Shyamachi Patre - 4 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 4

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र चवथे

भारताचा स्वधर्म ओळखाप्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.मी मागें एकदां एका खेडेगांवात गेलों होतों. रात्रीची वेळ होती. गांवांतील लोक कसली तरी पोथी वाचीत होते. मी त्यांना नम्रपणें म्हटलें, ''आज काँग्रेसची पोथी वाचावयास मी आलों आहें. आजच्या दिवस तुमची पोथी राहूं दे. आज माझी ऐका.'' त्यांनीं ऐकलें. मी माझें काँग्रेसचें आख्यान सुरू केलें. काँग्रेस म्हणजे माझें दैवत. देवाजवळ कोणाला मज्जाव नाहीं. देव सर्वांचा. त्याप्रमाणें काँग्रेसजवळ सर्वांना वाव आहे. सर्वांना तेथें अवसर आहे. काँग्रेस म्हणजे माझें रामनाम. मरतांना माझ्या तोंडांतून 'राम राम' असे शब्द कदाचित् नाहीं येणार. परंतु 'काँग्रेस काँग्रेस' असें शब्द येतील. आणि त्यांत काय बिघडलें? काँग्रेस सर्वांचे कल्याण करूं पहात आहे. म्हणून काँग्रेस हें देवाचेंच नांव. महात्माजी एकदां म्हणाले होते, ''चरका हें माझ्या देवाचें नांव.'' देव तरी शेवटीं कोठें आहें? तुकाराम महाराजांनी सांगितले आहे 'जे का रंजलें गांजले ! त्यांसी म्हणे जो आपुलें !! तोचि साधु ओळखावा ! देव तेथेंची जाणावा !! 'आज देव माझ्या काँग्रेसजवळ आहे. कारण ती कोणत्याहि एका वर्गासाठी, एका धर्मासाठी नाहीं. ती सर्वासाठी आहे. तिच्याजवळ भेदभाव नाहीं. जातगोत नाहीं. म्हणून तर मला काँग्रेसचें वेड आहे. म्हणून तिच्यासाठी जगावें व मरावें असें मला वाटतें. सर्वत्र माझ्या काँग्रेसची सेवा सुरू होवो. तिचा झेंडा गांवोगांव जावो, हृदयाहृदयांत जावो, असें मला वाटतें. कबीरानें म्हटलें आहे.---'अंदर राम बाहर रामजहां देखों वहीं रामहि राम'त्याप्रमाणें मनांत काँग्रेस, जनांत काँग्रेस, शहरांत काँग्रेस, खेडयांत काँग्रेस, सर्वत्र काँग्रेस-काँग्रेस व्हावें असें मला वाटते. 'पायीं बांधुं घुंगुर ! हातीं घेऊं विणा ! मुखानें विठ्ठल गाऊं हो ! नाचत पंढरी जाऊं हो.' असें पूर्वीच्या साधुसंतानीं म्हटलें. त्यांनीं देवाचें नांव सर्वत्र नेलें. ज्ञानेश्वरीत म्हटलें आहे, 'अवघे जगचि दुमदुमित ! नामघोषं भरले.' साधुसंतानी प्रभूचें नांव दशदिशांत नेलें. त्याप्रमाणें काँग्रेसचें नांव सर्वत्र व्हावें असें मला वाटतें. मला वाटतें तसें सर्वांस वाटो. तुझ्यासारख्या लाखों तरुणांस वाटो. शेवटीं आजच्या तरुणांच्या स्वप्नांतूनच उद्यांचा भविष्यकाळ उत्पन्न होणार आहे. एका रशियन लेखकांनें म्हटलें आहे. 'Give me the songs of the young and I shall tell their future - तरुणांची गाणीं मला सांगा म्हणजे त्यांचें भवितव्य मी सांगेन. ' वसंता, तुमच्या तरुणांच्या ओंठावर कोणतीं गाणीं आहेत? तुमच्या पोटांत कोणत्या संस्थेविषयीं प्रेम आहे? मी तर आशा बाळगतों कीं सर्वांचे कल्याण पहाणा-या, सर्व वर्ग व सर्व धर्म ह्यांना एकत्र गुण्यागोविंदानें नांदवण्याचा महान् प्रयोग हिंमतीनें व श्रध्देनें करणा-या माझ्या काँग्रेसचीं गाणी तुझ्यासारख्या तरुणांच्या ओठावर असतील, त्या संस्थेविषयीचें प्रेम तुमच्या हृदयांत असेल. काँग्रेस भारताचा आत्मा ओळखते. ज्याप्रमाणें व्यक्तीला स्वधर्म असतो, तसा राष्ट्रालाहि एक स्वधर्म असतो. गीतेमध्ये सांगितले आहे कीं 'स्वधर्मे निधनं श्रेय: ! परधर्मो भयावह:' हिंदुस्थानचाहि एक स्वधर्म आहे. केवळ परकीयांचे अनुकरण करणें हा स्वधर्म नाहीं. जर्मनीने ज्यूंची हकालपट्टी केली तशी आम्ही मुसलमानांची करूं, असें कांही हिंदु तरुण म्हणत असतात. जर्मनीचा स्वधर्म असेल. भारताचा नाही.आम्ही नेहमी म्हणत असतों कीं इतरं प्राचीन राष्ट्रें काळाच्या पोटांत गडप झालीं. इतर प्राचीन संस्कृति नामशेष झाल्या. परंतु हिंदुस्थान अद्याप राहिला आहे. परंतु हा देश कां राहिला? हिंदुस्थान कां नही नष्ट झाला? हिंदुस्थानचा प्राण कशांत आहे? हिंदुस्थान सर्व संग्राहक आहे म्हणून जगला आहे. पाऊस पडला नाहीं तरी समुद्र आटत नाही. कारण तो सर्व प्रवाहांना जवळ घेत असतों. त्याप्रमाणें सर्व मानवी प्रवाहांना हिंदुस्थाननें जवळ घेतलें आहे. म्हणून हिंदुस्थान जगला आहे.

या देशांत प्राचीन काळापासून नाना जातिजमाती आल्या, भांडल्या व पुन्हां गुण्यागोविंदानें राहूं लागल्या. ज्याप्रमाणे आगगाडीचा डबा असतो तसें हें आहे. आपण आगगाडीच्या डब्यांत बाहेरचें कोणी आंत घेंत नाहीं ! परंतु धक्काधक्की करून ते बाहेरचे आंत येतात. क्षणभर वातावरण गरम असतें. मग पुन्हां सारे एकत्र बसतात. चौकशी करतात. पानसुपारी खातात. ते एक होतात. पुढच्या स्टेशनवर पुन्हां तो प्रकार ! अशा प्रकारें सर्व प्रकारचे लोक घेऊन तो डबा मुक्कामावर पोंचतो. भारतवर्षात नाना धर्म आले आहेत, नाना संस्कृति आल्या आहेत. यांचे झगडे झाले नाहींत असें नाहीं. परंतु झगडयातून आम्ही ऐक्य निर्माण करीत होतों.हिंदु व मुसलमान भांडभांड भांडले. परंतु ते नव संस्कृति निर्मित होते. अकबरच्या कारकीर्दींत परस्पर संस्कृतिची देवाणघेवाण सुरू झाली. आम्ही अरबी ग्रंथ भाषांतरिले. मुसलमानी उपनिषिदें, रामायण महाभारत यांची भाषांतरें केलीं. परस्परांच्या संस्कृतींचा अभ्यास केल्यानें हृदयें जवळ येतात. मुसलमानांतील सुफी कवींचीं कविता तर आपल्या संतवाड्मयासारखी अद्वैत शिकवणारीं आहे. परंतु आपला कोठें आहे त्या वाड्मयाशीं परिचय? आपण हिंदुस्थानचे जे इतिहास शिकतों तें बहुधा इंग्रजांनी लिहिलेले असतात. इंग्रजांनी या देशाचें विकृत असे इतिहास लिहिलें. 'भारत अंग्रेजी राज' या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्यें येथें मुसलमानाचे संबंध कसे चांगले होते ते पंडित सुंदरलाल यांनीं दाखविलें आहे. किती तरी मुसलमान राजांनी हिंदु कवींना, कलावंतांना आश्रय दिला आहे. परंतु मुसलमानांच्या चांगल्या गोष्टी आम्हांस माहीत नाहींत. हिंदुस्थानावर इंग्रजांनी राज्य चालवावयाचे आहे. आरंभापासूनच भेदनीतीचा त्यांनी अवलंब केला. या देशांतील जनतेचीं मनें परस्परविरुध्द राहतील अशी कोशांस ब्रिटिश सरकार सदैव करीत असतें. आमच्यांत त्यांनीं सवंते सुभे उभे केले. अलगपणाचें विष पेरलें. परसत्ता म्हणजे शाप आहे. परंतु हिंदुमुसलमान नवसंस्कृति निर्मित होते. हिंदु-दैवतांना मुसलमान नवस करीत, तर मुसलमानी पीरांना हिंदु भजत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे. त्यांचे शहाजी हें नांव कोठून आलें? एका मुसलमान फकीराचें तें नांव होतें, 'शहाजी' या शब्दाचाच अर्थ 'फकीर' असा आहे. ब्लंट या इंग्रज इतिहासकारानें हिंदुमुसलमान परस्परांविषयीं इतकी प्रीति दाखवतात यांचे आश्चर्य मानलें आहे. ही प्रीति नष्ट करणें हें तर या इंग्रज इतिहासकारांचे काम होतें व तसे इतिहास त्यांनी लिहिलें.नांवांतूनसुध्दां इतिहास कळतो. शेवटीं भांडणामधूनहि भलें कसें निर्माण होत असतें ते नांवावरुनहि कळतें. शैव व वैष्णव एके काळीं भांडत होते. परंतु पुढें दोन्ही दैवतांची नांवे एकत्रित करुन आपलें पूर्वज आपल्या मुलांबाळांना तीं नांवें ठेवूं लागले. शिवनारायण, हरिहरराव वगैरे नांवें ऐक्य-सूचक आहें. हें ऐक्य निर्मिणा-या पूर्वजांवर त्या वेळेस दगडधोंडे मारण्यांत आले असतील. खुदाबक्ष, रामबक्ष अशा नांवांतूनहि हिंदुमुस्लीम ऐक्याचाच प्रकार दिसतो.

भारतीय शिल्प, चित्रकला, संगीत इत्यादि कलांमध्यें हिंदुमुसलमान दोघांनी भर घातली. हिंदु गवयी मुसलमान वस्तादांचे चरणीं बसून शिकतात तर मुसलमान गवयी हिंदु गायनाचार्यांजवळ धडे घेतात. तानसेन मरण पावला तेव्हां मुसलमान म्हणाले हा आमचा आहे. हिंदु म्हणाले हा आमचा आहे. दोघांना तो आपला वाटला. कबीर मरण पावले तेव्हां हिंदु म्हणाले हा आमचा आहे, मुसलमान म्हणाले हा आमचा आहें. कबीराच्या अंगावरील वस्त्र दूर केलें तेथें तुळशीहि सापडल्या व सबजाहि सांपडला. बुक्काहि सांपडला, अबीरहि सांपडला.

मराठीत शेख महंमद वगैरे साधु झाले. त्यांनीं सुंदर काव्यरचना केली. बंगालीमध्यें मुसलमान कवींनीं गंगेवर स्तोत्रे लिहिली ! बंगाली मुसलमान बंगाली भाषाच बोलतात. मुसलमान मायबहिणी हजारों खेडयापाडयांतून जात्यावर दळतांना ज्या ओव्या म्हणतात त्या ओव्यांतून हिंदुमुस्लिम ऐक्य दिसून येतें. गंगाजमनांचीं सुंदर वर्णनें त्या ओव्यांतून आहेंत.मुसलमान राजांनीं हिंदू देवस्थानांस देणग्या दिल्या. हिंदू राजांनीं मशिदींस व पीरांस देणग्या दिल्या. पेशव्यांचे गुरु कायगांवकर दीक्षित यांची दिल्लीच्या बादशहांनीहि पूजा केली ! कायगांवकर दीक्षितांना निजाम स्टेटमधून जहागीर आहे. चिंचवडच्या देवस्थानास निजाम स्टेटमधून देणगी आहे असें कळतें. अशा प्रकारे रहावयास आपण शिकत होतों. खरा धर्म आचरांत होतों. धर्म तोडणारा नसून जोडणारा आहे, हें शिकत होतों. हिंदूच्या धर्मग्रंथांतून शेवटी ॐ शांति: शंति: शंति: असाच घोष असतो आणि मुसलमानाहि शांतीचे पुरस्कर्ते आहेत. इस्लाम या शब्दाचा अर्थच मुळी शांति. दोन्हीं धर्म शांतीचा अनुभव येथें घेऊं लागले.हैदरअल्ली मुसलमान होता. परंतु गाय मारणा-याचा हात तोडण्याची शिक्षा त्यांने दिली. बाबर बादशहानेंहि लिहिलें होतें कीं, ''आपण गाय मारतां कामा नये.'' अकबराचे मानसिंग वैगरे हिंदु सुभेदार होते. औरंगजेबानें शिवाजीवर कोणास पाठविले? जयसिंगला. इतकेंच काय, तर गझनीच्या महंमदाचेहि हिंदु सेनापति होते. ज्या संयुक्त प्रांतांत मुसलमानांनी आठशें वर्षे राज्य केलें तेथें मुस्लिम लोकसंख्या आज शेंकडा १४ फक्त आहे. सारीच बाटवाबाटवी असती तर असें झाले असतें का? हिंदु-मुस्लिम नीट वागूं लागले होते. नवरात्राचा सण हैदरच्या दरबारांत पाळला जाई. दस-याला दरबार भरे. मुसलमान राजा नवरात्रोस्तव करींत. तर हिंदु राजे डोले उभारीत. बडोदे शहरांत सरकारी डोले असतात ! हिंदु राजे मुसलमानी प्रजेचें मन सांभाळीत. मुसलमानी राजे हिंदु प्रजेला दुखवीत नसत. हैदरअल्लीनें हिंदूंचे मुख्य गुरु जे शंकराचार्य त्यांना नजराणे पाठविले. दहा हजार सोन्याची नाणीं पाठविली. टिपू सुलतान हिंदु दैवतांना नवस करी. त्यानें उत्कृष्ट संस्कृत हस्तलिखितांची लायब्ररी ठेवली होती.आपण व्यक्तीवरून एकदम धर्म वाईट ठरवूं नयें. औरंगजेब वाईट होता. दुष्ट होता. तो स्वत:च्या भावांच्याहि बाबतींत क्रूर होता. परंतु त्यावरुन सारे मुसलमान असेच, असें म्हणू नये. एखाद्या चर्चिल वा अ‍ॅमेरी साम्राज्यवादी निघाला म्हणून का सारे ख्रिश्चन वाईट व दुष्ट असें आपण म्हणतो? मुस्लिम धर्म व संस्कृति एकाद्या औरंगजेबावरुन परीक्षूं नये. निरनिराळया सुंदर रुढि आपण पाडीत होतो. खानदेशांतील अमळनेरच्या श्रीसंत सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी देण्याचा मान मुसलमानांचा आहे. मुसलमानांना नारळ प्रसाद म्हणून देण्यांत येतो. जळगांवजवळ कमळदे म्हणून गांव आहें. तेथें मशीद आहे. त्या मशिदीजवळ वारक-यांची दिंडी थांबली पाहिजे व त्यांनी भजन केले पाहिजे, असा मशिदीचा हक्क होता ! मुसलमान म्हणत, ''आमच्या मशिदीजवळ थांबा व भजन करा. कारण शेवटीं परमेश्वर एकच आहे. त्याला राम म्हणा कीं रहिम म्हणा. पुणें जिल्हयांत बारामती गांवीं हिंदु-मुसलमानांत किती ऐक्य आहे तें जाऊन पहा. पीरासमोर हिंदु शाहीर हिंदु पुराणांतील कवनें व पोवाडे म्हणतात आणि मुसलमान तीं कवनें आनंदानें ऐकतात.

अशी ही संस्कृति आपण निर्मित होतो. गुलाब व कमळ एकत्र आणीत होतों. राम व रहिम एकत्र आणीत होतों. मशीद व मंदिर जवळ आणीत होतों. अबीर व बुक्का एकत्र करीत होतों. इतिहासांतहि या गोष्टी आहेत. हिंदुस्थानांतील मुसलमानांस आपण परके असें समजतनासे झालों. शिवाजी महाराजांच्या आरमारावर मुसलमान अधिकारी होते. शिवाजी महाराज अफझलखानाच्या भेंटीस गेले तेव्हां त्यांच्या बरोबर जे शरीररक्षक होते त्यांत एक मुसलमान बंधुहि होता. नादीरशहानें दिल्लीवर स्वारी केली तर बाजीराव दिल्लपितींस लिहितो, 'तुमच्या मदतीसाठीं मी मजल दरमजल येतो. बाहेरच्या शत्रूस काढून देऊं. ''दिल्लीचे बादशहा व मराठें यांचें भांडण असे, परंतु बाहेरचा शत्रु आला तर दिल्लीचा बादशहा हा किती झालें तरी हिंदुस्थानचा, ही भावना होती. पानपतच्या लढाईंत मराठयांकडे इब्राहीमखान गारदी दहा हजार मुसलमान घेऊन होता. तो शत्रूला वश झाला नाहीं. धारातिर्थी तो मेला ! निजामच्या दरबारांत हिंदु मंत्री असत. त्याच्या पदरीं हिंदु सैन्यहि होतें. आम्ही आपसांत लढाया केल्या तरी सारे हिंदुस्थानचे ही भावना होती. मुसलमान बाहेरचे, परके ही भावना नष्ट झाली होती. १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांतहि खांद्याला खांद्या लावून लढले.आपण आपसांत भांडलों नाहीं असें नाही, परंतु ही भांडणें आपसांतील होतीं. म्हणजे आपण एक होतों. भांडणांतून आपण भव्य निर्माण करीत होतों. नवसंस्कृति निर्मित होतों. अरें नवीन अशी राष्ट्र भाषाहि आपण निर्मिली होती. हिंदूंनीं केवळ संस्कृतप्रचुर अशी अपली भाषा दूर केली. मुसलमानांनीं केवळ अरबी व पर्शियन शब्दांनी भरलेली अशी आपली भाषा सोडली. दोघांच्या सल्ल्यानें एक नवीन, संमिश्र, दोघांना समजणारी अशी नवभाषा निर्माण केली गेली. परंतु असे महान् प्रयोग होत असतां हें इंग्रज आले. यांनी येथले उद्योग धंदे मारले. कर्तृत्वास वाव उरला नाही. त्यांनी या देशांत भांडणे लावली. नोकरीशिवाय धंदा उरला नाही. म्हणून त्या नोक-यांसाठीं भांडणे सुरूं झालीं. नोक-यांसाठी प्रत्येकाला अलग रहावें असें वाटूं लागलें. म्हणजे आपआपल्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत नोक-या मिळतील हा हेतु. ब्राम्हणेत्तर अलग झाले. अस्पृश्य अलग झाले. मुसलमान अलग राहूं जागले. 'आम्हांला इतक्या नोक-या द्या.' या शिवाय दुसरें मागणेंच नाही ! तुकडयांसाठी कुत्री भांडूं लागतील तसें आपण भांडूं लागलों. कोंबडी झुंजवतात त्याप्रमाणे ब्रिटिश सरकार हिंदी जनतेला परस्परांत झुंजवूं लागलें. केवढें हे पाप ! आणि त्यांच्या कारवायांस बळी पडणारे आपणहि किती पापी व करंटे !

वसंता, परकी सत्ता जर आपल्यांत भेद पाडीत असेल तर आपले सर्वांचे काम हें आहे कीं ते भेद मिटविण्यासाठी वाटेल ती किंमत देणें. आपली जी ऐक्यनिर्मितीची परंपरा तिचा सोनेरी धागा हातीं घेऊन आपण जाऊं या. तो धागा इंग्रज तोडीत आहेत. आपणहि मुर्खपणाने तो तोडीत आहोंत. ऐक्य निर्माते ते आपले पूर्वज काय म्हणतील? आपण एकमेकांच्या भल्या गोष्टी गाठवून पुढें जाऊं या. जुन्या उखाळया-पाखाळया काय कामाच्या? जुन्या इतिहासांतील भलें तें स्मरूं व कठीण काळांत तरूं.

तुला ती एका म्हाता-याची गोष्ट माहीत आहे का? त्याला दोन मुलगे होते. आपली इस्टेट कुणाला द्यावयाची याचा तो विचार करीत होता. कोणता मुलगा शहाणा? शेवटीं त्यानें परीक्षा घेण्याचें ठरविलें. त्यानें प्रत्येकाला चार दिडक्या दिल्या व तो म्हणाला, ''या चार दिडक्या घ्या व ह्या शेजारीं दोन खोल्या आहेत, त्यांतील प्रत्येकानें एक खोलीं नीट भरुन ठेवावी.'' दोघे मुलगे विचार करूं लागले. मोठा मुलगा म्हणाला, ''चार दिडक्यांत अशी कोणती वस्तु मिळेल कीं, जिनें ही सारी खोली भरतां येईल? इतकी स्वस्त व मुबलक कोणती गोष्ट? बाबांची कांही तरीच अट ! अडाणी व हट्टी आहेत बाबा.'' परंतु त्याला एक युक्ति सुचली. गांवचा सारा कचरा एके ठिकाणीं टाकण्यांत येत असे. हा कचरा त्यानें विकत घेतला. गाडीभर कचरा त्याला मिळाला. तो कचरा त्यानें खोलीत ओतला. खोली भरुन गेली. त्याला आनंद झाला ! बाप आपल्यावर प्रसन्न होऊन आपणांसच सारी इस्टेट देईल, असें त्याला वाटलें. त्या दुस-या भावानें काय केलें? त्यानें दोन दिडक्यांच्या आठ पणत्या आणल्या. एका दिडकीचें तेल घेतलें. एका दिडकीच्या वाती घेतल्या. त्यानें खोली स्वच्छ झाडूनसारवून त्या आठ पणत्या आठ दिशंना लावून ठेवल्या ! बाप पहावयास आला. तों एका खोलींत कच-याचा ढीग ! अरे हे रोगाचे जंतू येथें कशाला आणलेस? घाणीनें का खोली भरायची ! ''असें म्हणून पिता दुस-या खोलीकडे वळला. तों त्या खोलींत सुंदर प्रकाश भरलेला होता. ज्योति तेवत होत्या. दिवा देखून नमस्कार ! त्या पित्याचें मन प्रसन्न झालें. त्यानें त्या ज्योतींना प्रणाम केला. त्यानें लहान मुलाच्या पाठीवर शाबासकी दिली व तो म्हणाला, ''बाळ, तूं शहाणा आहेंस, तुला घे इस्टेट !'' वसंता, जुन्या इतिहासांतील कचरा घेऊन आपण पुढें जाणार कीं, शेंकडो वर्षाच्या इतिहासांतून जें मांगल्य आपण निर्मिलें, ज्या मधुर रुढि निर्मिल्या, सुरेख रीतीरिवाज निर्मिले ते घेऊन पुढें जाणार? एखाद्या मनुष्याची एका गावांहून दुस-या गांवाला जर बदली झाली तर तो बरोबर काय नेतो? मौल्यवान वस्तु बरोबर नेतो. फुटक्या कांचा, खोकीं, टिनपाटें, केरसुण्यांचे बुडखे, दगडधोंडें हे तो बरोबर नेतो का? मग आपणांस तर एका शतकांतून दुस-या शतकांत जावयाचें आहे. अशा वेळेस मंगल स्मृतीचे कांहीं तारेच बरोबर घेऊन गेले पाहिजे. काळाच्या ओघांत जे भले असेल ते शिदोरी म्हणून बरोबर घेऊन पुढील यात्रेसाठी निघालें पाहिजे. द्वेष-मत्सरांच्या पुरचुंडया बरोबर घेण्यांत काय अर्थ? मी यासंबंधी पुढच्या पत्रांत अधिक लिहीन. माझी काँग्रेस तरी हिंदुस्थानचा आत्मा ओळखून चालली आहे. समुद्र आपण पवित्र मानतों. कारण सारे प्रवाह तेथें असतात. नद्यांचासंगम आपण पवित्र मानतों. कारण दोन भिन्न प्रवाह एकत्र मिळाले. नदी आपण पवित्र मानतों. कारण अनेक प्रवाह जवळ घेऊन ती बनली. म्हणून आपले पूर्वज नदींत, संगमांत, समुद्रांत स्नानें करा असें म्हणत. आपण स्नानें तर करतों परंतु नदीचा, संगमाचा, समुद्राचा संदेश ध्यानांत घेत नाहीं. जास्तींत जास्त प्रवाहांस जवळ घेईल ती नदी अधिक मोठी होते, अधिक पवित्र मानली जाते. त्याप्रमाणे आपण सारे मानवी प्रवाह जवळ येऊं या. मानवी प्रवाहांचे या भारतांत ऐक्य होवो. समुद्रांत सारीं तीर्थे. त्याप्रमाणे भारतांत मानवी समुद्र उचंबळून मानवी तीर्थक्षेत्र येथें निर्माण होवो. सारें जग म्हणेल, ''तो पहा हिंदुस्थान. सारे धर्म व संस्कृति गुण्यागोविंदानें नांदत आहेत. परस्परांचे मंगल घेत आहेत.'' पूर्वजांचा हा संदेश आहे. हा भारताचा स्वधर्म. ही आपली परंपरा. हजारों वर्षाच्या इतिहासाचें हें सार व सूत्र. तें कोणी ओळखले? काँग्रेसनें नाही का? तुझाश्याम