहें, तू राहातोस तेथें नाही ना शाखा? कर सुरु. आरंभी अडचणी येतील. मुलें मिळणार नाहींत. परंतु अडचणींतूनच जावें लागतें. आपल्या श्रध्देची अशा वेळेसच कसोटी असते. श्रध्देचे चार लोक एकत्र आले तर ते शेवटी जगाला भारी होतात. विवेकानंद म्हणत असत, 'मला श्रध्देचीं एक हजार माणसें द्या. सिंहाच्या छातीची एक हजार माणसें द्या. सा-या हिंदुस्थानचामी कायापालट करुन दाखवितो. ' जगांत ज्यांनी ज्यांनी प्रचंड संघटना केल्या, त्या कांही एकदम नाही उभ्या राहिल्या. मोठीं कार्ये हळूहळूच वाढतात. दोनतीन मुली घेऊन कर्मवीर कर्वे यांनी स्त्रीशिक्षणास आरंभ केला. आज स्त्रियांचे विद्यापीठ उभें आहे ! श्रध्देचा मनुष्य उभा राहातो. ध्येयावर दृष्टि ठेवून पहिलें पाऊल टाकतो ! महाराष्ट्रांतील इतिहास-संशोधक मंडळ आहे ना? आज त्याचा व्याप खूप वाढला आहे. परंतु तें स्थापन करतांना एकटे राजवाडेच होते ! तेच अध्यक्ष, तेच चिटणीस, तेच सर्वं कांही, एके दिवशी विश्वनाथ काशिनाथ राजवाडे एका खोलींत बसले, आणि इतिहास संशोधक मंडळ त्यांनी सुरु केलें ! त्यांनी त्या दिवशी एक निबंध वाचला. त्यांनीं स्वत:च तो ऐकला. ऐकायला दुसरें कोंण होतें? तेथील भिंती होत्या, आणि ज्या पूर्वजांनी पराक्रमी व वैभवशाली इतिहास निर्माण केला ते स्वर्गस्थ पूर्वज कदाचित गुप्त रुपांने तेथें येऊन ऐकत असतील. वसंता, श्रध्देची माणसें अशा रींतीनें कर्मप्रवृत्त होत असतात. अरें, दह्याचा एकच थेंब, परंतु तो मणभर दुधाचें दहीं करतो ! परंतु तो थेंब आंबट हवा. त्याचप्रमाणें कडव्या वृत्तीचा, अढळ श्रध्देचा, एकच मनुष्य, परंतु तो सर्वांना वेड लावतो, ध्यास लावतो, ध्येयाकडे खेंचतो.

वसंता, तूं करशील का सेवादल सुरु? काँग्रेसच्या सेवादलांत हजारों लाखो तरुण मी कधीं बरें पाहीन? हाच एक ध्यास मला आहे. माझ्या काँग्रेसला कोणत्याहि बाबतींत कमीपणा नसावा. 'तुमंच्या काँग्रेसच्या सेवादलांत किती तरुण आहेत? 'असा जर कोणी प्रश्न विचारता तर 'लाखों' असें उत्तर देतां आलें पाहिजें. परंतु असें कधी होईल, खरेंच कधी बरें होईल?

काँग्रेसचा आज साठ वर्षांचा इतिहास आहे. काँग्रेसचा इतिहास हें पुस्तक तूं वाचले असशील. आरंभी काँग्रेस किती लहान होती, परंतु ती आज किती महान् झाली आहे ! इतक्या वर्षात काँग्रेसनें स्वयंसेवक दलें स्थापण्याचे प्रयत्न का कधीं केले नाहींत? केले असे प्रयत्न अनेकदां केले. परंतु परकी सरकारचा पुन:पुन्हां या संघटनांवर रोष होई. पुन: पुन्हां या संघटना नष्ट होत. वंगभंगाच्या चळवळींच्या वेळेस १९०६ ते १९०८ सालच्या काळांत स्वयंसेवकदलें स्थापण्याचे पहिले प्रयत्न झाले. व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यानें बंगालचे दोन तुकडे केले म्हणून प्रचंड चळवळ सुरु झाली होती. त्याच काळात जपाननें रशियाचा पराभवं केला होता. आज जपान म्हणजे सत्तांध असें एक सैतानी राष्ट्र झालें आहे. परंतु त्यावेळच्या जपानी विजयानें पौर्वात्य देशांत एक प्रकारचें नवजीवन संचरले. आपणहि पाश्चिमात्यांचा पराजय करूं शकूं, असा आत्मविश्वास आला. हिंदी चळवळीवर जपानी विजयाचा असाच परिणाम झाला. एक प्रकारचें नवतेज राष्ट्रांत आलें. बंगालमध्ये पुलिनबाबूंनीं तरुणांची मोठी संघटना उभी केली. पुलिनबिहारी उंच होते. त्यांचे डोळे अत्यंत तेजस्वी होते. ते शिंग फुंकीत, बिगुल वाजवीत तें दहा मैलांवर ऐकूं जाई ! महाराष्ट्रांतहि त्या वेळेस कवायती सुरु झाल्या होत्या. परंतु सरकारी दडपशाहीचा वरवंठा फिरुं लागला. सा-या कवायती थांबल्या. सा-या संघटना बेकायदेशीर ठरविण्यांत आल्या.त्यानंतर १९२० चा काळ आला. महात्माजींची पहिली असहकाराची चळवळ सुरू झाली. शाळा-कॉलेजें सोडून विद्यार्थी बाहेर पडले. विदेशी मालावर निरोधन करण्याकरतां स्वयंसेवक पथकें उभीं राहूं लागलीं. सरकारने स्वयंसेवक दलें बेकायदा ठरवली तेव्हां काँग्रेसनें 'स्वयंसेवक दलांत सर्वांनी सामील व्हा ' असा आदेश दिला. स्वयंसेवकांना तुंरुगातून डांबण्यांत आलें. बावीस हजारांवर लोक तुरुंगात गेले. कांही ठिकाणी फटकेहि मारण्यांत आले. आणि पुढें नागपूरचा झेंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यासाठी सर्व हिंदुस्थानातून स्वयंसेवक येऊं लागले. अशा या चळवळींतून संघटना उभी राहात होती. परंतु तिला व्यवस्थित स्वरुप नव्हते. स्वयंसेवकदलास संघटित स्वरुप देण्याचें काम डॉ. हर्डीकर यांनी प्रथम सुरु केलें. डॉ. हर्डीकर पूर्वी अमेरिकेंत होते. तेथें लाला लजपतराय यांचे ते सहकारी होते. हिंदुस्थानांत आल्यावर त्यांनी ही तरुण संघटना हाती घेतली. हर्डीकर व हिंदुस्थानी सेवादल यांचा अविभाज्य असा संबंध आहे. ही संघटना वाढत असतांनाच हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे की नाही हें पाहण्याकरितां सायमन कमिशन हिंदुस्थानांत आलें. १९१७-१८ मध्यें ज्या वेळेस मॉटेग्यु-चेम्सफर्ड सुधारणा प्रथम जाहीर झाल्या, त्या वेळेस दर दहा वर्षांनी हिंदुस्थानच्या लायकीची परीक्षा घ्यायची असें ब्रिटिश पार्लंमेंटने ठरविले होतें ! हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे की नाही हें का ब्रिटिशांनी ठरवावयाचें? एडमंड बर्क म्हणून एक मोठा ब्रिटिश मुत्सद्दी होऊन गेला. त्यानें सरकार चांगले की वाईट हें ठरविण्याच्या दोन कसोटया सांगून ठेविल्या आहेत ----

१ - देशाचें उत्पन्न वाढलें असेल व जनतेची आयुर्मर्यादा वाढली असेल तर तें सरकार चांगलें.२- देशाचें उत्पन्न घटलें असेल व आयुर्मर्यादा कमी झाली असेल तर तें सरकार वाईट. हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीस ही कसोटी आपण लावून पाहूं तर काय दिसेल? लोकांचे सरासरी उत्पन्न दीड ते दोन आणे आहे. आणि हिंदुस्थानांतील सरासरी आयुर्मर्यादा २२ वर्षांची आहें. एडमंड बर्क म्हणेल, 'हिंदुस्थानांतील ब्रिटिश राजवट कुचकामी आहे. !' आणि इतर अनेंक दृष्टींनीं पाहूं तरी हेंच दिसेल. धंदे बुडाले. बेकारी वाढली. कर वाढले. भांडणे व भेद माजले. शेंकडा ९० लोक निरक्षर. असा हा ब्रिटिशांनी निर्मिलेला हिंदुस्थान आहे ! आणि अशांनी पुन्हां हिंदुस्थान स्वराज्यास लायक आहे कीं नाहीं हे. पहायला येणें म्हणजे दु:खावर डागणी देणें होतें. जखमेवर मीठ चोळणें होतें. सायमन कमिशनवर काँग्रेसनें बहिष्कार घातला. काळीं निशाणे हातांत घेऊन 'सायमन, चालते व्हा' अश घोषणा करीत प्रचंड मिरवणुका निघाल्या. लाला लजपतराय, जवाहरलाल, गोविंद वल्लभ पंत अशा सारख्यांवर लाठयांचे हल्ले झाले. लालाजी या मारानेंच पुढें मरण पावले. ते म्हणाले, 'माझ्यावर पडलेला प्रत्येक घाव म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या शवपेटिकेला ठोकलेला खिळा होय!' देशांत पुन्हां चैतन्य आलें. आणि पुढें काँग्रेसनें स्वातंत्र्याचा ठराव केला. १९३० च्या २६ जानेवारीस सर्व हिंदुस्थानभर हा स्वातंत्र्यदिन पाळला गेला. तेव्हांपासून आपण दरवर्षीं तो पाळतों. आणि पुढें महात्माजींनी दांडी-यांत्रा सुरू केली. त्यांनी मिठाचा कायदेभंग केला. हिंदुस्थानभर कायदेभंग सुरु झाला. ठिकठिकाणी सत्याग्रही छावण्या सुरू झाल्या. तेथें कवायती होऊ लागल्या. डॉ. हर्डीकरांच्याजवळची शिकलेली मंडळी सर्वत्र उपयोगास आली. पुढे १९३१ च्या प्रारंभी सरकारने काँग्रेसजवळ मिळतें घेतलें. आणि ३१ च्या कराची काँग्रेसनंतर स्वयंसेवकदलांस पुन्हां जोर चढला ! डॉ. हर्डीकर, जवाहरलाल वगैरेंनी पुढाकार घेतला. कवायतींची हिंदी भाषा ठरली. महाराष्ट्रांतील कांहीं तरुण कर्नाटकांत डॉ. हर्डीकर यांच्या छावणींत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढें ३१ च्या डिसेंबरांत विलेपार्लें येथें सेवादलाची छावणी सुरू झाली. परंतु इतक्यांत महात्माजी इग्लंडहून मुंबईस आले. लगेच त्यांना अटक झाली. आणि या छावणीतील सैनिक त्वरेने आपापल्या जिल्हयांत परत गेले. स्वयंसेवकदलें पुन्हां बेकायदा झालीं. १९३४ पर्यंत काँग्रेसचा लढा सुरू होता. नंतर लढा थांबला. पुढें १९३६ मध्यें फैजपूर येथे काँग्रेस भरायची होती. तिच्यासाठी महाराष्ट्रांत ठिकठिकाणी स्वयंसेवक तयार करावे लागले. पुढें काँग्रेस मंत्रिमंडळें आलीं. स्वयंसेवक दलांची संघटना आतां वाढेल असें वाटलें. ह्या काळांत काँग्रेसनें जर निष्ठेनें व आपुलकीच्या भावनेनें ही संघटना हातीं घेतली असती तर किती छान झालें असतें ! संयुक्त प्रांतांत एक लक्ष काँग्रेस स्वयंसेवक तयार करण्याची योजना केली गेली. परंतु महाराष्ट्रांत काय होतें? आमच्याकडे चालू झालेली स्वयंसेवक दलेंहि थंडावली. याचें कारण काय?

पुण्यासारख्या शहरांतून काँग्रेसची स्वयंसेवकदलें सुंदर रीतींने सुरु झाली होती. परंतु एक गोष्ट होती. ही स्वयंसेवक दलें चालविणारे कार्यकर्ते पुष्कळ वेळां समाजवादी असत. महाराष्ट्रांतील काँग्रेसच्या पुढा-यांस या गोष्टीची भीति वाटली. ही तरुण संघटना पुढें मागें समाजवादी तरुणांच्या हातीं जाईल, असें त्यांना वाटलें. अशी समाजवादी संघटना काय कामाची? यापेक्षां संघटना नसली तरी चालेल, असे त्यांना वाटलें. स्वयंसेवक दलास उत्तेजन देण्याचें त्यांनी बंद केलें, परंतु तरुणांना-विद्यार्थ्यांना कोणती तरी संघटना हवी होती. कवाईत, खेळ, एकत्र येणे, गणवेश, बँड या गोष्टी त्यांना आकर्षित होत्या. आणि या गोष्टी जेथें त्यांना दिसल्या तेथें ते जाऊं लागले. काँग्रेसची सेवादल संघटना जवळजवळ बंद पडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या जातिनिष्ठ संघटना फोंफावल्या. महाराष्ट्रांतील काँग्रेसचे सूत्रधार भ्रमांत राहिले. जातीय संघटना वाढत होती तरी त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलें. काँग्रेसच्या सेवादलांत समाजवाद थोडा फार आला असता तर काय बिघडले असतें? जातीयवादापेक्षां का समाजवाद वाईट आहे? काँग्रेस हळूहळू समाजवादाकडेच जात आहे. महात्माजींनीं सुध्दां एके ठिकाणी लिहिलें, ' या वरीष्ठ वर्गांना मी कंटाळलों. त्यांच्या बाबतींत मी निराश झालों ब्रिटिशांचे ते आधारस्तंभ आहेत. ते आपलें हें स्वरूप सोडतील अशी आशा नाहीं. तेव्हां या पुंजिपतींच्या स्तंभाखालची आधारभूत अशी बहुजन समाजाची शक्ति ती आतां मी उठवतों, म्हणजे ब्रिटिशांचे हे हिंदी आधारस्तंभ कोलमडून पडतील व ब्रिटिश सत्ताहि गडगडेल.' काँग्रेस हळूहळू का होईना समाजवादाकडेच जात आहे. जवाहरलालांसारखे पुढारी हें सांगत आहेत. महात्माजींनीं एकदां त्रावणकोर दरबारला लिहिलेल्या पत्रांत म्हटलें होतें कीं ' सर्वच्या सर्व समाजवाद कांही वाईट नाहीं. ' तसेंच श्री. महादेवभाईंनीं एकदां हरिजनमध्यें लिहिलें होते कीं, ' उद्यां समजा निवडणुका आल्या; जमीनदारी नष्ट करूं; जमीन वांटून देऊं; मोठे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे करूं; असा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करून जर एखाद्या पक्षानें निवडणुकींत बहुमत मिळविले व पुढें कार्यक्रमाप्रमाणें तो पक्ष कायदे करुं लागला तर त्यांत आक्षेपार्य काय आहे?''वसंता, आजच या पत्रांत मी फार खोल जात नाही. सांगायचें एवढेंच की महाराष्ट्रांत समाजवादाच्या भ्रामक भीतीनें काँग्रेसच्या चालकांकडून सेवादल संस्थेची उपेंक्षा केली गेली. परंतु आज जातीय संघटनेची शहरोशहरीं प्रचंड जोर पाहून महाराष्ट्रांतील काँग्रेस कार्यकर्त्यांची दृष्टि निवळली आहे. आणि सेवादलाकडे पुन्हां लक्ष दिले जात आहे. भाईं एस्. एम्. जोशी या कामासाठी सर्वंत्र हिंडूफिरूं लागले आहेत. सेवादलाच्या छावण्या ठायीं ठायीं सुरु होत आहेत. शिक्षण दिलें जात आहे. ही संघटना वाढवणार, फोंफावणार असें माझ्या दृष्टीस दिसत आहे.वसंता, तूंहि आरंभ कर. तुझ्याभोंवतीं तरुण जमतील. तुझ्यांत तो गूण आहे. तूं दुस-यांची मनें ओढून घेशील. तूं मनमिळाऊ आहेस. बोलका आहेस. गोष्टी सांगतोस. गाणीं म्हणतोस. दुस-यांच्या उपयोगीं पडतोस. तुझें सेवादल उत्कृष्ट चालेल.

आणि मरतुकडें सेवादल नको. सेवादलास सर्व कांही हवें. बँडहि हवा. मुलांना हें सारें हवें असतें. यासाठीं पैसे हवेत. कोठून आणायचे पैसे? सारीं सोंगें आणतां येतात, परंतु पैशाचें सोंग आणतां येत नाहीं. मला पुष्कळ वेळां वाटतें कीं २६ जानेवारीला आपण स्वातंत्र्य-दिन पाळतों. त्यादिवशी हजारों ठिकाणीं आपण सभा घेतों. त्या सभांतून त्या दिवशीं सेवादलासाठीं मदत गोळा करावी. आधीं जाहीर करुन ठेवावें कीं प्रत्येकांनें जास्तींत जास्त मदत सेवादलासाठी आज आणावी. एक चादर पसरून ठेवावीं. सर्वांनीं तिच्यावर आणलेली मदत टाकावी. किंवा सेवादल स्थापनेचा दिवस पाळावा. आणि त्या दिवशीं दलांतील प्रत्येकानें जास्तींत जास्त मदत आणून द्यावी. काँग्रेसच्या सेवादलाविषयीं ज्यांना ज्यांना म्हणून आपलेपणा वाटत असेल त्या सर्वांनी त्या दिवशीं देणगी द्यावी. काँग्रेसविषयीं जनतेंत अपार श्रध्दा आहे. स्वातंत्र्यासाठीं पुन:पुन्हां वनवास भोगणारी, आगींतून जाणारी थोर काँग्रेस संस्था ! त्या काँग्रेसचेंच सेवादल हें अत्यंत महत्वाचें असें एक अंग आहे. हे अंग अत:पर मरतां कामा नये. त्याची उपेक्षा होतां कामा नये. जनतेनें सेवादल मरूं देऊं नये. ते वाढीस लावावें. पालकांनी या सेवादलांतच मुलें पाठवावी. मदत द्यावी. होईल, असें होईल. 'सत्य संकल्पाचा दाता भगवान ! ' ही माझी श्रध्दा आहे. सेवादल वाढणार यांत शंका नाहीं. महाराष्ट्रभर ठायीं ठायीं सेवादलाच्या शाखा होणार. माझ्या डोळयाला तें दिव्य दृश्य दिसत आहे. खरी निर्दोष राष्ट्रीयता सर्वत्र जाईल. जातीयतेचा अंधार दूर होईल.वसंता, आज पुरें, किती तरी वेळ हें पत्र मी लिहीत आहें. बाहेर बरीच रात्र झाली आहे. दूरच्या स्टेंशनवरील घंटा ऐकू येत आहे. जणूं दूर असलेल्या ध्येयाची हांकच कानी येत आहे. ऊठ, कामास लाग, असें जणूं तें सांगत आहे. ज्याला ध्येयाची हांक ऐंकू येते तो धन्य होय. ती हांक ऐकून जो कार्यार्थ प्रवृत्त होतो, त्या ध्येयाला गांठण्यासाठी सर्वस्व द्यायला तयार होतो, तो धन्यतर होय. वसंता, तूं असा एक ध्येयार्थी तरुण हो. तूं होशील अशी मला आशा आहे. आणखी काय लिहूं? तुझ्या सर्व लहान मोठया मित्रांस माझे सप्रेम प्रणाम.तुझा श्याम