Shevtacha Kshan - 37 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 37 - अंतिम भाग


मनातल्या मनातच विचार करता करता प्रत्येक विचारागणिक गार्गीचा श्वास वाढत होता, तिच्या बंद डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते... नर्स नि ते बघितलं आणि लगेच तिच्या आईला हाक मारली.. तसच आईनेही स्वतःला सावरत आणि चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत तिच्याजवळ गेली.. ती झोपलेली दिसत होती व डोळ्यात पाणी सुद्धा होतं.. म्हणून आईने तिच्या डोक्यावरून हलकाच हात फिरवून तिला उठवलं..तिनेही लगेच डोळे किल किल करत उघडले.. आणि आईला पुढे बघून तिला हायसं वाटलं..

तिने लगेच आईचा हात हातात घेत आईला म्हंटल

गार्गी - आई मला एक वचन देशील..

आई - कोणतं वचन??

गार्गी - मला आणि गौरवला जर काही झालं तर माझ्या मुलीला माझ्या नंदेकडे म्हणजेच ताईकडे देशील, मला खात्री आहे आई त्या मना करणार नाही आणि गौरंगीला त्या आईच्या मायेनेच वाढवतील.. कारण जेवढा जीव त्यांचा त्यांच्या भावात आहे त्यापेक्षा जास्त जीव त्यांचा गौरंगीमध्ये आहे.. तू दे ना मला वचन..

गार्गी अस काही बोलेल याची आईला कल्पनाच नव्हतीं.. तिला गौरवबद्दल काही कळलं तर नाही ना.. आईच्या मनात शंका आली पण ती बोलूनही दाखवू शकत नव्हती.. जर आईने विचारलं असत आणि तिला माहिती नसेल तर उगाच ती काही विचारात बसेल आणि माहिती असेल तरी ती सांगणार नाही की तिला काही कळलंय हे आईला माहिती होतं... आईला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं.. आईला भरून येत होतं पण डोळ्यातलं पाणी लपवत..

आई - अग काहीच होणार नाही तुला आणि गौरवलाही कशाला काही होईल.. तू अस काही विचार का करतेय.. आईची माया ती आईचीच असते तिला गरज आहे तुझी.. तू अस नको बोलू..

गार्गी - नाही आई भावनिक होऊन विचार नको करू, मी कुठे म्हणते मला काही होणारच आहे पण जर काही झालच तर पुढचं सांगून ठेवतेय..

आई - ठीक आहे मी वचन देते.. मी तुझा निरोप त्यांना नक्की सांगेल.. पण तो सांगायची वेळच येऊ नये ही प्रार्थना आहे माझी..

गार्गी - ठीक आहे आई तू जा आता मी थोडावेळ झोपते..

तशी तिची आई बाहेर आली.. आणि पुन्हा ढसाढसा रडू लागली.. रडतच गार्गी जे बोलली ते तिने सगळ्यांना सांगितलं.. तेवढ्यात तिकडून संदीप आला आणि सगळ्यांना गौरवच्या प्रकृतीबद्दल सांगत होता.. तो कोमात गेला ऐकून सगळ्यांचे डोळे आणखी भरून आले.. पण संदीपने थोडा फार दिलासा देत सगळ्यांना त्याला बघायसाठी घेऊन गेला..

संदीप - असं रडू नका तुम्ही, धीर सोडू नका, होईल सगळं व्यवस्थित.. तुम्हाला बघायचं आहे का गौरवला??

सगळे सोबतच - हो हो बघायचं आहे..

संदीप - चला माझ्यासोबत.. पण इथे एक जण असावं लागेल ना गार्गीजवळ..

गा.आई - मी भेटून आले तिला ती झोपली आहे आता.. आणि गौरवला बघून मी लगेच येईल हवं तर..

संदीप - अच्छा झोपली असेल तर ठीक आहे..

सगळे त्याच्यासोबतत गौरवला बघायला गेलेत..

संदीप - गार्गीला नाही ना कळलं गौरव बद्दल??

बाबा - नाही आम्ही कुणी तर नाही सांगितलं..

संदीप - अच्छा मग ठीक आहे.. ती आता झोपली आहे ना थोडावेळणी जाऊन मी तिला चेक करून घेतो.. तुम्ही थांबा गौरवजवळ मी येतो..

इकडे गार्गीला कळून चुकलं होतं की आता तिचा शेवटचा क्षण जवळ आला आहे.. कारण तिला ताण सहन होणार नव्हता आणि तोच तिच्याही नकळत तिला येत होता.. त्यामुळे तिच्या veins सुजत चालल्या होत्या.. पेनकिलर दिलेलं असल्यामुळे दुखणं जाणवत नव्हतं पण काही त्रास मात्र होत होता..

सगळ्यांचा विचार करून झाल्यावर तिला प्रतिकची आठवण झाली.. तिला कुठे माहिती होतं की प्रतीक तिथेच आहे ते.. ती तर फक्त मनातच विचार करत होती "या आयुष्यात एकदा प्रतिकला भेटायची इच्छा कधीपासून माझ्या मनात होती , अजूनही आहे , पण मला नाही वाटत ती इच्छा आता पूर्ण होईल.. तो येत होता मला भेटायला पण मीच नाही म्हंटल त्याला, खोटं बोलले त्याच्याशी.. माझ्या या स्थिती बद्दल कळलं असतं तर त्याला खूप वाईट वाटलं असतं म्हणून बोलावं लागलं मला पण त्याला एकदा तरी भेटता यायला हवं होतं.. , त्याला त्याच्या आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.. आता एवढीच प्रार्थना मी त्याच्यासाठी करू शकते.."

काहीच नको रे मला ना तू ना साथ तुझी
फक्त हवेत ते दोन क्षण जेव्हा असेल मी मृत्यूच्या दारात उभी।।

झुरले मी आयुष्यभर ज्याच्यासाठी तो शेवटच्या क्षणी तरी मला भेटावा
माझे झुरणे, आयुष्यभर तुझी वाट बघण्याचा तो प्रत्येक क्षण सार्थकी लागावा ।।

येशील का रे तेव्हा तरी माझ्या मनाची हाक ऐकूनी
का असाच गुंतून बसशील कुठेतरी समाजाचा विचार करूनी ।।

तेव्हा तरी तुझ्या मनाचा आवाज ऐकशील ना कारण त्यातून मी बोलत असेल
त्या शेवटच्या क्षणात सार आयुष्य जगून घेतल्याचं मला आत्मिक समाधान लाभेल।।

ती शांत पडली होती आणि डोळेही बंद होते म्हणून नर्सला ती झोपली आहे असं वाटलं आणि नर्स काही 2 मिनिटाच्या कामानिमित्त बाहेर गेली..

प्रतिकने सगळ्यांना गौरवजवळ बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गार्गीजवळ कुणीच नसेल, तिथेही कुणी असायला हवं म्हणून तो पळतच गार्गीजवळ गेला.. आला तेव्हापासून किती इच्छा होती त्याची गार्गीला भेटायची पण काही कारणांमुळे त्याला जमलंच नाही.. म्हणून तो सरळ भेट घेण्यासाठी खोलीतच शिरला.. गार्गी शांत पडून होती फक्त.. त्याने आवाज दिला.. तसं गार्गीने डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघितलं.. तिला वाटलं आपण या क्षणांत त्याचा विचार करतोय म्हणून तो दिसतोय तिला.. तो तिथे कसा येऊ शकेल.. म्हणून तिने डोळे बंद केले.. पण तो पुन्हा तिच्याजवळ बसत , तिच्या हाताला स्पर्श करत तिला हाक मारू लागला, आणि प्रतीक खरच आला आहे याची तिला खात्री पटली.. तो दिसताच तिचा चेहरा अगदी आनंदाने भरून निघाला त्याला एकदा शेवटचं बघायला मिळालं याच समाधान तिला वाटत होतं.. तो कसा आला? काय आला? अस कुठलाच विचारही तिच्या मनात आला नाही.. आनंदामुळे तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.. ती फक्त त्याला बघत होती एकटक.. तेवढ्यात नर्स आली.. आणि प्रतिकवर ओरडू लागली..

"कोण तुम्ही ?? आत कसे आलात? पेशंटला आराम करू द्या, त्यांना आरामाची गरज आहे.."

पण तिनेच नर्सला बोलताना थांबवलं.. आणि "नर्स प्लीज फक्त दोन मिनिटं, मला यांना भेटू द्या.. "

तिची विनंती आणि त्याला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं आनंद बघून नर्स नेही "ठीक आहे पण फक्त दोन मिनीटं" अस म्हणत परवानगी दिली..

आणि तेथून थोडी बाजूला जाऊन तीच काम करत राहिली.. गार्गीच्या वागण्यावरून तिला कसला त्रास होतोय हे कुणालाच कळलं नाही.. तिनेही तिचा त्रास लपवत हे शेवटचे क्षण प्रतिकबरोबर आनंदाने घालवायचे ठरवलं..

तिकडे कोमातच गौरवची हालत पुन्हा क्रिटिकल झाली.. सगळे डॉक्टर खूप प्रयत्न करत होते त्याला वाचवण्याचा पण सगळं काही व्यर्थ होत चाललं होतं.. सगळे गौरवजवळच बाहेर उभे होते.. डोळ्यात पाणी आणून नशिबाला कोसत होते..

इकडे प्रतीक बोलत होता पण गार्गी फक्त शांत होती.. त्याच्या कुठल्याच प्रश्नच उत्तर तिने दिल नाही की कुठलाच प्रश्नही त्याला केला नाही.. त्याला डोळेभरून बघून घ्यावं एवढीच तिची खटाटोप सुरू होती.. पण आता तिचा तो क्षण तिला घेऊन जाऊ बघत होता.. तिला या भूतलाववर आणखी थांबणं शक्य नव्हतं.. तिने त्याचा हात हातात घेत "काळजी घे आणि खुश रहा, मी नेहमी तुझ्यासोबत असेल.. आता निरोप दे.. " एवढंच बोलून तिचा श्वास थांबवला.. प्रतिकच्या हातातून तिचा हात गळून पडला..

थांबला तो माझा शेवटचा श्वास होता
भेटला तो त्या क्षणांतला आनंद होता
संपले जरी ते माझे आयुष्य होते
तरीही मला खात्रीने ठाऊक होते की
तुझ्या मनातली मी कधीच मिटणार नव्हते...

दोन सेकंद काय झालं हेच त्याला कळलं नाही.. आणि जेव्हा कळलं तेव्हा त्याने नर्सला लगेच हाक मारली.. नर्स नि बघितलं तर तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते.. आणि ती धावतच डॉक्टरांना बोलावून आणण्यासाठी गेली.. सगळे डॉक्टर गौरवच्या खोलीतच होते.. नर्सने कुठलाच विचार न करता ती सरळ आत गेली आणि गार्गीबद्दल सांगितलं..

डॉक्टर गौरववर उपचार करून त्यांनी हात टेकले होते, त्याच्यात सुधारण्याचा काहीच स्कोप दिसत नव्हता.. त्याचाही शेवटचा क्षण जवळ आला असावा.. त्यानेही गार्गीसोबतच जाण्याचा निर्धार केला असावा..

उरला तो शेवटचा श्वास आहे
तुला भेटण्याची अजुनी आस आहे
हे जग सोडावे लागले तरी कबूल
पण मृत्यनंतरही मी देणार तुझी साथ आहे

नर्स - ती ब्रेनट्युमरची पेशन्ट काहीच प्रतिसाद देत नाहीय डॉक्टर..

तस संदीपने गौरवला सोडून पळतच गार्गीकडे गेला.. पण तो पोहचे पर्यंत खूप वेळ झाला होता.. गार्गी केव्हाच हे जग सोडून गेली होती... गार्गीबद्दल कळलं आणि गौरवचही हृदय बंद पडलं..

दोघांनीही एकाच क्षणात या दुनियेला अलविदा केला..

तो शेवटचा क्षण ज्यात गार्गी गौरवसोबत आणि गौरव गार्गीसोबत निघून गेले..

तो शेवटचा क्षण ज्यात जिवंत गार्गीची प्रतिकला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली तर श्वास संपल्यानंतर गौरवची गार्गीला भेटण्याची इच्छा पुर्ण झाली..

दोघेही त्या क्षणात त्या एवढ्याश्या जीवाला पोरकं करून निघून गेले पण प्रसंगावधान साधून गार्गीने तिचा आधीच विचार केला होता.. तीच लेकरू तिच्या आत्याच्या हाती सोपवलं होतं.. दोघांच्याही आई वडिलांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला..

अथक प्रयत्न करून आज डॉक्टरांनाही नियतीच्या खेळापुढे नमावच लागलं..

प्रतीक बरेच दिवस शॉक मधेच होता.. त्याच्यासमोर त्याची गार्गी त्याला सोडून गेली होती..

तुझ्या आठवणीतच मी आजवर जगत राहिलो
तुझ्या सुखातच माझाही आनंद शोधत राहिलो
"निरोप दे आता" म्हणून किती सहज तू निघून गेलीस
आणि मी मात्र तुझ्याचसाठी झुरत राहिलो...

माझ्या नजरेपुढे तू मला सोडून गेलीस
मी मात्र तुझ्या जाण्याचं ओझं पेलत राहिलो
तु त्या अंतिम क्षणीही माझ्यात अलगद रीती झाली
आणि मी आजही त्या भावनांतच अडकून राहिलो

त्याच्या या मानसिक स्थितीमुळे त्याच लग्न पुढे ढकलण्यात आलं.. पण याकाळात त्याला श्रुतीने बरीच साथ दिली आणि त्याला सावरायला मदत केली..

गार्गी गौरवच्या जाण्याचं गौरवच्या ताईलाही दुःख होतंच पण आपल्या भाऊ वहिनीची शेवटची निशानी आणि भेट म्हणून ताईने गौरंगीला खूप आनंदाने स्वीकारलं.. अगदी आईची माया तिला देत होती.. गौरांगीला ताईने कधीच कुठल्याच गोष्टीची कमी होऊ दिली नाही.. पार्थ पेक्षाही गौरंगी लाडाची झाली होती.. पुढे तर गौरंगी ताईलाच आई म्हणून हाक मारत होती..

गौरव गार्गीच्या अश्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता पण, पण गार्गी आणि गौरवला मात्र आता कुठलाच विरह होऊ शकणार नव्हता, कुठल्याच सीमा, कुठलेच बंधन आता त्यांना एकत्र राहण्यापासून रोखणार नव्हते.. सोबतच या दुनियेला निरोप देऊन कायमच सोबत राहण्यासाठी ते निघून गेले होते....

प्रत्येक तो क्षण ज्यात तू माझ्यासोबत नाही
काय अर्थ उरला असता त्या क्षणांत जगूनही

अतूट नातं आपलं जन्म मृत्युच्याही पलीकडंच
सहज कसं तुटेल ते बंधन आपल्या आत्म्यांच

माझा तर प्राण जीव तूच आत्मा ही तूच
मग तो यम तरी कसा सोडेल मला एकटंच

आज दोघेही सोबतीने स्वर्ग बघुयात
पुन्हा या विभागलेल्या आत्म्यांना एक करूयात..


समाप्त