Shevtacha Kshan - 35 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 35



गार्गीला दुसऱ्या खोलीत आणलं , खोली खूप छान हवेशीर आणि भरपूर नैसर्गिक उजेड येईल अशी होती.. त्याला दोन खिडक्या आणि ऐसपैस खोली होती.. तिला खोलीत पोचवल्यावर नर्स ने तिला विचारलं की "खोली आवडली का ताई आता?" पण तीच कुठे लक्ष होतं ती केव्हाच त्या स्पर्शाच्या विचारांत गुंतली होती.. "कोण असेल ती व्यक्ती तो स्पर्श मला एवढ्या जवळचा का वाटत होता?? अस वाटत होतं की मी त्या स्पर्शाला खूप चांगलं ओळखते.. तो गौरव तर नव्हता ना?? नाही नाही काहीही काय विचार करते गार्गी, जर चांगला विचार कर... अस नसेल , उगाच तू तुझ्या संभ्रमात आहे किंवा गौरव आला नाही म्हणून काहीही वेडेवाकडे विचार तुझ्या डोक्यात येत आहेत.. पण मग गौरव अजून कसा आला नाही मला भेटायला? हे ईश्वरा!! माझ्या गौरवला सुखरूप असू दे..🙏 मला अस विचार करण्यापेक्षा कुणाला तरी विचारायला हवं.. तो नाही तर त्याचा फोन तर नक्कीच आला असेल ना बाबांना.. " तीने लगेच तिथे असलेल्या नर्स ला आवाज देत बाहेर कुणी असेल तर मला भेटायला आत पाठवता का म्हणून विचारलं.. नर्स ने बाहेर बघितलं, आतापर्यंत अस कधीच झालं नाही की गार्गीजवळ कुणी नव्हतं .. पण आश्चर्य अस की बाहेर आज कुणीच नव्हतं.. "कुठेतरी कामानिमित्त गेले असतील येतील 5 मिनिटात" म्हणून नर्स नि तिला दिलासा दिला.. आणि आता तिची इंजेकॅशनची वेळ झाली म्हणून सांगितलं..


आतापर्यंत गौरवला त्याच्या वडिलांनी तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती पुरवीली होती.. गार्गीच्या ऑपरेशन च्या दिवशी गौरव खूप अस्वस्थ होता ... पण ऑपरेशन सुरळीत पार पडलं आणि गार्गी आता सुरक्षित आहे हे कळताच त्याच्या जिवात जीव आला.. त्याचबरोबर संदीप बद्दल कळल्यावर त्याला आणखीच बरं वाटलं..

आज त्याची फ्लाईट होती.. भराभर त्याच काम आटपून तो तेथून निघाला.. डायरेक्ट flight मिळाली नसल्यामुळे दोन flight करून तो येत होता, त्यामुळे त्याला पुण्यात पोचायला 12 तास लागलेत.. पण जसा पुण्यात पोचला त्याची गार्गीला भेटण्याची अधीरता शिगेला पोचली होती..

"नेमकं मी नसताना गार्गीवर एवढं मोठं संकट ओढवलं, आणि तिला अगदी जेव्हा माझी खरी गरज होती त्यावेळीच मी तिच्याजवळ नव्हतो, बिचारीने सगळं काही एकटीने सहन केलं, मी माझं जीवनसाथी होण्याचं कर्तव्य पार नाही पडू शकलो, " ही सल त्याला अख्ख्या प्रवासभर बोचत होती.. केव्हातरी तिचा चेहरा डोळ्यापुढे यायचा कधी खळखळून हसणारी गार्गी तर कधी रुसणारी गार्गी , कधी लहान मुलासारखं खूप बडबड बोलणारी गार्गी तर कधी खूप समंजस गार्गी.. त्याच्या डोळ्यांपुढे येऊ लागली..

गार्गी त्याची वाट बघत असणार त्याला माहिती होतं.. आणि म्हणूनच तो तिला भेटण्यासाठी उतावीळ झाला होता, तहान, भूक सगळं विसरून त्याला फक्त त्याच्या गार्गीला बघायचं होतं, तिची माफी मागायची होती.. पण भावनेच्या भरात आणि भेटण्याच्या ओढीनं तो काय करतोय त्याच त्यालाही कळत नव्हतं.. विमानतळावरून आपलं समान घेऊन तो पळतच रस्त्यावर आला.. अगदी अर्ध्या आडव्या रस्त्याच्या पुढे येऊन तो टॅक्सी, कॅब थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. ऑनलाइन कॅब बुक करावी एवढी साधी बाबही त्याच्या लक्षात आली नाही.. असाच कॅब ला हात दाखवता दाखवता तो अचानक एका गाडी पुढे आला गाडी स्पीड मध्ये असल्या मुळे त्याला जोरात धक्का बसला आणि तो उजव्या बाजूने विभाजकाच्या पलीकडे उडाला आणि तिकडून येणाऱ्या भरधाव ट्रक ने त्याला आणखी उंच आणि दूर फेकला.. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता.. बराच रक्त सतत वाहत होतं, पण शुद्ध हरपायची होती.. "गार्गी गार्गी गार्गी " एवढंच तो सतत बोलत होता.. त्याच्या भोवती लगेच बघ्यांची गर्दी जमा झाली पण कुणीही त्याला उचलून दवाखान्यात नेण्याची हिम्मत दाखवली नाही.. पण तिथूनच रस्त्याच्या डाव्या बाजूने एक गाडीतून प्रतीक चालला होता.. तो त्याच भागत राहत असल्यामुळे हा त्याचा रोजचा ये जा करण्याचा मार्ग होता.. तेव्हा त्याने झालेला अकॅसिडेंट बघितला.. आणि पळतच त्या गर्दीत शिरला.. गौरवला बघताच त्याचे हात पाय गळून गेले पण तो गार्गीच सारखं नाव घेत होता म्हणून स्वतःला सावरत एक दोघांची मदत घेऊन त्याने त्याला तिथल्याच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे त्यांनी गौरवला घेण्यास सक्त नकार दिला.. थोडस डोकं नीट बांधून आणि त्यांच्याच हॉस्पिटची एक अंबुलन्स देऊन त्यांनी गौरवला लवकरात लवकर दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं.. प्रतीक त्याला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आला जिथे गार्गीच ऑपरेशन झालं होतं.. पण गार्गीबद्दल प्रतिकला मात्र काहीच कल्पना नव्हती..

आधीच्या हॉस्पिटलमधून आधीच फोन करुन गौरवच्या केस बद्दल या हॉस्पिटलमध्ये कल्पना दिलेली होती त्यामुळे गौरवला लवकरात लवकर अंबुलन्स मधून उतरवून ऑपरेशन थेेटर कडे नेत होते तेव्हा च गार्गीला तिच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत घेऊन जात होते.. आणि त्या दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श झाला.. प्रतीक रिसेप्शनवर सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण करत होता आणि सोबातच गार्गीला लागोपाठ फोन करत होता पण तिचा फोन लागत नव्हता..

तो स्पर्श झाल्यापासून गार्गी अस्वस्थ होती.. जवळ दोन नर्स होत्या बाकी कुणीच नाही.. गार्गीला आरामाची गरज आहे त्यामुळे तिच्याशी कुणी बोलायला नको म्हणून सगळे बाहेरच थांबायचे.. आणि आता तर बाहेरही कुणी नव्हतं.. गार्गीची औषधी आणि इंजेकॅशनची वेळ झाली होती.. पण गौरव आल्याशिवाय किंवा त्याच्याबद्दल काही खाल्ल्याशिवाय ती तयार होत नव्हती, नर्स नि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती हट्टालाच पेटली होती.. त्यामुळे बाहेर कुणी परत येईलपर्यंत थांबुयात म्हणून त्या थांबल्या.. आणि गार्गीचे वडील किंवा सासरे येण्याची वाट बघू लागल्या..

संदीप राउंडवरून केबिन मध्ये परतत असताना त्याच लक्ष समोर रिसेप्शनवर उभ्या असलेल्या प्रतीक वर गेलं... एकाच शाळेत शिकलेले असल्यामुळे आणि प्रतिकला गार्गीसोबत बरेचदा बघितले असल्यामुळे संदीपने त्याला लगेच ओळखलं .. त्याला तिथे बघून संदीप त्याच्याजवळ गेला.. प्रतिकनेही संदीपला चेहऱ्यावरून हलकस ओळखलं.. कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय एवढंच त्याला वाटत होतं, पण कुठे बघितलं आहे किंवा कोण आहे त्याला आठवत नव्हतं.. संदीपने त्याची मनःस्थिती आणि त्याचा गोंधळ बघून लगेच त्याला स्वतःची ओळख पटवून दिली.. आणि तो तिथे डॉक्टर आहे असं कळल्यावर प्रतिकला थोडं हायसं वाटलं.. पुढे पण त्याचं बोलणं झालं..

संदीप - प्रतीक तू इथे कसा काय?? गार्गीला भेटायला आलाय का??

प्रतीक - अरे गार्गीला अजून कळवलंच नाहीय मी, तर ती कशी येईल इथे? मी गौरवसोबत आलोय..

त्याच्या बोलण्याने संदीप खूप कन्फ्युस झाला, त्याला काहीं कळतच नव्हतं ..त्याला वाटलं गार्गीला भेटायला गौरव आला आणि त्याच्यासोबत हा आला.. पण मग हा रेसिपशनवर कुणाचा फॉर्म भरतोय??

संदीप ने न राहून विचारलंच

संदीप - तू गौरवसोबत आलाय ना मग फॉर्म कुणाचा भरतोय??

प्रतीक - अरे त्याचाच तर भरतोय, त्याचा भयंकर मोठा अकॅसिडेंट झालाय, डोक्यातून सतत रक्ताची धार वाहत आहे.. तो खूप क्रिटिकल आहे.. तुझी इथे ओळखी असेलच ना प्लीज त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करायला लाव ना.. गार्गीला अजून काहीच माहिती नाहीय, तिचा फोनच लागत नाहीय, लागला की मी सांगतो तिला पण तुम्ही गौरवच्या घरच्यांची वाट पाहू नका..

संदीप - काssय? गौरवचा ऍकसिडेंट?? नको नको तू गार्गीला काही नको सांगू प्रतीक .. सद्धे तिला हे कळलं तर माहिती नाही काय होईल... तीची तब्येत सद्धे खूप नाजूक आहे..

प्रतीक - तब्येत नाजूक?? काय बोलतोय तू?? मला काहीच कळत नाहीय..

संदीप - गार्गी इथेच आहे आणि केव्हा पासून गौरवची वाट बघत आहे.. आणि तिच्या घरचे पण सगळे इथेच आहेत..

प्रतीक - गार्गी इथे कस काय??

त्याच्या प्रश्नांवरून कळत होतं की त्याला गार्गीबद्दल काहीच माहिती नाही, म्हणून संदीपने त्याला सगळं सांगितलं..

संदिप - गार्गीच दोन दिवसांपूरवी मोठं ऑपरेशन झालं.. म्हणून मला वाटलं तू तिला भेटायला आलाय..

प्रतीक - कशाचं ऑपरेशन??

संदीप - तिला ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला होता , त्याचं..

प्रतीक - काssय?? गार्गीला ब्रेन ट्युमर??

प्रतीकला ऐकून मोठा धक्काच बसला.. तो दोन पाऊलं मागे सरकला आणि लगेच जवळच्या बाकावर बसला.. त्याच हृदय जोरजोरात धडकत होतं आणि मन आक्रांदत होतं.. आता त्याला कळलं की गार्गीने त्याला घरी का येऊ दिल नाही... संदीपला आता लगेच गौरवकडे बघायला जावं लागणार होतं कारण गौरवला डोक्यालाच मार जास्त लागला होता आणि संदीप न्यूरॉसर्जन होता..

संदीप - सॉरी प्रतीक, मला वाटलं तुला माहिती असेल पण .. बरं ऐक सांभाळ स्वतःला मला आता गौरवकडे जावं लागेल.. तू गार्गीच्या वडिलांना फोन करून गौरवबद्दल सांग.. ok ?? चल मी निघतो.. आणि हो प्लीज सगळ्यांना सांग आणि तू पण लक्षात ठेव गौरवच्या ऍकसिडेंट बद्दल गार्गीला अजिबात कळायला नको.. तिची तब्येत खूप नाजूक आहे तिला याक्षणी कुठलाच ताण सहन होणार नाही..

आणि तो गौरवकडे पळाला... पण प्रतिकला मोठ्या धक्क्यात टाकून गेला.. तिच्या वडिलांना फोन करायला सांगितला.. पण कसा करायचा? आधीच मुलीच्या एवढ्या मोठ्या आजार आणि ऑपरेशन मुळे ते अर्धे खचले असेल आणि आता आणखी जावयाचा अपघात, त्यांनाही किती धक्का बसेल हे कळल्यावर.. पण सांगायला तर हवंच.. म्हणून मोठ्या कष्टाने मनाला घट्ट करून त्याने गार्गीच्या वडिलांना फोन केला.. तेव्हा ते नुकतेच सगळ्यांना घरी पाठवण्यासाठी कॅबमध्ये बसवून परत आले होते आणि गार्गीने बोलावलं म्हणून गार्गीच्या खोलीत जात होते.. पण फोन वाजल्यामुळे ते बाहेरच थांबून फोनवर बोलू लागले.. फोन संपल्यावर ते तसेच शॉक मध्ये उभे होते.. तेवढ्यात एक नर्स आली

नर्स - अहो काका लवकर चला हो ते पेशंट उगाच हायपर होत आहे आणि कुणाला भेटल्याशिवाय इंजेकॅशन लावून घेणार नाही बोलत आहे तुम्ही लवकर भेटून घ्या बरं..

त्या नर्सच्या बोलण्याने ते भानावर आले पण तिच्यापुढे कस जायचं या मोठ्या संभ्रमात ते सापडले होते.. पण तिच्यासाठी उगाच डोळ्यातलं पाणी पुसत आणि ओठांवर नकली हास्य घेऊन ते गार्गी जवळ आले.. खरंतर त्यांना तिथून लगेच गौरवकडे जवस वाटत होतं पण तो ऑपरेशन थिएटर मध्ये होता आणि गार्गीला सद्धे गरज होती म्हणून ते तिच्याकडे आले होते .. थोडावेळासाठी म्हणून सगळ्यांना घरी पायहवून गार्गीचे बाबा एकटेच हॉस्पिटलमध्ये थांबले होते पण आता त्यांना कुणाची तरी गरज होती..

गार्गीसमोर जाताच गार्गीने विचारलं

गार्गी - पप्पा, गौरवचा काही फोन वगैरे आला होता का?? अजूनपर्यंत त्याने मला भेटायला यायला पाहिजे होतं, किती वेळ झालाय...

आता मात्र काय बोलावं त्यांना काही कळत नव्हतं.. ते शांत तिच्याकडे बघतच होते..

गार्गी - सांगा ना पप्पा, मला आज सकाळपासून खूप भीती वाटत आहे, खूप अस्वस्थ वाटत आहे.. गौरवचा काही कॉल मेसेज आला का??

पप्पा - नाही तसं काही नाही बेटा तू घाबरू नको आणि अजिबात काळजी करू नको, त्याची फ्लाईट लेट झाली आहे 5 तास म्हणून त्याला उशीर होणार आहे असं सांगीतलं होत त्याने दुबईला पोचल्यावर..

मुलीच्या काळजी पोटी त्यांनी थाप मारली.. आणि जी गोष्ट तिला कळायला हवी होती तीच गॊष्ट त्यांनी नाईलाजाने तिच्यापासून लपवली..

गार्गी - ओहह अच्छा अस आहे का बरं ठीक आहे..

पप्पा - बरं बेटा मला थोडं काम आहे तेव्हा तू इंजेकॅशन घेऊन आराम कर मी आलोच.. आणि ते बाहेर आले आणि ज्या भावनांना गार्गी समोर त्यांनी मोठ्या शिताफीने लपवलं त्या त्यांच्या डोळ्यांतून वाहू लागल्यात.. तेव्हाच तिथे गार्गीला शोधतच प्रतीक आला आणि गार्गीच्या वडिलांना या अवस्थेत बघून त्यांना धीर देऊ लागला..

----------------------------------------------------------