Premgandh - 29 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २९)

( आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम सगळी संपत्ती राधिकाच्या बाबांच्या नावावर करते... या गोष्टीचा गोविंदला प्रचंड राग येतो. तो कुसुमला रागातच बोलत असतो. कुसुम त्याला घरातून बाहेर काढून टाकते... गोविंद रागातच बार मध्ये जातो... तिथे वेटरला त्याचा धक्का लागतो त्यामुळे बाॅटल्स ग्लास खाली पडून फुटतात... त्यामुळे त्याला अजून राग येतो आणि तो त्याला रागातच मारतो... मग त्याचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला रूममध्ये घेऊन जातो आणि सगळं विचारतो, गोविंद त्याला जे घडलं ते रागातच सगळं सांगतो आणि भीम्या शांतपणाने त्याचं बोलणं सगळं ऐकून घेतो.... आता बघूया पुढे... )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गोविंद खूप चवताळलेला होता. तो भीम्याला दारू आणायला सांगतो... भीम्या त्याला दारू आणून देतो... तो दारूची बाटलीच तोंडाला लावून गटागट दारू संपवत असतो... भीम्याला त्याची काळजी वाटत असते... तो दारूची बाटली हातातून घेऊन साइडला ठेवतो...

गोविंद - "भीम्या बाटली दे ती... मला आज खूप दाबून दारू प्यायची आहे... दे ती बाटली..." तो ओरडूनच बोलत होता.

भीम्या - "मालक, बस झाली दारू, खूप पिली तुम्ही, हे तुमच्या अशा दारू पिण्यापायीच कुसुम मावशीने असा टोकाचा निर्णय घेतलाय, तुम्हाला किती सांगतो दारू नका पित जाऊ जास्त... पण तुम्ही ऐकत नाहीत अजिबातच... आता तरी ऐका मालक... हे जास्त दारू पिणं सोडून द्या..."

गोविंद - "तू कोण मला बोलणारा? किती दारू प्यायची, किती नाही ते माझं मी बघेन... आण तू दारू." तो ओरडूनच म्हणाला.

भीम्या - "आज तुम्ही माझ्यावर पण हात उचलला तरी चालेल पण आज तुमचं अजिबातच ऐकणार नाही मी... आधीच खूप दारू पिलंय तुम्ही..."

गोविंद - "इथे ये तू माझ्याजवळ. आज मारतोच तूला..."
भीम्या त्याच्याजवळ गेला आणि त्याने खाली वाकून गोविंदसमोर आपला चेहरा केला...

भीम्या - "घ्या मालक मारा... किती मारतात मला... जेवढा राग आहे मनात तेवढा सगळ्यांचा राग काढा माझ्यावर आज... पण तुम्हाला अजून जास्त दारू पिऊ देणार नाही मी... "

गोविंद उभा राहिला आणि त्याला सरळ उभं करून त्याने त्याच्यावर हात उगारला. भीम्याने आपले डोळे बंद करून घेतले. आणि दुसऱ्याच क्षणाला मात्र गोविंदने त्याला घट्ट मिठी मारली. हे बघून भीम्या गालातच हसू लागला आणि त्यानेपण गोविंदला घट्ट मिठी मारली.

गोविंद - "तुझ्यावर हात कसा उचलू मी भीम्या? माझ्या आईनंतर तर तूच मला समजून घेणारा आहेस... बाकी सगळे माझ्याकडे फक्त पैशासाठी, खाण्यापिण्यासाठी काम करतात पण तूच एक असा आहेस की तू आपली बालपणापासून ते आतापर्यंत मैत्रीसाठी माझ्यासोबत आहेस आणि तितक्याच इमानदारीने पण आपली मैत्री निभावत आहेस..."

भीम्या - "मालक, तुमचं मीठ खाल्लंय मी आणि ते माझ्या रक्तात मिसळलंय... त्या खाल्ल्या मिठाला जागणं माझं कर्तव्यच आहे..."

गोविंद - "हो माहीती आहे मला... तुमचं पुर्ण खानदानच इमानदार आहे. पण तुला किती वेळा बोललोय मी असं मालक नको बोलत जाऊ मला, सरळ नावाने आवाज देत जा... ए गोविंदाऽऽऽ असं करून... लहानपणी द्यायचा अगदी तसाच.... आपण लंगोटी यार आहोत यार... हे मालक, मालक काय करतोस तू?"

भीम्या - "हो पण कितीही लंगोटी यार असलो तरी कधी कधी नोकराने आपली पायरी सोडू नये आणि मालकाने पण स्वतःची पायरी सोडून नोकराला जास्त जवळ करू नये मालक... कधी कधी मालक नोकर म्हणून पण वागून बघावं..." हे ऐकून गोविंद हसू लागला.

गोविंद - "हे सर्व तुझ्या आजीचे नेहमीचे बोल... तुमच्या रक्तात भिनलेले..." तो हसतच म्हणाला. पण थोड्या वेळातच त्याच्या चेहऱ्यावर रागाचा कलप चढला आणि त्याने रागातच बाजूची बाटली उचलून फेकून दिली...

गोविंद - "पण आज माझ्या आईनेच मला दगा दिला... तिची एवढी हिम्मत की घरातून हाकलून काढलं मला... एवढे वर्ष माझ्यासाठी जपून ठेवलेली संपत्ती त्या नाम्या मामाच्या नावावर करून दिली तीने... आणि काय तर म्हणे राधिकासोबत माझं लग्न होणे शक्य नाही... तिला काय माहीती मी संपत्तीसाठी आणि राधिकाला मिळवण्यासाठी काय काय करू शकतो ते... काहीही करेन पण सगळी संपत्ती आणि राधिका फक्त माझी असेल माझी... आणि ते मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे अजून माहीती नाही तिला.... सोडणार नाही मी म्हातारीला.... आणि त्या तिच्या भावाला पण..." तो रागात लालबुंद झाला होता. भीम्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला....

भीम्या - "मालक, ती आई आहे तुमची आणि आईबद्दल असं बोलू नये... तीने एवढ्या वर्षानंतर असा निर्णय घेतला म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल.... नाहीतर कुसुम मावशी उगाच एवढा महत्वाचा निर्णय घेणार नाहीत..."

गोविंद - "घंटा ठोस कारण... तीला आता तिच्या भावाचा खूप पुळका आलाय... मी पण बघणार आहे तो नाम्या पण घरात पाय कसा ठेवतो ते...?" तो रागारागातच बोलत होता. अजून काही बोललं तर विषय अजून वाढतच जाईल हे भीम्याला ठाऊक होतं. म्हणून त्याने गोविंदला आराम करायला सांगून तो खाली निघून आला... गोविंदच्या मनात मात्र राग राग धुमसत होता...

-------------------------------------------------------------

आज शाळेमध्ये सकाळीच खूप रेलचेल चालू होती... मुलं, मुलांचे आईवडील, सर्व पालक येऊन त्यांना शाळेत सोडत होते... परत घरी जाताना आपापल्या मुलांना काही सुचना, टीप्स पण देऊन जात होते... अजय, राधिका, अंजली बाई, निलेश सर, सरीता बाई, दिलीप सर सगळेच शिक्षक मुलांसोबत सहलीला जाणार होते... सरकारी बसेस सहलीसाठी आयोजीत केल्या होत्या... सर्व मुलं ठरलेल्या बसमध्ये जाऊन बसत होते आणि शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांची मोजणी करत होते....

सगळी मुलं खूप आनंदी, उत्साही दिसत होते. आज काहीतरी छान नवीन बघायला भेटणार म्हणून खूश होते...
दोन्ही बसमध्ये "गणपती बाप्पा मोरया" चा जयघोष झाला आणि बस आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झाल्या आणि त्यांचा प्रवास सूरू झाला... राधिका सोबत होती म्हणून अजय पण खूश होता... पण राधिका सर्वांसमोर वरवर खुश राहण्याचा प्रयत्न तर करत होती पण तिच्या मनात एक अनामिक भिती पण वाटत होती...

बसमध्ये सगळी मुलं आणि सोबत शिक्षक शाळेतल्या कविता, गाणी बोलतच टाळ्या वाजवून एन्जॉय करत होते. बराचवेळ मुलं दंगामस्ती करून थकले होते... सगळ्यांना भुका लागल्या होत्या... बसेस श्रीरामपूरमध्ये एका वाड्यासमोर येऊन थांबल्या... बस ड्रायव्हर बसमधून खाली उतरला आणि त्या वाड्यात गेला.... थोड्या वेळाने येऊन त्याने ठरलेल्या ठिकाणी नदिकाठी बस घेऊन आला....

सगळी मुलं खूप उत्साहाने बसमधून उतरू लागली... सगळे शिक्षक मुलांना व्यवस्थित सुचना देत होते... मुलंपण निट लक्ष देऊन ऐकत होते... मुलं आणि शिक्षक आजूबाजूचा सगळा निसर्ग रम्य परिसर डोळ्यांत सामावून घेत होते... खुपच सुंदर असं निसर्ग सौंदर्य होतं... नदिचा पांढरा शुभ्र नितळ पाण्याचा खळखळता प्रवाह.... त्याचा कानांना भासणारा सुंदर आवाज... आजुबाजूची डोळ्यांना थंडावणारी शीत अशी हिरवाईची चादर.... नदिच्या काठाला हिरवीगार बहरलेली शेतं.... हिरव्यागार गवताची सळसळ.... सुंदर गुलमोहोर, आंबा अशी मोठमोठी झाडं सावलीसाठी लावली होती... सावलीत बसण्यासाठी बाकडे, पाणी पिण्याची सोय सगळंच व्यवस्थित होतं....

तेच पाहत असताना मागून मंदीरातील घंटेचा नाद घुमला... नदीपासून काही अंतरावर सुंदर असं गणपतीचं मंदीर होतं.... सगळे मंदीराकडे जायला निघाले. खूप छान असं मन प्रसन्न करणारं वातावरण होतं.... सगळ्या मुलांनी एका रांगेत जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं... अजय आणि राधिकाने पण दर्शन घेतलं... दोघेही एकदम शांत शांत होते...

अंजली बाई - "अजय राधिका तुम्ही दोघं असे गप्प गप्प का आहात? बोला काहीतरी... भांडलेत का दोघं तुम्ही? इतक्या छान निसर्ग रम्य वातावरणात फिरायला आलोत आपण, मस्त एंजॉय करा... मुलांसोबत हसा, खेळा, गमती करा... बाळांनो असे गप्प गप्प नका राहू..."

"बाई नाही, असं काही नाही..." राधिका आणि अजय दोघेही एकत्रच बोलले... अंजली बाई त्यांना हसू लागल्या...

अंजली बाई - "नक्की ना... असं काही नाही ना...?"

अजय - "खरंच बाई असं काही नाही... आणि आमचं का भांडण होईल ना? आम्ही आता करतो ना एंजॉय... हो ना राधिका..."

राधिका - "हो ना बाई असं काही नाही..." ती चेहर्‍यावर स्माईल देत म्हणाली.

अंजली बाई - "बरं ठिक आहे मग... पण राधिका अजयने जर कधी तूझ्याशी भांडण केलं ना की लगेच मला सांगायचं हा... त्याचा कानच पिरगाळते मग..." हे ऐकून अजय आणि राधिका हसू लागले.

अजय - "बापरे, बाई राधिकाला तुमचा पाठींबा असताना तिच्याशी माझी भांडण्याची हिंम्मत होईल का?" दोघीही त्याला हसू लागल्या.

अजय - "चला जाऊया... खूप भूक लागलंय. आधी जेवून घेऊ... मग पुर्ण दिवस आपलाच आहे एंजॉय
करण्यासाठी..." तिघेही मंदिरातून बाहेर आले.

सगळे मुलं आणि शिक्षक नदिच्या थंडगार पाण्यात हातपाय धुवत होते... काही मुलं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत खेळत होते... सगळेजण झाडाच्या सावलीत जेवायला बसले. राधिकाने स्वतःजवळचा एक डबा अजयच्या समोर ठेवला...

अजय - "हे काय? तुझा टिफीन मला देतेस आणि तू काय खाणार आता? उपवास आहे का तुझा?" तो हसतच म्हणाला....

राधिका - "नाही रे.... आहे दुसरा डबा माझ्याकडे... हा डबा खास आईने दिलाय तुझ्यासाठी...."

अजय - "वाॅव... खरंच माझ्यासाठी... बघू बरं काय दिलंय माझ्या आईने माझ्यासाठी...?" आणि त्याने डबा उघडला. तर त्यांत मस्तपैकी भाकरी, वांग्याचं भरीत आणि हिरवी चटणी होती... ते पाहताच अजयच्या तोंडाला पाणीच आलं...

अजय - "वाॅव... सुपर मेन्यू... माझ्या सासुबाईंनी फार भारी जेवण पाठवलंय माझ्यासाठी...." तो तोंडाने आवाज करतच म्हणाला. आणि त्याने मान वर करून पाहीलं तर सगळे शिक्षक त्याच्याकडेच बघत होते... त्यांना तसं बघून त्याला एकदम लाजायला झालं. सगळे शिक्षक त्याला हसू लागले. राधिका पण तोंडावर हात देऊन हसू लागली.

सरीता बाई - "राधिका, अजयराव भलतेच खूश झालेत आज... सासूबाईंनी खास जावयासाठी जेवण पाठवलंय म्हणून..."

अंजली बाई - "खुपच लाड चाललेत जावईबापूंचे... खूपच स्पेशल ट्रीटमेंट मिळतेय आतापासूनच..." अजय आणि राधिका दोघेही लाजत होते....

निलेश सर - "अहो अजयराव, नशिबवान आहात बरं तुम्ही... सासूरवाडीत आतापासूनच लाड होत आहेत तुमचे..." सगळे शिक्षक असंच काही न काही बोलून राधिका आणि अजयला लाजवत होते.... सगळ्यांचं छान हसतखेळत जेवण उरकून झालं होतं... सगळी मुलं नदीच्या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते... सगळे शिक्षक त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेऊन होते...

राधिका मात्र एवढ्या वर्षांनी गावी आली होती... म्हणून ती चारी बाजूंनी सगळीकडे नीट निरीक्षण करत होती.... ती फक्त नऊ दहा वर्षांची असतानाच त्यांनी हे गाव सोडलं होतं... पण तिला लहानपणाच्या बर्‍याचशा गोष्टी आठवत होत्या.... सगळी मुलं नदीच्या पाण्यात एकमेकांवर पाणी उडवून खेळत होते... ते पाहून तिला गावातल्या तिच्या बालमैत्रिणी सुषमा, गौरी, केसर, कोमल यांची आठवण येऊ लागली. लहानपणी चौघीही सोबत फिरायच्या, नदीवर सोबत यायच्या, अशाच एकमेकांवर पाणी उडवून खेळायच्या, शाळेत सोबत जायच्या, कोणतेही खेळ खेळताना चौघीही सोबत खेळायच्या.... सर्वच आठवणी तिला येत होत्या... सगळ्याच आठवणी तिला अगदी डोळ्यासमोर दिसत होत्या.... ती झाडाखाली बसून एकटक त्या मुलांकडे बघत बसली होती...

अजयचं लक्ष राधिकाकडे गेलं... तो तिच्याजवळ गेला...

अजय - "राधिका, अगं अशी एकटीच का बसलीस तू? चल ना आमच्यासोबत तू पण..." त्याने राधिकाकडे पाहीलं तर तिचे डोळे पाण्याने भरले होते... अजयला तिची काळजीच वाटली... तिने त्याला पाहताच डोळ्यातले अश्रू पटकन पुसले...

राधिका - "हो येते ना चल..."

अजय - "राधिका, काही प्रॉब्लेम आहे का? तू रडत का आहेस?"

राधिका - "अजय, असं काही नाही आणि मी का रडू?"

अजय - "राधिका मी पाहीलं तूला रडताना..." राधिका शांतच बसली...

अजय - "राधिका, काही प्राॅब्लेम असेल तर सांगत जा यार... अशी नाराज नाराज नको राहत जाऊस... मला चांगलं नाही वाटत यार तूला असं उदास बघून... तू नेहमी अशी हसतखेळत राहावी असं वाटते मला... बोल बरं काय झालंय नक्की..."

राधिका - "अजय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे... म्हणजे आमच्या घरातल्या काही गोष्टी किंवा आमच्या नातेवाईकांविषयी तुला मी कधीही काहीच बोलली नाही... ते सगळं मला तुला आज सांगायचं आहे..." अजय हसू लागला...

अजय - "अगं पण तू ते नंतरही सांगू शकशील ना... आत्ताच कसं काय आठवलं तुला ते? चल आज आपण मुलांसोबत फक्त एंजॉय करूया... या विषयावर आपण कधीतरी निवांत बोलूया..." आणि तो पुढे चालू लागला. आणि राधिका त्याच्या मागे चालू लागली...

राधिका - "अजय, ऐकून तर घे माझं..."

अजय - "मला काहीच ऐकायचं नाही... चुपचाप चल तू माझ्यासोबत...."

अजय तिला नदिच्या पाण्यांत घेऊन आला आणि सगळे शिक्षक, मुलं तिकडे पाण्यांत खेळत होते... अजयने राधिकाच्या अंगावर थोडं पाणी उडवलं... राधिका त्याच्याकडे चेहर्‍यावर काहीही हावभाव न करता बघू लागली... अजयला वाटलं तिला राग आला... त्याने स्वतःची जीभच चावली... राधिकाला त्याचा तसा चेहरा बघून हसूच आलं आणि ती त्याला हसू लागली.... तिने पण हातात पाणी घेऊन त्याच्या अंगावर उडवलं... राधिकाला खुश बघून त्यालाही छान वाटलं....

क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २९

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀