Shyamachi Patre - 5 books and stories free download online pdf in Marathi

श्यामचीं पत्रें - 5

श्यामचीं पत्रें

पांडुरंग सदाशिव साने

पत्र पाचवे

खरें आस्तिक व्हा !

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, परंतु शरीरांतील मनें विषारी होत आहेत. आपल्या संघटनेंतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊं देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे ! दुनियेंतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दिच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत. आपल्या हिंदुधर्मांत गायत्री मंत्राला आपण अत्यंत पवित्र मानलें आहे. कां बरें? वेदांत शेकडों मंत्र आहेत. परंतु ह्याच मंत्राला आपण प्राधान्य कां दिलें? कारण या मंत्रात स्वतंत्र विचारांची देणगी मागितली आहे. सूर्याजवळ प्रार्थना केली आहे कीं, '' हे सूर्या, जसा तुझा प्रकाश स्वच्छ आहे, तशी आमची बुध्दि सतेज राहो. आमच्या बुध्दिला चालना दे. '' गायीगुरें, धनसंपत्ति, संतति वगैरेंची मागणी करणारे वेदामध्यें शेंकडों मंत्र आहेत, परंतु बुध्दिची मागणी करणारा मंत्र आपण पवित्र मानला. ती बुध्दिच आज मारली जात आहे. एका ठराविक सांचाचें अहंकारी विषारी खाद्य अशा संघटनांतून दिलें जात आहे. या संघटनाचें पुरस्कर्ते आपापल्या संघटनांभोवतीं भिंती बांधीत आहेत. बाहेरच्या विचारांची त्यांना भीति वाटते. परंतु बाहेरचे विचार आल्याशिवाय राहणार नाहींत. विचारांना कोण अडथळा करणार? हिमालयाचीं उंच शिखरें ओलांडून ते विचार धांवत येतील. सप्तसागर ओलांडून ते विचार येतील. तुमच्या भिंती कोलमडून पडतील. नवविचारांची ज्यांना भीति वाटते, त्यांचें तत्वज्ञान कुचकामी आहे. बायबलमध्यें एक वाक्य आहे, ''तुझें घर खडकावर बांध म्हणजे तें वादळांत पडणार नाहीं, पावसांत वाहून जाणार नाहीं.'' त्याप्रमाणें आपल्या संघटना शास्त्रीय विचारांच्या पायावर उभारल्या पाहिजेत. परंतु शास्त्रीय विचारांची तर या संकुचित मंडळींस भीति वाटते.वसंता, एखादें लहानसें रोपटें तूं उपटून बघ. त्याचीं मुळें एकाच दिशेला गेलेलीं दिसतील का? नाहीं. झाडांचीं मुळें दशदिशांत जातात. जेथें जेथें ओलावा मिळेल तेथें तेथें जाऊन तो ओलावा घेऊन झाडें उभीं राहतात. त्याप्रमाणें आपलें जीवन हवें. ज्ञानाचा प्रकाश कोठूनहि येवो. त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. दाही दिशांतून प्रकाश येवो. सर्व खिडक्या मोकळया असूं देत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत काय चालतें? अन्य मतांचा वाराहि आपल्या संघातील मुलांच्या कानांवर येऊं नयें म्हणून तेथें खटपट केली जाते ! मी मागें संगमनेर येथें गेलो होतों. सायंकाळी माझें व्याख्यान आहे असें जाहीर होतांच संघचालकांनी एकदम आपलीं मुलें कोठेंतरी बाहेर नेण्याचा कार्यक्रम ठरविला. तुला हा अनुभव आहेच. तूंच मागें आपल्या पहिल्या भेटींत म्हणाला होतास. ''आमची कींव करा. आम्हांला दुसरे विचार ऐकूंच देत नाहीत.'' ती सत्य गोष्ट आहे. मला या गोष्टींचें फार वाईट वाटतें.

पलटणींतील लोक असतात ना, त्यांना अज्ञानांत ठेवण्यांत येत असतें. सरकार पसंत करील तींच वर्तमानपत्रें मिळालीं तर त्यांना मिळतात. नवाकाळ, लोकमान्य, लोकशक्ति, क्रॉनिकल अशीं राष्ट्रीय पत्रें पलटणींत जातील का? पलटणींतील शिपायांना पशूप्रमाणे मारामारींसाठी तयार ठेवण्यांत येते ! गोळी घाल म्हणतांच त्यांनी गोळी घातली पाहिजे. सत्य काय असत्य काय, याचा विचार त्यांनी करायचा नसतो. पलटणींत जसें हे विचारशून्य टॉमी तयार करण्यांत येतात तसेच आम्हीहि आज टॉमी तयार करीत आहोंत ! शत्रूंचाद्वेष ही एकच गोष्ट शिपायांस सांगण्यांत येतें. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीच्या वेळेस फ्रेंच लोक म्हणजे आग लावणारी माकडें आहेत, अशा प्रसार इंग्लंडमध्यें करण्यांत येई. एकदां फ्रेंच कैदी लंडनमधील रस्त्यातूंन नेले जात होते. फ्रेंच माणसास खरोखरीच पाठीमागें शेपटें असतात कीं काय तें पाहण्यासाठी त्यांचे कोट इंग्रज लोक पाठीमागून गंभीरपणें उचलून बघत ! विषारी प्रचाराचा असा परिणाम होत असतो.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतें बौध्दिक खाद्य दिलें जातें? वर्तमानपत्रांत मुसलमानांनी केलेले अत्याचार जे येतील, त्यांचीं कात्रणें म्हणजे यांचे वेद ! ''कृण्वन्तो विश्रमार्यम्'' हें यांचें ब्रीद वाक्य. ''हिंदुस्थान है हिंदुओंका, नहीं किसी के बाप का.'' हा यांचा महान मंत्र. जर्मनीने ज्यू हद्पार केले. आपणहि मुसलमानांना घालवूं, हें यांचें स्वप्न. आपली संस्कृति, आपला धर्म किती उच्च ! हे मुसलमान म्हणजें बायका पळवणारे. मुसलमान म्हणजे शुध्द पशु. त्यांना न्याय ना नीति. मुसलमानांना लांडे या शिवाय दुसरा शब्द ते लावणार नाहीत. असा हा मुसलमान द्वेष लहान मुलांच्या मनांत ओतण्यांत येत आहे. मुस्लिम लीग व हिंदुमहासभा दोघांकडून हें पाप होत आहे. बायबलमध्यें एक वाक्य आहे, ''माझ्या लहानग्यांना जो बिघडवितो त्यानें सर्वांत मोठें पाप केलें !'' आज असें पाप आमचे जातीय पुढारी करीत आहेत. त्यांना ना धर्माची ओळख ना संस्कृतीची. एखाद्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष करणें म्हणजें केवळ मनुष्यद्रोह आहे. भलेबुरे लोक सर्वत्रच आहेत. त्यामुळें सर्वच्या सर्व लोकांना पशु मानणें म्हणजे बुध्दिचें दिवाळें निघाल्याचें चिन्ह आहे. १९१४-१८ च्या महायुध्दांत शत्रूकडच्या कैद्यांना सर्वांत चांगल्या रीतीने जर कोणी वागविलें असेल तर तें तुर्कस्ताननें, असा युरोपिय राष्ट्रांनीं निकाल दिला. तुर्की लोक मुसलमान धर्माचेच आहेत. मुसलमान लोक सभ्यता, दिलदारी याबद्दल प्रसिध्द आहेत. हिंदुस्थानांतील सारे मुसलमान का पै किंमतीचे? कोटयवधि लोक पै किंमतीचे निर्माण करणारा तो ईश्वरहि मग पै किंमतीचा ठरेल.हिंदुस्थानांतील मुसलमान हिंदूंतूनच गेलेले असेंहि आपण म्हणतों. जर हे हिंदी मुसलमान तेवढे वाईट असतील तर आपण हिंदूच वाईट असा त्याचा अर्थ होतो. कारण हे मुसलमान प्रथम हिंदुच होते, असें आपण सांगत असतों. वसंता, पापाचा मक्ता कोणा एका जातीला नाही. हिंदू स्त्रियांना मुसलमान गुंड पळवतात. पुष्कळ वेळां आमच्याच श्रीमंत लोकांना त्या सुंदर स्त्रिया हव्य असतात. मुली किंवा बायका पळविण्या-या टोळया असतात. त्यांत हिंदु व मुसलमान दोन्ही प्रकारचे लोक असतात, असें दिसून आलें आहे.

पुष्कळ वेळां हिंदूंच्या रुढींमुळेंहि हिंदुस्त्रिया अनाथ होतात. जरा वांकडे पाऊल पडलें तर त्या स्त्रीला आपण जवळ घेत नाही. जणुं आपण सारे पुरुष पुण्यात्मेच असतों ! अशा निराधार स्त्रिया मिशनमध्यें जातात किंवा मुसलमान त्यांना जवळ करतात. याचा अर्थ असा नाही कीं कांही मुसलमान गुंड अत्याचार करीत नसतील, परंतु गुंडांना शिक्षा करा. सारे मुसलमान बायका पळविणारे असें म्हणूं नका. सबंध जातच्या जात नीच मानूं नका. त्यांच्यातहि आयाबहिणी आहेत, हें आपण विसरतां कामा नयें.जे मुसलमान गुंड असतील त्यांचे शासन होऊं नये असें काँग्रेसनें कधींच म्हटले नाहीं. स्त्रियांवर अत्याचार झाला तर महात्माजी किती संतापतात. मागें मुंबईला आस्ट्रेलियन टॉमींनीं हिंदी स्त्रियांचा अपमान केला. त्या विरुध्द शेवटी कोणी लेखणी उचलली? उठल्यासूटल्या मुसलमानांच्या काल्पनिक वा अतिशयोक्तीने भरलेल्या अत्याचारांवर टीका करणारे आमचे सारे जातीय हिंदु पुढारी व त्यांचीं पत्रें मूग गिळून बसली होतीं. मुसलमानांवर टीका करतील, परंतु साहेबावर आणि त्यांतल्या त्यांत लढाईच्या काळांत डिफेन्स अ‍ॅक्ट चालूं असतां, कोणी टीका करावी? परंतु महात्माजींनीं जळजळीत लेख लिहिला. हिंदी स्त्रियांची अब्रु सांभाळण्यासाठी हाच एक धीरवीर महात्मा उभा राहिला. व्हाइसरॉय का झोपले, सैन्याचे अधिकारी का झोपले, असें त्यांनी विचारलें, अणि शेवटी लिहिलें, '' हिंसा वा अहिंसा, स्त्रियांची विटंबना होतां कामां नये. हिंदी स्त्रियांच्या अब्रुला धक्का लागता कामा नयें. जनतेनें तत्क्षणीं त्याचा प्रतिकार केला पाहिजे. ''गुंडांचें पारिपत्य झालें पाहिजे. स्त्रियांच्या अब्रुचें रक्षण केलें पाहिजे. परंतु तेवढयासाठी संबंधच्या सबंध मुसलमानांस सारख्या शिव्या देण्याची जरुरी नाही. 'लांडे असेच !' असें म्हणण्याची जरूरी नाही. आणि आपणहि आपल्या स्त्रियांना अधिक उदारपणें वागविले पाहिजे. 'कृण्वन्तो विश्रमार्यम्' याचा अर्थ काय? सर्वांना का तुमच्या धर्माची दीक्षा देणार? सर्वांना का शेंडया व जानवी देणार? जगांत केवळ आर्य जात नहीं. या देशांतच द्रविडीयन लोक आहेत. ते का आर्य आहेत.? आर्य तेवढे चांगले असा अहंकार भ्रममूल आहे. जगाच्या संस्कृतींत सर्व मानवी वंशांनी भर घातली आहे. आज हिटलर म्हणतो कीं '' आर्य तेवढे सर्वश्रेष्ठ. ज्यूंना द्या हांकलून. '' परंतु आइन्स्टीन सारखे शास्त्रज्ञ ज्यूंत निर्माण झाले. कोणतीही एक जात, कोणताहि एक मानववंश इतरांपेक्षां श्रेष्ठ असें नाहीं. कोणासहि अहंची बाधा व्हायला नकों.'कृण्वन्तो विश्रकार्यम्' याचा अर्थ इतकाच कीं आपण सर्व जगाला उदार व्हायला शिकवूं यां. आर्य म्हणजे दार-चरित. आपण एक जात मुसलमानांना निंद्य म्हणू तर आपणच अनुदार व अनार्य ठरुं. आर्य म्हणवून घेण्यास नालायक ठरूं ' अरिषु साधु: स आर्य: ' शत्रू जवळहि जो प्रेमानें वागतो तो आर्य, असा आर्यपणा आपणांजवळ कोठें आहे? आपण आपल्या शेजारी शेंकडों वर्षे राहणा-यांना आज पाण्यांत बघत आहांत. हा का आर्यपणा?

जर्मनीनें कांही लाख ज्यू लोकांस बाहेर घालविलें. आपण आठ कोटी मुसलमानांस कसे बाहेर घालवणार? ते तर शेंकडो वर्षें घरेंदारें करुन येथें राहिले. हिंदुमुसलमान नव संस्कृति निर्मित होते. परस्पर प्रेमभाव शिकत होते. जर्मनीचें अनुकरण करणें म्हणजे वेडेपणा आहे. भारताची परिस्थिति निराळी, भारतीय राष्ट्राची परंपरा निराळी, इतिहास निराळा, आणि शेजा-यांस घालवण्यांत पुरुषार्थं नाही. त्यांच्याशीं मिळतें घेऊन सहकार्य करण्याची पराकाष्टा करणें यांत मोठेपणा आहे.आपण मुसलमानांच्या शेजारी शेंकडों वर्षें रहात आहोंत. सहा हजार मैलांवरून आलेल्या इंग्रजांचे वाङमय आपण आत्मसात केलें. आपण इंग्रजीत बोलूंलिहूं. इंग्रजी ग्रंथातील उतारें देऊं. पाश्चिमात्य संस्कृति आपण पचनीं पाडली. मुसलमानबंधु इतकीं वर्षें आपल्याजवळ रहात आहेत, परंतु त्यांची भाषा शिकण्याची, त्यांची संस्कृति अभ्यासण्याची, त्यांच्या धर्मांतील चांगुलपणा पाहण्याची बुध्दि आपणांस झाली नाहीं. एक काळ असा होता कीं ज्या वेळेस हें आपण करीत होतो. हिंदुमुसलमान एकमेकांचे चांगले घेत होते. एकमेकांची भाषा बोलत होतो. परंतु ब्रिटिश आले आणि आपण परस्परांचे शत्रु बनलो. परसत्तेचे मात्र आपण पाय चाटीत बसलों.मुसलमानी धर्म का केवळ वाईट? मुहंमद पैगंबरांचीहि आम्हीं कधीकधीं कुचेष्टा करतों. ज्या थोंर पुरुषानें वाळवंटातील लोकांत अशी ज्वाला पेटविली कीं जी क्षणांत स्पेनपासून चीनपर्यंत पसरली, तो पुरुष का क्षुद्र? तो पुरुष का रंगीला रसूल? जनता कोणाच्या भजनी लागते? जनता शील व चारित्र्य ओळखते. मुहंमद चारित्र्यहीन असते तर आज पंधराशें वर्षे पंचवीस तीस कोट लोक त्यांच्या नादीं कां राहतें? इंग्लंडमधींल विश्वविख्यात इतिहासकार गिबन यानें मुहंमदाची स्तुतिस्तोत्रें गायिलीं. गिबनला का कोणी लाच दिली होती? कार्लाईल या प्रसिध्द पंडिताने मुहंमदांवर स्तुतिसुमनांजलि वाहिली. कार्लाईलला का कळत नव्हतें? मुहंमद पैगंबर एक ईश्वरी विभूति होते. त्यांना जेव्हां एकानें विचारलें, '' तुम्ही कांही चमत्कार करा. '' तेव्हां ते म्हणाले, '' वाळवंटात मधूनमधून झरे दिसतात. वाळवंटात गोड खजुरीचीं झाडें आढळतात. समुद्रावर लहानशा होडयाहि डौलानें नाचतात. माणसावरच्या प्रेमानें सायंकाळ होतांच त्यांची गाईगुरें घरीं परत येतात. असे हे चमत्कार सभोंवती भरले आहेत. आणि न शिकलेल्या मुहंमदांच्या तोंडून ईश्वर कुराण बोलवितो, हा का चमत्कार नाहीं? जग चमत्कारानें भरलेलें आहे. मी काय आणखी चमत्कार करूं?

मुहंमदांची राहणी साधीं. ते पाणी पीत व कोरडी भाकर खात. एकदां शत्रु त्यांच्या पाठीस लागला होता. मुंहमद थकून झाडाखाली झोपले. तो वैरी तेथें आला. त्यानें तलवार उपसली. मुहंमद जागे झाले. त्यांनी वै-याकडे पाहिलें. वै-याच्या हातची तलवार एकदम गळली. महंमदांनी ती झटकन उचलली व ते म्हणाले, '' आतां मी तुला मारु शकतों. परंतु मी मारीत नाहीं. जा. मला मारणा-याला मी प्रेम देतों. '' असें हें मुहंमदाचें अंतरंग.

धर्मांमध्यें कांही भाग अमर असतो. कांहीं त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणें असतो. अरब लोक आपसांत भांडत होते. त्यांचीं भांडणे मिटविण्यासाठी मुहंमद म्हणाले, '' आपसांत काय भांडता? दुनियेंत जा. जग तुमचें आहे. तुमचा धर्म जगाला द्या. '' आपल्या मराठयांच्या इतिहासांत असाच एक प्रसंग आहे. राजाराम महाराजांच्या वेळेस मराठे आपसांत भांडत होते. तेव्हां राजाराम महाराजांनीं असें फर्मान काढलें, '' दिल्लीच्या साम्राज्याचा जो जो मुलूख कोणी जिंकून घेईल, तो तो त्याला जहागीर म्हणून देण्यांत येईल ! हें जाहीर होतांच आपसांत भांडणारे मराठे सरदार हिंदुस्थानभर पसरले. दिल्लीच्या साम्राज्याचे लचके त्यांनीं तोडले. मुहंमदांनाहि त्या वेळेस तसा सल्ला द्यावा लागला. याचा अर्थ नेहमीच परधर्मीयांना मारा असा नव्हे. कुराणांत एक ठिकाणी लिहिलें आहे, '' ज्याप्रमाणें मला ईश्वरी ज्ञान झालें आहे, त्याप्रमाणें जगांत इतर महात्मांसहि झालें असेल. अरबांनों, तुम्ही मला मान देतां तसा त्यांनाहि द्या. '' मुसलमानी धर्मांत थोर तत्वें आहेत. त्याकडे आपण लक्ष दिलें पाहिजे. तो खरा धर्मात्मा कीं जो दुस-या धर्माविषयीहि आदरबुध्दि दाखवितो. तो खरा मातृभक्त्त, जो इतर मातांसहि मान देतो. तो खरा देशभक्त, जो इतर देशांच्या स्वातंत्र्याचीहि इच्छा करतो. जो दुस-या धर्माची टिंगल करील त्याला धर्म कळलाच नाहीं. गीतेनें सांगितलें आहे कीं '' जेथें जेथें मोठेपणा दिसेल तेथें तेथें माझा अंश मान ! ईश्वराचा मोठेपणा सर्वत्र भरलेला आहे. स्वामी विवेकानंद मुहंमदांच्या जन्मतिथीस उपवास करीत, ख्रिस्ताच्या जयंतीस उपवास करीत, ज्याप्रमाणें रामनवमी, गोकुळाष्टमीस ते उपवास करीत. विवेकानंदांना का हिंदुधर्मांचा अभिमान नव्हता? परंतु त्यांचा अभिमान मुहंमद पैगंबरांची पूजा करण्याइतका आर्य होता.किंती सुंदर सुंदर संवाद व वचनें मुसलमानी धर्मग्रंथांतून आहेत. एके ठिकाणी प्रभूचा देवदूतांशीं झालेला संवाद आहे. देवदूत परमेश्वराला विचारतात, '' सर्वं जगांत बलवान काय? '' देव म्हणाला, '' लोखंड. ''त्यांनीं पुन्हा विचारले, '' लोखंडाहूनहि बलवान काय? ''ते म्हणाले, '' अग्नि ! कारण अग्नि लोखंडाचा रस करतो. ''त्यांनीं पुन्हा विचारले, '' अग्नीहून प्रबल कोण? ''देव म्हणाला, '' पाणी. कारण पाण्याने अग्नि विझतो. ''पुन्हा त्यांचा प्रश्न आला, '' पाण्याहून बलवान कोण? '' तो म्हणाला, '' वारा. कारण वा-यामूळें पाण्यावर लाटा उत्पन्न होतात. ''पुन्हा ते विचारते झाले, '' वा-याहून प्रबळ काय? ''देव म्हणाला, '' पर्वत. कारण पर्वत वा-यांना अडवतात. ''

शेवटीं प्रश्न आला, '' पर्वताहून प्रबळ कोण? ''देवानें उत्तर दिलें, '' परोपकारी हृदय. तें पाषाणासहि पाझर फोडील. ''असे हे संवाद त्या धर्माचा गाभा आहे. '' तूं एकटा खाऊं नकोस. शेजा-याला तुझी भाकर दे. '' असें कुराण सांगतें. सुफी कवि म्हणतात, '' बाहेरच्या मशिदीचा दगड दुखावला गेला तरी चालेल, परंतु कोणाच्याहि दिलाची मशिद दुखवूं नकोस ! ''आपण कच-याच्या पेटीजवळ कचरा टाकतो. तेथें धान्याचा अंकुर वर आलेला दिसतो. तो सुंदर अंकुर त्या कच-यांतून का वर आला? नाहीं. त्या कच-यात धान्याचा एक टपोरा दाणा होता. त्या दाण्यांतून तो अंकुर वर आला. कच-यांत ती शक्ति नव्हती. जगांत जें सत्य आहे त्याचीच वाढ होते. जी कांहीं पुण्याई असते ती फळत असते. ती पुण्याई संपली म्हणजे भाग्य संपतें. जगांत कोठेंहि कोणाचाहि जो विकास होतो, तो त्यांच्या पापांमुळे होत नसतो. काहींतरी सत्अंश त्या पापसंभारांत असतो. तो सत्अंश वाढतो.

आणि मी मागेंच सांगितलें आहे कीं, पूर्वीच्या इतिहासांतून भलें तें घेऊन पुढें जाऊं या. वसंता, परवा गाडींत एक गृहस्थ भेटले होते. ते म्हणूं लागले, '' मुसलमानांचें सारें आमच्या उलट. त्यांना धर्मच नाहीं. हिंदूंच्या उलट करणें म्हणजें जणूं त्यांचाधर्म ! आम्ही पूर्वेकडे, सूर्याकडे तोंड करूं तर त्यांचें पश्चिमेकडें तोंड. आम्ही दाढीं काढूं तर ते दाढी राखतील. आम्ही अलग अलग जेवूं. ते एका थाळींत जेवतील. '' असें त्या गृहस्थांचें व्याख्यान चालूं होतें. लहान कोंवळया मुलांनाहि या गोष्टी सांगण्यांत येतात, परंतु केवळ हिंदूंच्या उलट करणें हा त्यांत हेतु नाहीं. मक्का पश्चिमेकडे आहें. तिचें स्मरण म्हणून ते पश्चिमेकडे तोंड करतात. आपल्यांतहि उत्तरेकडे तोंड करुन औषध घेण्याची पध्दत आहे. संध्येच्या वेळीं कधीं कोणी उत्तरेंकडेहि तोंड करतात. कां बरें? आपण उत्तर ध्रूवाकडून आलों त्याची तू खूण आहे. मुसलमान पश्चिमेकडे पाहतात म्हणून जर त्यांना या देशांत स्थान नसेल तर आपण उत्तरेकडे पाहतों म्हणून आपणांसहि नसावें. मुसलमान बाहेरून येथें आले आणि आपण का येथलेंच आहोंत? आपणहि ध्रूवावरच्या बर्फात पुन्हा मरायला जाऊं या. फक्त द्रवीडियन लोकांना येथें राहूं दे.त्या त्या देशांतील परिस्थितीप्रमाणें रीतिरिवाज पडत असतात. अरबस्थानांत वाळवंटे आहेत. वा-यानें वाळॅ उडते. दाढीमुळे संरंक्षण होतें. ती वाळू नाकातोडांत शिरत नाहीं. अरब लोक एकत्र जेवत. त्यांचे खाणें कढी-आमटीचें नसे. त्यांचा आहार म्हणजे सुका मेवा, किंवा कोरडी भाकर. चादरीवर खजूर पसरीत, एकत्र खात. ती चाल इकडेहि आली. इकडे कढीभात ते खाऊं लागले ! परंतु एकत्र जेवणाची चाल राहिली. मारवाडांत पाणी कमी म्हणून तेथें भांडी कोरडयाच राखेनें घांसतात. मारवाडी महाराष्ट्रांत आले तरी तीच चाल त्यांची राहिली. अशा चाली राहतात. त्या केवळ दुस-यांच्याविरुध्द वागण्यासाठी नसतात.मुसलमान,गाईची कुरबानी करतात. या चालींचा इतिहासहि पाहिला पाहिजे. एक मुसलमान साधु होता. देव व देवदूत यांच्यांत चर्चा चालली होती. देवदूत म्हणाले, '' देवा, तो कांही तुझा खरा भक्त नाहीं. '' देव म्हणाला, '' तो साधु माझाखरा भक्त्त आहें. मी त्याची परीक्षा घेतों. '' देव त्या साधूच्या स्वप्नांत आला व म्हणाला, '' तुझी सर्वांत प्रिय अशी जी वस्तु असेल ती मला अर्पण कर. '' साधु दुस-या दिवशी जागा झाल्यावर विचार करूं लागला. त्याचीं आवडती एक बकरी होती. देवानें ती बकरी कां मागितली? त्यानें ती आवडती बकरी बळी दिली. परंतु देव पुन्हां स्वप्नांत आला व म्हणाला, '' त्या बकरीहूनहि प्रिय अशीं एक वस्तु तुझ्याजवळ आहे ती मला दे. '' साधु सकाळी विचार करूं लागला. तो म्हणाला, '' खरेंच. माझा मुलगा मला बकरीहूनहि प्रिय आहे. '' त्यानें आपल्या मुलाला बळीं द्यायचें ठरविलें. मुलाला मारण्यासाठी त्यानें तलवार वर केली तोंच देवानें वरचेवर हात धरला. प्रभु म्हणाला, '' तूं माझ्या कसोटीस उतरलास. तूं खरा भक्त आहेस. '' अशी ही गोष्ट आहे. त्या गोष्टीची स्मृति म्हणून मुसलमान त्या दिवशीं कुरबानी करतात. केवळ हिंदूच्या भावना दुखविण्यासाठी नव्हें. परंतु मुसलमानांसहि ही रुढी कां आली तें माहीत नाहीं, आपणांसहि माहीत नाहीं. आपण गाईची पूजा करणारे. आपणांस वाटलें कीं, मुसलमान मुद्दाम हें करतात. आणि अडाणी मुसलमानांसहि वाटलें कीं, बरें आहे हें हिंदूंना चिडविणें ! किती तरी मुसलमानांच्या घरींहि गाई असतात. आपण हिंदू प्रेम करतों त्याप्रमाणें तेहि करतात. आणि हिंदूंत तरी गाईवर कितीसें प्रेम आहे? गाईची अवलाद सुधारणे, तिचें दूध वाढविणे, हें सारें दूरच राहिलें, गाईला आपण वेळेवर खाऊं घालणार नाहीं, पाणी पाजणार नाहीं. आपण स्वत:ला गोपूजक म्हणवितों, परंतु म्हशींची उपासना करतों व त्यांचें दूध पितों !

मुसलमान राजांनीं गोवधबंदी केली होती. परंतु गोरे साहेब आले. त्यांना गोमांसाची चटक. त्यांनीं ठायीं ठायीं कत्तलखाने सुरु केले. गो-या साहेबांना व शिपायांना गोमांस पुरविण्यासाठी गाईंचा संहार सुरूं झाला. सरकारी कत्तलखान्यांतून लाखों गाईंचा होणारा संहार हिंदु मुकाटयानें बघतात. मग आपण पूर्वीप्रमाणें गाईंची कुरबानी कां करुं नये, असें मुसलमानांस वाटूं लागतें. बंद झालेली कुरबानी पुन्हा होऊं लागली. परंतु याला उपाय म्हणजे सत्कल्पनांचा प्रसार करणें हाच आहे. त्यांनीं गाय मारली म्हणून त्यांना मारणें हा उपाय नव्हें. ते एक पूर्वीची धार्मिक स्मृति म्हणून तरी मारतात, परंतु साहेबाच्या जिव्हालोल्यासाठी होणा-या कत्तलींविरूध्द आपण काय करीत आहोंत? ही कत्तल आपण थांबविली तर मुसलमानांसहि वाटेल कीं, खरोखरच गाय हिंदूंस प्राणांहूनहि प्यारी आहे.वसंता, माझें म्हणणें इतकेंच कीं, उगीच द्वेष पसरुं नये. गोष्टी कशा रुढ झाल्या तें पहावें. द्वेषानें द्वेष वाढतो. एखाद्या मुलाला नेहमीं आपण दगड आहेस असें म्हटलें तर खरोखरच तो तसा नसला तरी तसा होईल ! त्याप्रमाणें '' लांडे असेच, मुसलमान म्हणजे वाईटच, बायका पळवणारे '' असें जर आपण नेहमीं म्हणूं तर मुसलमान तसे नसले तर तसे होतील. आपल्या सदैव म्हणण्याचा तो परिणाम होईल. म्हणून आपली सत्श्रध्दा दुस-यावर आपण लादीत असावें. '' तूं चांगला होशील. चुकीच्या कल्पनांमुळें तूं असा वागत आहेत. तूं मुळांत वाईट नाहींस. '' असें आपण म्हटलें पाहिजे. शास्त्रज्ञ डांबरांतून सुंदर रंग काढतात. डांबरांतून साखर काढतात. माणूस का डांबराहून डामरट आहे? मुसलमान सारे वाईट, ते कधींहि चांगल्या रीतीनें वागणार नाहींत, असें म्हणणें म्हणजे नास्तिकवाद होय. मी तर परमेश्वरावर - म्हणजेच शेवटीं सारें चांगलें होईल यावर विश्वास ठेवणारा आहें. '' अहं ब्रह्मस्मि, तत्वमसि - मी मंगल आहें व तूंहि मंगल आहेस. '' या उपनिषदाच्या वचनावर श्रध्दा ठेवणारा मी खरा हिंदु आहें.असो. आपण आपली श्रध्दा घेऊन जावें. रवीन्द्रनाथांनीं म्हटलें आहे, '' तुझा दिवा घेऊन तूं जा. तुझ्यावर टीका होतील. तुझा दिवा विझवतील. पुन्हा लाव. तुला एकटयानेंच जावें लागेल. '' वसंता, तुला माहीत आहे कीं नाहीं मला ठाऊक नाहीं; परंतु कांही हिंदु महासभेचे लोक मला '' मुल्ला '' म्हणतात. म्हणोत बिचारे. त्यानें मी माझ्या ध्येयाजवळ येतों असेंच मला वाटतें. मी सर्वांचा आहें. माझा देव सर्वाचा आहे. सर्व विश्वाचा आहे. तूं प्रकृतीस जपत जा हो. सर्वांस सप्रेम नमस्कार व आशीर्वाद.

तुझाश्याम