Shyamachi Patre - 3 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 3

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र तिसरे

सबसे उँची प्रेम सगाई

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वादतुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. ती अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला पुन्हां लौकर शाळेत जायचें. वसंता, तूंहि माझ्याप्रमाणें लौकर मातृहीन झालास. आई नसणें म्हणजें संसारांतील, या जगांतील एका महान् सुखाला आंचवणें होय ! असो, तू धैर्यानें सर्व कांही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वैनीला लौकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतों. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार? आज तुझ्या सेवादलांतील मुलांसाठी कोणता खाऊ पाठवूं ! कोणत्या विचारांचा मेवा पाठवूं? माझीं पत्रें त्यांना आवडतात असें तूं मागें लिहिलें होतेंस म्हणून मी ' खाऊ, मेवा ' असें शब्द वापरीत आहें, अहंकारानें नव्हें. आज मी अस्पृश्यतेंसंबंधीं थोडें लिहित आहे.हिदूंत ही अस्पृश्यता कशी आली तें देव जाणें ! अस्पृश्य हे येथील मूळचे रहिवाशी असावेत, नाग जातीचे ते असावेत असें कोणी म्हणतात. परंतु अस्पृश्यांच्या तोंडावळयावरुन, डोळे-नाक वगैरेंवरुन ते आर्य असावेत असेंहि कोणी म्हणतात. या मूळच्या नाग लोकांस आर्यांनी जिंकलें. आर्य व नाग ह्या दोहोंचें रक्त अस्पृश्यांत असेल असें वाटतें. जेते लोक जितांविषयी कसा अस्पृश्यभाव दाखवितात तें सर्वंत्र दिसतें. प्रत्येक समाजात प्रत्येक संस्कृतीत असें लाजिरवाणे प्रकार आहे. ग्रीक लोकांची संस्कृति कळसास पोहोंचली होती. परंतु त्यांना गुलामाचा एक वर्ग राखला होता. हे गुलाम सदैव राबत. संस्कृतीसाठी फुरसत हवी. वरच्या वर्गांना संस्कृतिविकासासाठी वेळ मिळावा म्हणून हे गुलाम राबत असत ! या गुलामांना कलांची उपासना करतां येत नसे. त्यांना ज्ञानाचे दरवाचे बंद होते. त्यांनी सदैव वरच्यांची सेवा करावी. आपल्याकडहि तोच प्रकार. त्रैवर्णिकांची सदैव सेवा करणे हेंच अस्पृश्यांचे काम राहिले.ही अस्पृश्यता कशीहि आली असो, ती नष्ट करणें हें एक काम आहे. आजच्या काळांत ती शोभत नाहीं. श्रेष्ठकनिष्ठपणाची थोतांडें फार प्राचीन काळापासून आहेत. या श्रेष्ठ-कनिष्ठपणाविरुध्द जर कोणी प्रथम उठला असेल तर तो श्रीकृष्ण होय. त्यांच्या काळांत ब्राम्हण व क्षत्रिय यांना फार प्राधान्य होतें. हे दोन वर्ण काय तें श्रेष्ठ, बाकीचे तुच्छ. स्त्रियांनाहि महत्त्वाचें स्थान नव्हतें. स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाहीं, असे म्हणूं लागले होते. स्त्रियांना गुलाम ठेवायचे असेल तर त्यांना ज्ञानहीन ठेवणे हाच मार्ग होता.परंरंतु श्रीकृष्णाने, स्त्रिया, वैश्य, शुद्र सर्वाना मान्यता दिली. समाजसेवेचें कार्र्य करणारे सारे पवित्र आहेंत, असें त्यानें प्रतिपादलें. ज्यानें त्यानें आपल्या गुणधर्माप्रमाणे सेवा करावी. कोणी श्रेष्ठ नाही. कोणी कनिष्ठ नाहीं.

श्रीकृष्णाचा हा संदेश आम्ही विसरुन गेलों. उपनिषदांतील संदेश आम्ही विसरुन गेलों. जेथें पिकते तेथें विकत नाही. हीच गोष्ट खरी. त्यानंतर साधुसंतांनीं पुन्हां या दुष्ट रुढीवर हल्ले चढविले. परंतु साधु-संतांचाहि छळ झाला. जो जो कोणी समाजाला नवीन प्रकाश देतो त्याचा समाजांत छळ होतो. आद्य-शंकराचार्यांनी दक्षिणेंतील निरनिराळया देवतांची उपासना करणा-यांत भांडणे होत तीं मोडण्याकरतां पंचायतन-पूजा रुढ केली. सारे देव एकाच परमेश्वराचीं रुपें आहेत असें प्रदिपादलें. अद्वैत जीवनांत आणा, असें त्यांनी सांगितले. परंतु त्यांचाछळ झाला. ते आपल्या आईला मरतांना भेटायला गेलें म्हणून त्यांच्या मृत आईचा देह न्यावयास कोणी येईना ! शंकराचार्यांना एकटयाला तो देह नेववेना. त्यांनीं त्या देहाचे तुकडे केले. एकेक तुकडा स्मशानांत नेला. मलबारच्या बाजूला मृत मनुष्याचा देह स्मशानांत नेंताना त्याच्या देहावर भस्माच्या तीन रेषा ओढतात. ती खूण राहिली आहे ! साधुसंतांनीं संस्कृतांतील ज्ञान बहुजन समाजाच्या भाषेंत आणण्याची खटपट केली. त्यामुळें त्यांचा छळ झाला. ज्ञान ही कोणा एका वर्गाची मिरासदारी नसावी. ज्यप्रमाणें हवा सर्वांना हवी, ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश हवा, सर्वांना अन्नपाणी हवें, त्याप्रमाणें ज्ञानहि सर्वांना हवें. ज्ञान सर्वांना समजेल असें केलें पाहिजे. संतांनीं ज्ञानाच्या बाबतींतील अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांना मोकळे केले. परंतु ही क्रांन्ति करणा-या संतांचा सनातनी मंडळींनीं छळ केला. ज्ञानेश्वरांसारख्यांवर त्यांनीं बहिष्कार घातला. एकनाथांचे भागवत गंगेंत बुडवायला निघाले. तुकारामांचे अभंग इंद्रायणींत फेंकले. असा छळ केला. परंतु संत आपल्या मार्गापासून परावृत्त झाले नाहींत. आणि आतां महात्मा गांधींनीं त्याच्यापुढचें पाऊल टाकलें आहे. लोक म्हणत असतात कीं आजच कुठलें हें खूळ गांधींनीं काढलें आहे. हें खूळ आज नाही निघालें. हें खूळ प्राचीन काळापासून आहे आणि श्रीकृष्ण भगवानापासून मानव जातीचे सारे उपासक अशा अन्यायांविरुध्द लढत आले आहेत.अस्पृश्यता ही धार्मिक वस्तू नाही. हा एक वरिष्ठांचा अधिकार आहे. धर्म आम्ही सोयीप्रमाणें बदलतो. उत्तर हिंदुस्थानांत जेथें पाणी लांब असतें तेथें तें आणवयाला हरिजन नोकर ठेवतात ! तेथें पाण्याला विटाळ नाही. आमच्याकडे पाण्यालाहि विटाळ आहे. तेथें पाणी आणणें कठिण आहे म्हणून विटाळ नाहीं. त्यांनी सोय पाहिली, दुसरें काय? अस्पृश्यतेसाठी शास्त्रे पहाण्याची आम्हांला जरुरी नाहीं. साधी माणुसकी ज्याला कळते तो कधीहि अस्पृश्यता पाळणार नाहीं. एक काळ असा होता की हरिजनांची छाया पडणें म्हणजेहि विटाळ मानीत. अद्यापहि कोठें कोठें असे प्रकार आहेत. कांही कांही ठिकाणीं हरिजनांनी अमक्याच रस्त्यांनी गेलें पाहिजे असे निर्बंध आहेत. मंदिरावर हरिजनांची सावली पडून देऊळ बाटायचे एखादें ! म्हणून हे निर्बंध. आम्ही हिंदुधर्माच्या बाहेरचे लोकहि ओटीवर घेतों. त्यांना पान-सुपारी देतों आणि वाईटहि कांही नाही. परंतु आमच्याच धर्मातील बंधूंना आम्ही दूर ठेंवलें आहे. सार्वजनिक विहिरीवर मुसलमान पाणी भरतात ! परंतु हरिजन पाणी भरुं शकत नाहीं. मुसलमान अस्पृश्य नाहीत, परंतु आमचेच धर्मबांधव अस्पृश्य ! असें कां बरें?

कारण मुसलमानांनी येथें राज्य केली. ते येथे सत्ताधारी होते. त्यांना कोण मानणार अस्पृश्य? सरकार व सरकारच्या जातीचे लोक सदैव पवित्र असतात !! आज साहेबलोक नाहीं का आमचीं मंदिरे पाडूं शकत? व्हाइसरॉयसाहेब दक्षिणेकडचीं प्रचंड मंदिरें आंत जाऊन पहातात. मंदिराचे चालक साहेबांना तीं मंदिरे मोठया नम्रतेने दाखवितात. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच कीं आम्ही सत्ता ओळखतों. सत्तेला आम्ही देव मानतों. आम्ही सत्य-देव नसून सत्तादेव आहोंत. मामलेदार, कलेक्टर, गव्हर्नर, व्हाइसरॉय हे आमचे देव आहेत ! न्यायमूर्ति रानडे एकदां रेल्वेंतून जात होते. सेकंड क्लासमध्यें त्यांचा बिस्तरा होता. ते प्लॅटफॉर्मवर हिंडत होते. इतक्यात एक साहेब त्या सेकंड क्लासच्या डब्यांत शिरला. त्याला इंडियन मनुष्याचें तें सामान सहन झालें नाहीं. त्यानें तें प्लॅटफॉर्मवर फेंकलें. न्यायमूर्ति रानडयांनी तें निमूटपणें उचलून दुसरीकडे नेलें. त्यांना एक मित्र म्हणाला, ' तुम्ही या साहेबावर फिर्याद कां करीत नाही? ' न्यायमूर्ति म्हणाले, ' आपण आपल्या कोटयवधि बंधूंना याच तऱ्हेनें वागवीत आहोंत. कोणत्या तोंडाने मी साहेबावर फिर्याद करुं? ' वसंता, आपण आज स्वराज्य मागत आहोंत. जोंपर्यंत आपण आपल्याच भावाबहिणींस साधे माणुसकीचे हक्क देत नाहीं, तोंपर्यत स्वराज्याचा अर्थ तरी आपणंस कळला असें मानतां येईल का? विवेकानंदांहून हिंदुधर्म अधिक कोणाला समजत होता? परंतु हरिजनांची दीन दशा पाहून ते रडत. महाराष्ट्रांतील ज्ञानमूर्ति ब्रम्हाचारी नारायणशास्त्री मराठे-वाईच्या प्राज्ञपाठशाळेचें संस्थापक-त्यांच्याहून हिंदुधर्माचा अधिक आत्मा कोणाला कळला? परंतु हिमालयांत जाणा-या एका तरुणास ते म्हणाले, ' देव हिमालयांत नाहीं. हरिजनांची सेवा कर. तुला देव मिळेल. 'एक वेळ तुमच्या घरांत हरिजनांना नका येऊ देऊं, परंतु मंदिरात तरी त्यांना जाऊं दे. देवाजवळ तरी त्यांना जाऊं दे. देव सर्व जगाची माता ना? आपण सारीं त्या देवाचीं लेकरें ना? असें तोंडाने पुटपुटतां ना? देवळांतील ती मूर्ति जर खरोखरी भगवंताची असेल तर सर्व मानव प्राणी तेथे नको का जायला? आमच्या मंदिरांत कुत्रीं बसतात. कावळे बसतात. चिमण्या नाचतात. परंतु हरिजन मात्र तेथें शिरुं शकत नहींत. देवळांत जर शाळा असली तर तेथें हरिजन मुलें जाऊं शकत नाहींत. ज्या देवाजवळ त्यांचीं सारीं लेंकरें जाऊं शकत नाहींत ती का देवाची मूर्ति? नाशिक शहरांत बालाजी व भद्रकालीच्या देवळांतून सभा होतात, प्रवचनें होतात. परंतु हरिजन त्या देवळांत येऊं शकतात का? ज्या रामाने शबरीचीं बोरें खाल्ली, जटायू पक्षाचें श्राध्द केलें, वानरें प्रेमानें हृदयाशीं धरलीं, त्या रामाच्या मंदिरात हरिजन जाऊं शकतात का? धर्माच्या व संस्कृतीच्या बेटे गप्पा मारतात, परंतु धर्मांचा व संस्कृतीचा स्वत: वध तर करीत आहेत. ईश्वरासमोरहि आमचा अहंकार गळून जात नसेल तर तो आतां गळायचा तरी कोठे? प्रभूच्या मूर्तीसमोरहि जर मी नम्र होत नसेन तर मी नम्रता शिकणार तरी कोठें? मुसलमान बादशहा औरंगजेब ज्याला आपण नांवें ठेवतों - तो एकदां जुम्मा मशिदींत जरा उशिरा गेला. तो आला असें पाहतांच मशिदींतील लोक त्याला जागा करुन देऊं लागले. त्या वेळेस औरंगजेब म्हणाला, ' आपण मशिदीत आहोंत, येथें मी बादशहा नाहीं. आपण सारे समान आहोंत. देवासमोर तरी भेदभाव नको. ' अद्वैत तत्त्वज्ञान ज्या हिंदुधर्मानें दिलें, त्या हिंदुंच्या देवळांत आहे का हा प्रकार? समानतेची वचने आम्ही ओंठावर खेळविली, परंतु कृति मात्र कृत्रिम भेदभावाची ठेविली.

अत:पर तरी अस्पृश्यतेसारखी दुष्ट चाल आपण गाढून टाकली पाहिजे. कोणी फाजील लोक म्हणतात, ' आज हरिजनांना जवळ घ्या म्हणतो, उद्यां त्यांच्याशीं लग्न लावा असें म्हणाल. ' त्यांना उत्तर एवढेंच कीं ज्या इतर जातीजमातीस आपण आपल्या ओटीवर बसवतों, त्यांच्याशीं का लगेच आपण लग्नें केली? ब्राम्हण, मराठे, न्हावी, धोबी, कुणबी, मुसलमान वगैरे सारे एकमेकांच्या ओटीवर येतात? त्यांच्याशी काय आपण सोयरिकी जोडल्या? हरिजनांना जवळ घ्या असे म्हणताच असले प्रश्न तुम्ही का विचारता? हा चावटपणा आहें.कोणी शहाणे म्हणतात, 'अहो आतां हळूंहळूं हें सारें होणारच आहे. विटाळ आपोआप कमी होत आहे. मुद्याम तुम्हीं चळवळीं कशाला करता? आपोआप एक दिवस सारें होईल म्हणून का आपण गप्प बसावयाचें? काळ आपणांस करायला लावीलच. परंतु काळाची गति ओळखून शहाणपणानें आधींच आपण तसें वागणें योग्य नाहीं का? आपणाला एखादी जखम झाली तर ती कांहीं दिवसांनीं आपोआप बरी होतेच परंतु आपण औषध लावून ती जखम लौकर बरी व्हावी म्हणून नाहीं का खटपट करीत? त्याप्रमाणेंच युगधर्म ओळखून आपण नको का कृति करायला? जें होणार आहे तें आधीच करुं या. आपणाला काळ ओढून नेईलच. परंतु आपण होऊन आधींच करुं तर त्यांत प्रतिष्ठा आहे.तिसरें कोणी म्हणतात, ' हरिजन मृत मांस वगैरे खातात. त्यांना कसें जवळ येऊं द्यावयाचे? ' ही तर दु:खावर डागणी आहे ! हरिजनांची स्थिति तर पहा. त्यांना ना शेत ना भात. ते खाणार काय? मृत मांस त्यांना मिळालें तर ते तेंच खातात. ताजा बकरा, ताजी कोंबडी त्यांना मिळत नाहीं. हा का त्यांचा दोष? त्यांची आर्थिक स्थिति सुधारली तर ते तुमच्याप्रमाणें ताजे मांस खातील. दही, दूध, तूप खातील. आणि आज कितीतरी हरिजनांनी मृतमांस खाणें सोडून दिलें आहें. त्यांना तरी घेतां का जवळ? हरिजनांमध्यें हजारों वारकरीं आहेंत. वऱ्हाडच्या बाजूस हजारों हरिजन वारकरी आहेत. त्यांनी मद्यमांस सोडलेले आहें. परंतु त्यांना पंढरपूरच्या देवळांत येतं का जाता? तुमच्या मंदिरावर अशी पाटी लावा की आंघोळ केलेल्या लोकांनी आंत जावें. हातपाय धुवून आंत जावे. विडी न ओढणारानें आंत जावें. परंतु ' हरिजनांनीं आंत जाऊं नयें ', असें म्हणणे अर्थहीन आहे. तुम्ही कांही वागणुकीचे नियम करा. ते नियम पाळील तो जाईल. ते नियम न पाळणारा ब्राम्हण असता तरी त्याला मज्जाव करण्यांत येईल, असें करा ना.चौथे कोणी म्हणतात, ''हरिजनांची राहणी गलिच्छ असते.'' परंतु हरिजनांची राहणी सुधारावी असें वाटत असेल तर त्यांच्यांत जा. मुलांच्या नाकाला शेंबूड असेल तर तो आपण काढला पाहिजे. आणि हरिजनांची राहणी गलिच्छ असते त्यालाहि कारण त्यांचे दारिद्रय हेंच आहे. त्यांच्या बायका कोठून लावतील केसांना तेल? त्यांच्या कपडयांना कोठून मिळणार साबण? आंघोळीला कोठून मिळणार पाणी? पिण्यासहि ज्यांना पाणी मिळत नाही, त्यांनीं कपडे कोठें धुवावें, अंगें कोठें धुवावीं? हरिजनांची मुलें शाळेंत तुमच्या मुलांबरोबर बसूं देत. हरिजन तुमच्याकडे जाऊंयेऊं देत. तुम्ही त्यांच्यांत जाये करा. त्यांची आर्थिक स्थिति सुधारा. त्यांना शिक्ष्ज्ञण द्या. म्हणजे तुमच्यासारखे ते दिसतील.

लहान मुलें अकपट असतात. त्यांना कोठें धर्म माहित असतात. आपण त्यांना खोटे धर्म शिकवितों. मी माझ्या बहिणीच्यालहान मुलींना विचारलें, ''हरिजनांचीं मुलें तुमच्या घरी आणली तर तुम्हांस चालेल का?'' त्या मुलीं म्हणाल्या, ''ती घाणेरडी असतील. ती मुलें गलिच्छ असतात. ''मी सांगितलें, आपण त्यांना नीट आंघोळ घालूं. त्यांच्या अंगाला तेल लावूं. साबण लावूं. मग त्यांना जवळ घ्याल की नाहीं? '' त्या मुलीं म्हणाल्या, '' हो '', '' त्या लहान मुलांना पटकन समजलें. परंतु आम्हां वयानें वाढलेल्यांना कोण अहंकार ! कोणी पंडित विचारतात, '' पूर्वीच्या काळीं अस्पृश्यता होती म्हणून का हिंदुस्थान श्रीमंत नव्हता? अस्पृश्यता होती तरी का शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापता आलें नाही? '' या प्रश्नांना काय अर्थ? चो-या करुन मनुष्य श्रीमंत होतो म्हणून का चोरी समर्थनीय ठरते? अस्पृश्यता ठेवनहि पूर्वी श्रीमंत होते म्हणून का आज अस्पृश्यता ठेवायची? जी गोष्ट अन्याय आहे असें कळलें तिचा त्याग केंलाच पाहिजे. श्री. शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळविलें. परंतु तें पुढें तसेंच गेलें. कां गेलें? आमचा पायाच खंबीर नव्हता. आमच्यांत उच्चनीचपणा होता. पुढें पुढें तर ग्रामण्यें वगैरेनाच ऊत आला. शिवाशिवी म्हणजे राजकारण झालें ! ' मराठे व इंग्रज ' या पुस्तकांत तात्यासाहेब केळकर लिहितात, '' राज्य टिकवावें असें कोणासच वाटेना. हें राज्य आपलें आहे असें जनतेस वाटेंना. ''

आणि पूर्वी अमूक एक गोश्ट होती म्हणून आजहि ती असूं दें असें म्हणणें वेडेपणाचे आहे. धर्माचा आत्मा बदलत नसतो, परंतु धर्माचे शरीर बदलत असतें. मनुस्मृतीच्या वेळचे समाजाचे कपडे आज चालणार नाहीत. त्या वेळच्या चालीरीती आज कशा राहतील? थंडीत जे कपडे आपण वापरतो ते उन्हाळयांत चालणार नाहीत. सकाळी जे कपडे वापरुं ते भरदुपारी नकोसे वाटतील. '' बदल करा नाहीं तर मरा '' असा सृष्टीचा कायदा आहे. हजारों वर्षांपूर्वींच्या नियमांचे जूं आमच्या मानेवर बसवूं नका. मृताची सत्ता आमच्यावर कशाला? माणुसकीला साजेल तें करुं या.

आज सारें जग आम्हांला अस्पृश्य मानीत आहे. एडिंबरोच्या हॉटेलांत हिंदी लोकांना प्रवेश मिळत नाही. आफ्रिकेंत आमच्याबरोबर अन्याय होत असतात. अशी परिस्थिति आहे. तरीहि आम्ही आपसांत एकमेकांस तुच्छ मानीत आहोंत. जगांत आम्ही गुलाम ठरलों तरी त्याची आम्हांस शरम नाही. शेणांतील किडयांनी एकमेकांस नावें ठेवावी तसेंच हें आहे.पापें फळावयास कधी कधी हजारों वर्षे लागतात. अस्पृश्यतेसारखीं पापें करुनहि देशांत भाग्य होतें. परंतु त्या भाग्यवृक्षाला आंतून भुंगा लागलेला होता. तो दिसला नाहीं. आणिआज आतां झाड कोलमडून पडलें. तुम्हांला पूर्वीचे भाग्य दिसलें, परंतु त्या भाग्याला लागलेली कीड दिसली नाही. अहंकारांत राहिलेत, आज जगांत पै किंमतीचे झालेत.

आम्ही आमची दैवतें पाहूं तरीसुध्दा अस्पृश्यता दूर करावी असें वाटेल. आमच्या देवांना पशु पक्ष्यांची वाहनें आहेत. गणपतीसमोर उंदीर आहे. शंकरासमोर नंदी आहे. विष्णुसमोर गरुड आहे. रामासमोर वानर आहे. सरस्वती मोरावर आहे. ब्रम्हदेव हंसावर आहे. देवांनी सारी सृष्टी जणुं जवळ घेतली आहे. आणि शंकराचेंच रुप पहा. त्यांच्या अंगावर कातडें आहे. हातांत कपालपात्र आहे. अंगाला राख आहे. शंकराचें रुप म्हणजे हरिजनाचें रुप आहे. परंतु स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी शंकराची आम्ही पूजा करतो. आणि मृत पशु नेऊन त्याचें कातडें काढून समाजाची सेवा करणारा, गांवाबाहेर राहणारा हा मनुष्य देहधारी शिवशंकर आम्ही तुच्छ मानतों. शंकराच्या देवळांत कशाला जाता? आणि दत्तात्रेयाच्याजवळ तर कुत्रीं आहेत. तीं चार कुत्रीं म्हणजे चार वेद असें म्हणतात. मला तर त्याचा इतकाच अर्थ दिसतो कीं कुत्र्यांनाहि जो जवळ घेईल, ज्यांना आपण हडहड म्हणून हाकलतों, तरींहि जीं प्रामाणिक असतात अशा कुत्र्यांना जो जवळ घेईल त्याच्याजवळ वेद आहेत. अपमानितांचा जो कैवार घेतो तोच खरा थोर. आम्ही आमच्या लोकांस दूर ठेवलें. परधर्मीयांनी त्यांना जवळ केले. मुसलमानी धर्म समानता शिकवितो. मशिदींत सारे समान. ज्यांना आपण दूर ठेवले ते परधर्मात गेले. मुसलमानांची या देशांत लोकसंख्या वाढली, ती सारीच कांही बाटवाबाटवीनें वाढलेली नाहीं. हिंदुधर्मांतील जुलुमाला कंटाळुनहि लाखों लोक गेले असतील. कोटयवधि लोक केवळ जुलुमाने परधर्म घेत नाहीत. स्वधर्मात ज्यांना मान नाही, ते सत्ताधारी परधर्मीयाच्या धर्मात शिरतांच हिंदू त्यांना मान देतो ! एकाद्या हरिजनाला पाणी देणार नाहीं. परंतु तोच ख्रिश्चन होऊन शिकून अंमलदार होऊन आला की त्याला आम्ही मेजवानी देऊं ! मुसलमानांची लोकसंख्या वाढली म्हणून आम्ही बोंबलत असतों. परंतु बोंबलून काय होणार? त्रावणकोर संस्थानात लाखों लोक ख्रिश्चन झाले. असें कां झाले? कांही विचार करा. मिशनरी लोकांवर रागावण्यांत अर्थ नाही. हजारां मैलांवरुन हे मिशनरी येतात. आपली भाषा ते शिकतात. ज्यांना आपण दूर ठेवलें अश भिल्ल, गोंड, कातकरी वगैरे लोकांत ते जातात. त्यांना औषधें देतात, ज्ञान देतात, त्यांना अन्नवस्त्र देतात. त्यांच्यामध्यें जाऊन चित्रपट दाखवितात. हार्मोनियम वाजवितात. त्यांच्या मुलांना चित्रें देतात, खाऊ देतात. रात्रीबेरात्री कोणी स्त्री बाळंत होतांना अडली तर तिच्या सुटकेसाठी जातात. त्यांनी शेंकडो शाळा चालविल्या आहेत. शेंकडो दवाखाने घातले आहेत. महारोग्यांसाठी हिंदुस्थानात फक्त मिशन-यांचे दवाखाने आहेत. आम्ही काय करतों आहोंत?

परंतु महात्माजींना धर्मबुडव्ये म्हणून, मुसलमान धार्जिणे म्हणून नांवें ठेवणारे, हिंदु समाजाची महात्माजींनीं केवढी सेवा केली आहे ते विसरुन जातात. परधर्मांत गेलेला एक मनुष्य स्वधर्मात आणला म्हणजे आमचे कांहीं लोक टि-या बडवतात. परंतु महात्माजींनीं परधर्मात हजारों हिंदु जात, त्याला त्यांची सेवा करुन आळा घातला. गुजरातेंतील भिल्ल समाजांतच ठक्करबाप्पासारखे सेवक वर्षानुवर्षे सेवा करीत बसले. महाराष्ट्रांतील मामा फडके गुजरातेंत नडियादचे बाजूस भंगीसमाजांत काम करीत आहेत. खानदेशांत श्री. नानासाहेब ठकार भिल्लांत काम करीत आहेत. हिंदुस्थानभर महात्माजींचें श्रध्दादान अनुयायी या उपेक्षित बंधूंची सेवा करीत आहेत. त्यांना प्रेम देत आहेत. यामूळें मिशनरी चळवळीस केवढा तरी आळा बसला आहे. महात्माजींची ही सेवा थोर नाहीं का? निरभिमानपूर्वक केलेली, परधर्मास शिव्याशाप न देतां केलेली ही स्वधर्मींयाची सेवा देवाघरी रुजूं नसेल का? ब्राह्मण-ब्राह्मणेंतर वादाचा काळ संपला. आतां स्पृश्यास्पृश्यवाद सुरू होईल, अशी भीति वाटते. पण स्पृश्यांना हळूहळू त्यातील वैय्यर्थ कळेल. सार्वजनिक ठिकाणी शिवाशिवी मानणें अन्याय आहे, हें स्पृश्य शेतक-यासहि कळेल. कांही दिवस विरोध होतील. परंतु ते जातील. महाराष्ट्रांत भाऊराव पाटलांसारख्यांनी जीं बोर्डिगे चालविली आहेत, त्यांतून सर्व जातीचीं मुलें एकत्र शिकत आहेत. मराठे, माळी, कुणबी, मांग, चांभार, महार, कैकाडी, वडारी सर्व मुलें शिकत आहेत. हे तरुण उद्यां आपआपल्या जातींना सांगतील की ''ही शिवाशिव काढून टाका. खोटे धर्म नष्ट करा.''हरिजनांनी आपली लग्नाची मिरवणूक घोडयावरुन नाही काढतां कामा. त्यांच्या बायकांनी अंगावर दागिने नाही घालता कामा. त्यांनी स्पृश्यांसारखा पोषाख नाही करतां कामा. त्यांनी गव्हाची पोळी वैगरे नाहीं खातां कामा. एक का दोन, शेंकडों प्रकारचे अन्याय हिंदुस्थानच्या निरनिराळया भागांत चालू आहेत. देवास वगैरे संस्थानांतून तर पूर्वी फार भयंकर चाली असत. कोणाकडे समारंभ वगैरे असला तर हरिजन स्त्रियांच्या पोटावर वाद्यें वाजवावयाची ! असे प्रघात होते. एकदां एक गरोदर हरिजन भगिनी अशामुळें मरण पावली. ही रुढि आतां बंद झाली आहे. आम्ही हीं पापें कोठें फेडणार?

हरिजन म्हणजे जणुं स्पृश्यांच्या हातांतील हरकाम करणारी गुलामांची जात. हरिजन जर सुशिक्षित झाले, ते स्पश्यांप्रमाणे जर वागूं लागले, त्यांची माणुसकी जर जागी झाली तर हे हातचे कायमचे बंदे नोकर नाहीसे होतील, अशी स्पृश्यांना भीति वाटत आहे. अस्पृश्यता म्हणजे धर्म नाही, हें कां त्यांना समजत नाही? परंतु हातांतील सत्ता जाईल, हांक मारतांच जोहार करीत येणारा, ' भाकरी वाढाहो माई ' म्हणणारा नोकर नाहींसा होईल, ही भीति स्पृश्यांस वाटत आहे. आर्थिक पिळवणूक त्यांना कायम ठेवायची आहे. हा धर्म नसून आर्थिक प्रश्न आहे.परंतु आतां हरिजनांचा आत्मा जागा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीं स्वाभिमानाची ज्योत त्यांच्यांत पेटविली आहे. ज्या स्मृतीमुळें आम्ही अस्पृश्यता मानतो, त्या स्मृतींचा येथें अभ्यास होतो, त्या कॉलेजचे डॉक्टर आंबेडकर प्रिन्सिपॉल होते ! हरिजन कोणत्याहि बौध्दिक गोष्टींत मागें राहणार नाहींत, हे डॉक्टरसाहेब दाखवित आहेत. हरिजनांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आम्हां पांढरपेशांचीच बुध्दि आतां निकस होत चालली आहे. हजारों वर्षे आमच्या बुध्दिचा कस जात आहे. परंतु हरिजनांची मनोभूमि पडित आहे. तिच्यातून आजवर पीक घेतलें नाही. या पडित वावराची आतां मशागत होऊं लागली आहे. बुध्दिचें भरपूर पीक निघेल. मागे एकदां मनमाडच्या रेल्वेंच्या हायस्कुलांत हरिजन विद्यार्थ्यांनीं संस्कृत घेतलें, परंतु ब्राम्हण वग्ैेरे विद्यार्थ्यांनी संस्कृत कठीण म्हणून सोडून दिले, असे तिथलें एक शिक्षक मित्र मला सांगत होते. हरिजन विद्यार्थी सर्व क्षेत्रांत जातील. त्यांची बुध्दि सर्वत्र चमकेल.

मागें एक मित्र एकदां मला म्हणाले, '' तुम्ही समानतेच्या गप्पा मारतां मग हरिजनांनाच आर्थिक शिष्यवृत्या कां देतां? '' असा प्रश्न कोणी कोणी विचारतात. परंतु समानता याचा अर्थ काय? ज्यांची आजपर्यत उपेक्षा झाली त्यांना अधिक देणें म्हणजे समानता. म्हणून हरिजनांना अधिक सवलती दिल्या पाहिजेत. त्यांना गोडी लावली पाहिजे. ज्यांच्यावर हजारों वर्षे आपण अन्याय केले, ज्यांच्या जवळून भरपूर सेवा घेऊन त्यांना पशुसम स्थितीत ठेवलें, त्यांच्या बाबतीत कर्तव्य करावयास नम्रपणें आतां तरी आपण उभें राहूं या. तोंडदेखली सहानुभूति नको. तोंडपाटीलकी करण्यांत आपला हातखंडा आहे. परंतु प्रत्यक्ष कृतींच्या नांवाने शून्याकार ! येतांजातां या उपेक्षित बंधूची स्मृति आपण ठेवूं या. जास्तीत जास्त मदत त्यांच्या उध्दारार्थ करुं या. आपण भांडीं बाहेरुन घांसतो, परंतु आंत काळें असतें. तसें आपलें होतां कामा नयें. वरुन प्रेम नको, आंतहि प्रेमाचा प्रकाश भरुं दे. हरिजन आपल्या घरीं आणा. त्यांना तुमच्या घरीं शिकण्यासाठी ठेवा. त्यांच्या शिकण्याची व्यवस्था करा. हरिजन नोकरचाकर घरांत हिंडूं देत, वावरुं देत. ' शिवूं नको धर्म ' पुरें झाला. माणुसकीचा प्रेममय धर्म आणूं या.

आणि सेवा करून कांही अपेक्षा धरूं नका. थोडी सेवा करून लगेच '' हे हरिजन तर काँग्रेसचे सभासद होत नाहींत '' असे म्हणूं नका. आज आपली सत्त्वपरीक्षा आहे. हजारों वर्षे केलेले अन्याय दहा पांच वर्षाच्या अल्पशा सेवेनें हरिजन कसे विसरणार? तुमची ही सेवा वरपांगी, तात्पुरती, राजकीय कामापुरती आहे असें त्यांना वाटले तर त्यांचा काय दोष? तुमची सेवा जिव्हाळयाची आहे की नाही याची कसोटी ते घेतील. डॉ. आंबेडकर हरिजनांना कायमचे निराळे करूं पहात होते. ब्रिटिश सरकारचें धोरण फाटाफुटी पाडण्याचें. त्यांनीं त्याप्रमाणें करावयाचें ठरविले. परंतु महात्माजींनीं प्राणांतिक उपोषण करावयाचे ठरवून ब्रिटिश राजनीतीला हिंदुधर्मांची हीं दोन शकलें करूं दिली नाहींत. परंतु आतांच तर खरी परीक्षा आहे. वास्तविक डॉ. आंबेडकरांना इतर सर्व पक्षांपेक्षा काँग्रेस अधिक जवळची वाटावी. परंतु ते ! इतर सर्व वर्गांना, इतर सर्व पक्षांना जवळ करतील आणि काँग्रेसला शिव्याशाप देतील. हरिजनांना दूर ठेवणा-यासहि ते हरिजनांची मतें देववतील, परंतु हरिजनांसाठी इतर सर्वांहून अधिक काम करणारी जी काँग्रेस तिच्या उमेदवारास पाडण्याची ते खटपट करतील ! अशा वेळेस जर आपण त्रासून म्हणूं, '' आपण यांच्यासाठी सहानुभूति दाखवावी, आपण यांच्यासाठी स्वत:च्या आप्तेष्ठांपासून दूर व्हावे. तर यांचे आपणांस अधिकच शिव्याशाप ! काय करायचे? काय करायचे यांची सेवा करुन; हे कृतघ्न लोक आहेत. '' जर असें आपण म्हणूं तर परीक्षेंत नापास होऊं. याच गोष्टीची श्री. आंबेडकर वाट पहात आहेत. ते मग लगेच दुनियेला सांगतील, '' पहा यांची सेवा थांबली. याची तात्पुरती वरपांगी कळकळ होती. आम्ही व हे कधींहि जवळ येऊं शकणार नाही. आम्ही अलग असणेंच बरें. ''

वसंता, म्हणून आपण कंटाळता कामा नये. हजारों वर्षे आपण अन्याय केले त्यांची आपण कल्पना करावी. हरिजनांच्या मनांत केवढी अढी असेल तें मनांत आणावें. तें मनांत आणून ती पूर्वी पापें स्मरून, कोणत्याहि फळाची अपेक्षा न धरतां सर्व शिव्याशाप सहन करून प्रायश्चितरूप सेवा आपण केली पाहिजे, तरच हरिजन एक दिवस प्रसन्न होतील. हे दूर झालेले भाऊ प्रेमानें भेटतील. आज कोठें कोठें असें अनुभव येतात कीं हरिजनांसाठीं एकादें मंदिर उघडलें तर महार बंधु वगैरे येत नाहींत. परंतु त्यामुळें आपण रागावूं नये. लहान मूल प्रथम आईनें घ्यावें म्हणून रडत असते. परंतु मग आई घ्यायला आली तर ते उलट रागावते व आईचा हात झिडकारतें. त्यामुळें आईला राग का येतों? ती अधिकच कळवळते. किती वेळ मी मुलाला ओरडत ठेवलें. असें तिच्या मनांत येतें. तसेंच हे हरिजन आजपर्यत जवळ घ्या असें म्हणत होतें, परंतु आतां आपण त्यांना जवळ घ्यायला गेलों तर ते दूर जातात. परंतु त्यामुळें आपण रागावतां कामा नये. त्यांना अधिकच प्रेम दिलें पाहिजे ख-या आस्थेनें त्यांना जवळ घेतलें पाहिजे. हरिजन वर्ग हा समाजांतील सर्वांत खालचा वर्ग. विद्वत्ता, पैसा, किंवा समाजजीवनांतील त्यांचें स्थान, या सा-याच दृष्टीनें त्यांना जणुं वाळीत टाकलेले. अशा समाजाची सुधारणा म्हणजे केवळ सुधारणा नाही, तर ती एक प्रंचड क्रान्ति आहे. केवळ स्वातंत्र्याची चळवळ नाहीं पुरेशी पडणार त्यांच्या उध्दाराला ! क्रान्ति म्हणजे सर्वांगीण क्रान्ति. केवळ सत्तेची आलटापालट नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, तत्वज्ञानिक अशी क्रान्तिच हरिजनांच्या उपयोगी पडेल. जीवनाची मूल्येंच नवीं उभारली पाहिजेत. जुनीं मूल्यमापनें उपयोगी पडणार नाहींत. अशी क्रान्ति समाजवादीच क्रान्ति असेल. खरा समाजवादी पक्षच ती करुं शकेल.वसंता, या लहानशा पत्रांत मी किती लिहूं? तुझ्या सेवादलांतील मुलें हरिजनवस्तीत जाऊं देत. तेथें स्वच्छता करुं देत. हरिजन मुलांना पुस्तकें, कपडे वगैरे जी मदत देतां येईल ती गोळा करुन देऊं देत. कीव म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून. संक्रान्त, दिवाळी वैगरे सणांच्या दिवशीं त्यांच्यांत जात जा. त्यांना तिळगूळ द्या. दस-याला त्यांना सोनें द्या. प्रेम वाढवा. सहकार्य वाढवा. ' सबसे उँची प्रेम सगाई ' हें प्रेमाचें नातें सर्वात श्रेष्ठ मानावें. हरिजनांत मित्र जोडा. त्यांना औषधें वगैरे नेऊन द्या. तुमचें सेवा दल आहे. नुसत्या लाठया काठया फिरवणारें तुमचें दल नाहीं. लाठी फिरवून हात मजबूत करा. परंतु तो मजबूत हात दुस-याचें दू:ख दूर करण्यासाठी झिजो.स्पृशास्पृश्य, श्रेष्ठकनिष्ठ, हिंदुमुसलमान सारे जवळ येण्याची खटपट करूं या. भारत मातेचें तोंड उजळ करूं या. प्रेमानें फुलवूं या. असो, तुण्या वैनीस सप्रेम प्रणाम. तुझ्या वडील बंधूंस व वडिलांस कृतानेक प्रणाम. तुझ्या भावास, रामास व सेवादलांतील सर्वांस सप्रेम प्रणाम.तुझाश्याम