Premgandh - 20 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २०)

(आपण मागच्या भागात पाहीलं की, मेघा आणि मीरा या दोघी जुळ्या असतात, त्याचा फायदा घेऊन दोघीही अजय आणि अर्चनाची गंमत करत असतात. त्यामुळे दोघेही खूप गोंधळात पडतात. पण राधिकाला सगळं माहीती पडल्यावर ती त्यांना सगळं सांगते. आणि राधिकाच्या घरच्यांना दोघांचाही स्वभाव, वागणं, बोलणं खूप आवडते. आता राधिकाचे बाबा आणि अजयमध्ये काय बोलणं होतं ते पाहूया....)
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠

अजय - "बाबा, तुम्ही आता कसलीच काळजी नका करू. आता यापुढे सगळंच चांगलं होणार आहे. यापुढे कसलंही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्हाला दुसरं काही नको फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम असू द्या बस."

अजयचं असं आपुलकीचं बोलणं ऐकून राधिकाला आणि तिच्या घरच्यांना खूपच बरं वाटत होतं.

बाबा - "पोरा, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्ही सुखी राहा. तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे."

अजय - "बाबा, आता लवकर बरं व्हायचंय तुम्हाला. काळजी घ्यायची स्वतःची."

बाबा - "हो, आता लवकरच बरं व्हायचंय मला. आजारी पडून कसं चालेल मला. आता तुमच्या लग्नाचं सगळंच ठरवावं लागेल. घरात पहीलंच लग्न. खूपच खूश आहे मी."

बाबांचं बोलणं ऐकून राधिका आणि अजय दोघेही लाजले. त्यांना बघून सर्व गालातच हसत होते. सगळेच खुपच खूश होते.

बाबा - "अजय, आईबाबा कधी येणार आहेत तूझे ? ते आले की लग्नाची बोलणी करून घेऊ."

अजय - "बाबा, येणार आहेत सगळे. तेव्हा तुम्ही सगळं ठरवून घ्या, पण त्याअगोदर तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला."

बाबा - "हो बोल बाळा, काय बोलायचं होतं."

अजय - "बाबा, राधिकाच्या मागे अजून तीन बहिणी आहेत. त्यांचं अजून शिक्षण, लग्न या गोष्टी आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की आजपर्यंत जसं राधिका घरात सगळं सांभाळत आली, तसं लग्नानंतरही सांभाळेल आणि ती एकटीच नाही तर प्रत्येक गोष्टीत मी तिच्या कायम सोबत असेन. बाबा तुम्ही असं नका समजू की मुलीचं लग्न झालं आता, ती तिच्या संसारात सुखी राहू दे. आता तिचं तुमच्या प्रति सगळी कर्तव्य संपली असा नका विचार करू. कारण आता तिच्यासोबत तुमचा हा मुलगा पण तुमच्यासोबत असणार आहे. आणि तिघींचं शिक्षण, लग्न या सगळ्या गोष्टींची जबाबदारी राधिकासोबत मी पण घेणार आहे. आणि बाबा प्लीज या गोष्टीसाठी तुम्ही नाही नका म्हणू." अजय सगळं शांतपणे बोलत होता.

बाबा - "खरंच तुमच्या रूपात देवच भेटला आम्हाला. नशिबच म्हणायचं आमचं पण अजयराव मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय. खरं सांगायचं तर तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. पण एकदा मुलीचं लग्न झालं की तीचं आयुष्य बदलून जातं. मग सासरच्या माणसांची जबाबदारी असते, ती पार पाडावी लागते. आणि आमच्यामुळे तुमच्या संसारात काही अडचण आलेली आम्हाला चालणार नाही. तुमचा दोघांचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा आहे. आमची पोरगी खुश तर आम्ही खुश. बस बाकी आम्हाला काही नको."

अजय - "बाबा, खरं तर लग्नानंतर तुम्हाला सगळ्यांना असं एकदमच सोडून देणं, किंवा आपलं कर्तव्य झटकून देणं तुमच्या मुलीला तरी जमणार आहे का सांगा बरं आणि तुम्हाला सोडून देऊन ती तरी खूश राहू शकेल का ? आणि राधिका स्वतःसोबतच आपल्या घरच्यांचा पण विचार करते खरं तर तिचा हाच स्वभाव मला आणि माझ्या घरच्यांना आवडला. आणि याबाबतीत राधिकासोबत, आणि आईबाबांसोबत पण सगळं स्पष्टच बोलणं झालंय माझं. माझ्या आईबाबांनाही काहीच प्रॉब्लेम नाही. उलट तेच मला सांगतात की तू खंबीरपणे राधिकाच्या सोबत उभा रहा म्हणून."

अजयचं बोलणं ऐकून बाबांना काय बोलावं समजत नव्हतं. ते थोडावेळ शांत बसले आणि नंतर बोलले.

बाबा - "तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. पण असं तीच्या लग्नानंतर तीच्यावर अवलंबून राहणं या बापमनाला नाही पटत अजयराव. तुम्ही, तुमच्या घरचे सगळे खूप चांगल्या विचारांचे आहात. तुम्ही आम्हाला बोट पकडायला दिलं म्हणून तुमचा हात पकडायचा नाही आम्हाला. आतापर्यंत जसे मी कष्ट केले, यापुढेही माझ्या तीन पोरींसाठी कष्ट करेन, पण असं पोरीच्या आणि जावयाच्या पैशावर अवलंबून राहणं मला अजिबात पटत नाही."

अजय - "बाबा, माझं असं म्हणणं नाहीये की आमच्या पैशांवर तुम्ही अवलंबून रहा असं. तुम्ही तुमच्या परीने कष्ट करा पण तिच्या कर्तव्यापासून तिला एकदमच दूर करू नका. तिचं जरी लग्न झालं तरी तुमच्याशी तिचं नातं तुटणार आहे का नाही ना. मग तिच्या परीने तिला जेवढं करायचं तेवढं करू द्या. माझी पण या गोष्टीला काहीच हरकत नाहीये आणि यातच तिचा आनंद आहे."

राधिका - "हो बाबा, अजय बोलतो ते अगदी बरोबरच आहे. आणि माझ्या कर्तव्यापासून मला माझे हात झटकायचे नाहीत बाबा. माझं चित्त तरी लागणार आहे का तुम्हाला सोडून देऊन आणि तुम्हीच म्हणता ना बाबा की मी तुमची मुलगी नाही मुलगाच आहे असं. मग मुलगा आपल्या आईबाबांची, बहिणींची जबाबदारी झटकतो का नाही ना... आणि आज मी जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळेच आहे. तुम्ही पण खुप कष्ट करून वाढवलंय आम्हाला. मग तुमच्याप्रती माझं काहीच कर्तव्य नाही का? माझं पण मला कर्तव्य करू द्या बाबा."

राधिकाचं असं बोलणं ऐकून आईबाबांचे डोळे भरून आले. बाबांनी तीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

बाबा - "राधी, खरंच गं खूप नशिबवान समजतो बघ मी स्वतःला. तुझ्यासारखी मुलगी असेल तर त्या बापाला मुलाची काय गरज आहे. पोरी तुझं सगळं म्हणणं मान्य आहे मला पण आमच्यामुळे तुझ्या आयुष्याची फरपट नको व्हायला पोरी. तू तुझ्या सासरी सुखात राहावी एवढंच वाटते बाळा मला."

राधिका - "बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना."

बाबा - "हो बाळा, तुझ्यावर नाही तर कोणावर विश्वास ठेवू सांग. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर."

राधिका - "बस तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग तुम्ही आतापर्यंत जसा माझ्यावर विश्वास ठेवलात तसा यापुढेही ठेवा बस."

बाबा - "बरं ठिक आहे बाळा. जशी तुझी इच्छा. पण स्वतःला जास्त त्रास करून नाही घ्यायचा कळलं."

राधिका - "हो बाबा."

सगळे खूप खूश होते. अजय, अर्चनाला पण बाबांचं ऐकून खूप बरं वाटत होतं.

अजय - "आईबाबा, चला आता निघायला हवं आम्हाला. खूप उशीर झालाय."

आई - "अहो असं कसं लगेच निघालात तुम्ही. आज पहिल्यांदाच आपल्या घरी आलात. जेवल्याशिवाय जायचं नाही तुम्ही दोघांनीही."

अर्चना - "आई, जेऊन गेलो असतो आम्ही, पण खरंच आता नको. नंतर येऊ परत. कारण घरी लाडू पण वाट बघत असेल माझी. खूप उशीर पण झालाय आता."

अजय - "हो आई, नंतर आलो की मग जेऊनच जाऊ आम्ही. पण आता निघावं लागेल आम्हाला. उशीर पण खुप झालाय."

आई - "बरं ठिक आहे पण पुढच्या वेळी येताना लाडूला पण सोबत घेऊन यायचं बरं का."

अर्चना - "हो आई नक्कीच घेऊन येईन."

अजय - "बरं राधिका येतो आम्ही. बाबा काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा." आणि अजयने राधिकाच्या आईबाबांना नमस्कार केला.

अजय - "आणि राधिका तुझ्या बहीणी खूप हुशार आहेत बरं. जास्त ओरडत नको जाऊ त्यांना. आणि पुढच्या वेळी घरी कोणी नवीन माणसं येणार असतील तर त्यांना आधीच सांगून ठेवत जा की तुझ्या दोन जूळ्या बहीणी आहेत असं, नाहीतर या दोघी मिळून खरंच त्यांना डोळ्यांच्या डाॅक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला लावतील." तो हसतच म्हणाला. त्याचं ऐकून सगळे खूप हसू लागले.

अजय आणि अर्चना दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघून गेले. मेघा, मीरा आणि सोनालीने येऊन राधिकाला मिठीच मारली.

मेघा - "ताई, तुझ्यासाठी आम्ही खूप खुश आहोत. अजय जीजूंचा स्वभाव पण खूप छान आहे. आपल्या घरी तुझं पहीलंच लग्न होणार... कित्ती मज्जा येईल ना." ती खूप एक्साईट होत म्हणाली.

मीरा - "हो ना ताई खरंच. आम्ही खूप वाट बघत आहोत त्या दिवसाची जेव्हा आमची ताई नवरीच्या वेषात असेल. वाॅव, ताई कित्ती सुंदर दिसशील ना गं तू." मीरा दोन्ही हात गालावर ठेवतच म्हणाली.

सोनाली - "ताई, तू लग्न करून सासरी गेलीस की आम्हाला विसरून जाणार नाहीस ना गं तू. आपल्या घरी येत राहशील ना तू. तुझ्याशिवाय घर खूप सूनंसुनं वाटेल गं आम्हांला." ती एकदम नाराज स्वरातच म्हणाली. तीचं ऐकून मेघा, मीरा शांतच बसल्या. सगळ्यांचे डोळेच भरून आले. आईने पण पदर डोळ्यांना लावला.

राधिका - "अगं तुम्हाला कसं विसरेन मी. तुमच्या सगळ्यांत तर जीव आहे माझा. मी नेहमीच येत जाईन घरी आणि तुम्हाला माझी आठवण आली की तुम्ही पण यायचं भेटायला मला कळलं ना."

सोनाली - "हो ताई येऊ आम्ही."

राधिका - "सोनू, खूप शांत आहेस तू आणि सगळ्यात लहान पण आहेस, पण खूप समजदारीच्या गोष्टी करतेस हा तू. बघ असं बोलून सगळ्यांना रडवलंस ना तू."

मेघा - "हो तीचंच कौतुक कर तू ताई. आम्ही समजदार नाहीत का?" ती लटका रूसवा दाखवतच म्हणाली.

राधिका - "हो तुमचं दोघींचं तर विशेष कौतूक करायला हवं. आज खूप कौतुकास्पद काम केलंय ना तुम्ही दोघींनी." आणि राधिका त्या दोघींकडे जाऊ लागली. तेवढ्यात दोघी हसतच बाहेर पळून गेल्या. आणि त्या दोघींना सगळेच हसू लागले.

आई - "खरंच या पोरी ना इतक्या आगाऊ झाल्यांत की कोणाचीही मजाकमस्ती करत असतात."

बाबा - "जाऊ दे गं. लहान आहेत अजून त्या. असेच हसायचे, खेळायचे दिवस आहेत त्यांचे. बघता बघता मुली कधी मोठ्या होतात कळत पण नाही. बघ आपली राधी लहान लहान म्हणता आता लग्न करून जाईल पोरगी." एवढं बोलून बाबांचे डोळेच भरून आले. त्यांना तोंडातून पुढे शब्दच फूटत नव्हता. राधिका आणि आईच्या डोळ्यात पण पाणी आलं.

राधिका - "बाबा, असं का बोलता तुम्ही. लग्न करून गेली मी तरीसुद्धा तुमच्यासोबत कायम असणार आहे. तुम्हाला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही मी." आणि तिने बाबांचे डोळे पुसले.

राधिका - "आधीच तुमची तब्येत बरी नाही, आणि रडलात तर आणखी तब्येत खराब होईल. आराम करा तुम्ही."

बाबा झोपले आणि आई, राधिका, सोनाली आपापल्या कामाला निघुन गेले.



क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २०

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀