Shevtacha Kshan - 36 books and stories free download online pdf in Marathi

शेवटचा क्षण - भाग 36


गार्गीच्या वडिलांनी प्रतिकला गार्गीच्या घरून सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितलं.. आणि तसच घरी सुद्धा फोन करून कळवलं.. त्यानेही लगेच सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं..

गार्गीच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने सगळ्यांना गौरवच्या अकॅसिडेंट बद्दल सांगितलं.. ते ऐकून सगळ्यांच्या शरीरातील त्राण च निघून गेला.. काही क्षण कुणीच काही बोललं नाही पण गार्गीच्या सासूला अनावर झालं.. आणि "हे खरं नाही, अस नाही होऊ शकत माझा मुलगा आणि सून दोघांनाही देव अस मरणाच्या दारात उभं नाही करू शकत, काय दोष आहे या निष्पाप जीवाचा की तिच्या आई आणि वडील दोघांचीही अशी स्थिती आहे.. आईसाठी केवढी तळमळते आहे पोर.. बाबा येणार आहे म्हणून केवढी खुश होती ती.. नाही अस नाही होऊ शकत, देव एवढा कठोर नाही होऊ शकत.. काय चुकलं आमचं की आम्हाला या वयात मुलगा आणि सुनेला अस बघायचे दिवस आलेत.. " एवढं बोलून त्या गौरंगीला कुशीत घेऊन जोरजोरात रडू लागल्या.. आता सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्यात.. गौरंगीला काहीच कळत नव्हतं काय होत आहे सगळे का रडत आहे.. ती एवढीशी चिमुकली आपल्या बोबड्या बोलानी त्यांना समजावू पाहत होती..

" आ.. आ.. आई.. छा.. हे.. रडू नाई.." (आजी आजी आई छान आहे, तू रडू नको) अस बोलत तीच्या आजीचे आसू पुसत होती..

" बा.. ये .. हे.. तो.. सग.. ठी ठी कल्ले.." (बाब येणार आहे ना आता मग तो सगळं ठीक ठीक करेल) अस म्हणत दुसऱ्या आजी जवळ जाऊन तिचे डोळे पुसत होती..

एवढ्याश्या लेकराला काय समजवावे कोणाला काहीच कळत नव्हतं.. तेवढ्यात प्रतीक आला त्याने सगळं बघितलं.. गौरंगी चं त्याला खूप कौतुक वाटलं.. "अगदी तिच्या आई सारखी समजदार आहे" त्याच्या मनातच तो बोलून गेला.. डोळ्याच्या कोपऱ्यात जमा झालेले पाणी पुसत तो या सगळ्यांना धीर देऊ लागला..

प्रतीक - काका काकू, सांभाळा स्वतःला "अस का झालं?" हा विचार करत बसण्यापेक्षा जे झालंय त्याला आपल्याला तोंड द्यावच लागेल.. तुम्ही खंबीर असाल तर तुमच्याकडे बघून गार्गी आणि गौरव दोघांनाही जगण्याची आशा मिळेल.. तुम्हीच हतबल झाले तर त्यांना कोण सांभाळणार? शांत व्हा.. पाणी घेणार??

गार्गीच्या सासऱ्यांपुढे पाण्याची बोटल पकडत तो बोलला. त्याच बोलणं सगळ्यांना पटलं पण उमगायला थोडा वेळ लागला.. प्रतीक गौरंगीला थोडं बाहेर फिरवायला घेऊन गेला.. तिला चॉकलेट वगैरे घेऊन दिलेत.. आणि थोडं इकडे तिकडे खांद्यावर घेऊन फिरवलं तर गौरंगी त्याच्या खांद्यावरच झोपी गेली.. तो तिला परत घेऊन आला तोपर्यंत इकडे सगळे जण सावरले होते.. गौरंगीला त्याच्या आजीकडे देऊन मी आलोच म्हणत तो बाहेर गेला.. त्याने त्याच्या आई वडिलांना ही फोन करून सगळं सांगितलं..

इकडे गौरव वर डॉक्टर उपचार करत होते.. एवढा मोठा अकॅसिडेंट झाल्यावर सुद्धा केवळ गार्गीला एकदा भेटायचं आहे किंवा तिला एकदा बघायचं आहे या एका आशेवर त्याने आपल्या श्वासांना कसंबसं रोखून धरलं होतं.. पण मघाचा गार्गीचा झालेला स्पर्श त्याला सुद्धा जाणवला होता.. इतक्या अशक्तपणा मुळे आणि त्या शुद्ध हरपण्याच्या स्थितीमध्ये तो फार काही रेऍक्ट करू शकला नाही पण त्या स्पर्शाने त्याच्या अपूर्ण आशेच समाधान झालं होतं.. आता डॉक्टर ऑपरेशन करत होते पण तरीही त्यांना गौरवबद्दल शंकाच होती.. कोणत्याही क्षणी काय होईल याची काहीच शाश्वती नव्हती.. तो कोमात जाण्याची स्थिती तयार झाली होती.. पण डॉक्टरांनी अपार प्रयत्न केल्यावरही ते त्याला रोखू शकले नाही आणि शेवटी गौरव कोमात गेला..

इकडे गार्गीला औषधी गोळ्या आणि झोपेचं इंजेकॅशन दिलं होतं.. त्यामुळे तिच्या डोळ्यांवर गुंगी चढली आणि आपोआपच तिचे डोळे मिटले गेले, पण तरीही तिला गाढ झोप लागली नव्हती.. फक्त गुंगीत होती आणि शांत डोळे मिटून पडली होती.. तिच्याजवळ एक नर्स होती.. पण तिकडून दुसरी नर्स काही बोलण्यासाठी धावतच तिथे आली.. तिने आधी गार्गीची चौकशी केली..

नर्स2 - मला तुला काही सांगायचं आहे.. मला सांग ही झोपली आहे की जागी आहे??

नर्स 1- झोपली आहे ती मी केव्हाच तिला झोपेच इंजेकॅशन दिलंय..

नर्स 2 - मघा ही खूप अस्वस्थ वाटते म्हणून तिच्या नवऱ्याची काळजी करत होती ना.. ते तिला मिळालेलं एक इंडिकेशन होत बहुतेक..

नर्स 1 - काय?? कसलं इंडिकेशन??

नर्स 2 - अग तिचा नवरा हिला भेटायला येतच होता तेव्हा रस्त्यात त्याच खूप मोठा अकॅसिडेंट झाला म्हणे.. डोक्याला खूप लागलं, खूप रक्त पण वाहत होत म्हणे.. पण एवढ्या मोठ्या अकॅसिडेंट मध्ये एखादा जागीच गेला असता पण त्याची हिला भेटीची इच्छा अपूर्ण होती म्हणून की काय त्याने त्याचा जीव सोडला नाही.. पण आता तो बिचारा कोमात गेला आहे..

नर्स 1 - बापरे, काय सांगतेस? आणि तुला कसं कळलं एवढं सगळं??

नर्स2 - अग त्याला आपल्याच हॉस्पिटलमध्ये आणलं आहे...आपण तिला शिफ्ट करत होतो तेव्हा जवळून एक अकॅसिडेंट केस गेली होती , आठवत का?? त्याला बघायला ही उठत होती तर आपण हिला लगेच पुन्हा लेटवलं.. तो हीचा नवराच होता.. तेव्हाच आणलं होतं त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये..

नर्स1 - बापरे!!! किती स्ट्रॉंग बॉंडिंग आहे दोघांचं.. ही पुन्हा उठेल तेव्हा परत नवऱ्याबद्दल विचारेल तेव्हा काय सांगणार आहे हिला...

नर्स2 - हो ना ग मला तर खूप वाईट वाटत आहे, देव पण किती परीक्षा घेतो एखाद्याची?? बघ ना..

नर्स 1 - हिला कळायला नको यातलं काही नाहीतर तिला जर ताण आला ना डोक्यावर तर काही खर नाही मग..

नर्स 2 - हम्म... घरचे कसे हँडल करतील आता दोघांना काय माहिती.. बरं चल मी येते.. मला थोडं काम आहे..

गार्गी गुंगीत होती पण तिला झोप लागली नव्हती त्यामुळे या दोघींचं सगळं बोलणं तिने ऐकलं होतं.. आणि गौरवचा अकॅसिडेंट झालाय हे ऐकून नकळतच तिच्या मेंदूवर ताण येऊन, मेंदूच्या सर्व नसा जोरजोरात उडू लागल्यात.. यात त्या फुगून vein डॅमेज व्हायची भीती होती..

मन उदास आहे पण रुसले अजून नाही
मनात असूनी तुझ्या मी, तरी साथ तू नाही

आहे गर्दी सभोवताली पण त्यात तू नाही
मनात असूनी तुझ्या मी, तरी साथ तू नाही

गौरव तिला सद्धे तरी भेटू शकणार नाही हे तिला समजून चुकलं होतं.. आणि त्याचा एवढा मोठा अकॅसिडेंट झाला याचा संपूर्ण दोष तिने स्वतःलाच दिला.. "मी सांगायला नको होतं, मला जी भीती वाटत होती तसच झालं आज.. माझ्यामुळेच आज त्याचा अकॅसिडेंट झाला, मलाच भेटायला घाईने येत असणार तो आणि त्याच लक्ष राहील नसेल आणि हे सगळं घडलं , मीच कारणीभूत आहे या सर्वाला" या विचाराने तीच मन मात्र खूप दुःखी झालं होतं.. "तेव्हा पप्पा माझ्याशी खोटं बोलले होते म्हणजे.. सांगणार तरी काय होते.. मी आधीच या परिस्थितीत आहे, मी कितीही विचारलं तरी मला कुणीही खरं काहीच सांगितलंच नसतं, पण बरं झालं मला कळलं तरी.. पण आता तो कोमात गेलाय.. पुढे काय होणार आहे?? मी त्याच्याशिवाय नाही राहू शकणार.. मी कधी विचारच नव्हता केला असही काही मला बघावं लागेल.. माझं पिल्लू, माझी लेक काय करत असेल .. मी आणि गौरव दोघही असे आहोत तिला किती अभाव वाटत असेल आमच्या प्रेमाचा आणि जर आमच्या दोघनाही काही झालं तर?? माझ्या लेकीकडे कोण बघेल ती तर पोरकी.." विचार करता करता तिचा एकदम श्वास वाढला..
" नाही नाही .. पण शक्यता टाळता येत नाही मला हा विचार करून तिच्या भविष्यासाठी विचार करावाच लागेल.. तिला कोण उत्तम सांभाळू शकेल आमच्यानंतर.. तिची आत्या हो तिची आत्या, त्यांना मुलगी हवीच होती पण देवानी दिली नाही.. आणि गौरंगी वर खूप जीव आहे त्यांचा, काही होण्याआधी मी कुणाला तरी सांगून ठेवते की मी आणि गौरव नाहीं राहिलो तर गौरांगी ला तिच्या आत्याकडे द्या म्हणून.. "

आत्मा नि श्वासाच्या गाठीत अडकून पडले मी आज
माझ्या कोवळ्या फुला तुला पोरकी करून चालले मी आज
माफ करशील ना ग या अभाग्या आईला
तुझे भविष्य दुसऱ्याच्या हाती सोपवून चालले मी आज

मनातल्या मनातच विचार करता करता प्रत्येक विचारागणिक तिचा श्वास वाढत होता, तिच्या बंद डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते...

--------------------------

क्रमशः