Premgandh - 21 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २१)

(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आणि राधिकाच्या बाबांचं व्यवस्थित बोलणं होते. अजय आणि अर्चना दोघेही घरी निघून जातात. मेघा आणि मीराची मजाकमस्ती चालूच असते. सोनाली आणि बाबांच्या बोलण्याने सगळ्यांचे डोळे पाणावतात. घरातलं वातावरण खूपच भावनात्मक होऊन जातं.... आता बघूया पुढील भागात काय होते...)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अजयच्या घरी अजयचे आईबाबा, त्याची बहीण अमृता, अर्चनाचा नवरा अजय, अर्चना, तिची आई सर्वच एकत्र जमले होते. अजयने राधिकाच्या बाबांशी झालेलं सगळं बोलणं त्याच्या आईबाबांना सांगितलं. त्यांना पण स्वतःच्या मुलावर खूप गर्व वाटत होता.

अजयचे बाबा - "अजय, राधिकाच्या बाबांसोबत अगदी योग्य आणि व्यवस्थित बोललास तू. आम्हाला अगदीच बोलणं पटलं तुझं. आपल्याला घरात राधिकाला आपली मुलगी म्हणूनच आणायची आहे. आणि तीच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभं राहायचं आहे."

अजयची आई - "हो ना अगदी बरोबरच आहे तुमचं. मला ही पटतेय तुमचं बोलणं. आता लवकरात लवकर लग्नाची घाई करायला हवी. काय मग चिरंजीव कधी जायचं लग्नाची बोलणी करायला ?"

अजय - "आई, काय गं तू पण. बाबा आणि तू ठरवा ना कधी जायचं ते." तो लाजतच म्हणाला. त्याने अमृताच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून तो लाजून तोंड लपवू लागला. सगळे त्याला बघून खूप हसू लागले.

बाबा - "बघितलं सावी लग्नाचा विषय काढताच आपले चिरंजीव किती लाजत आहेत. मला तर आपले दोघांचे लग्नाचे दिवस आठवले बघ." ते हसतच म्हणाले.

आई - "काय तुम्ही पण खरंच. मुलीचं लग्न झालं आता मुलाचं पण होईल आणि तुम्हाला आपल्या लग्नाचे दिवस आठवत आहेत का...? इथे सगळेच बसलेत. तरी त्यांच्यासमोर असं बोलता तुम्ही... तुम्हाला काही लाजबीज आहे की नाही...?" आईचं बोलणं ऐकून सगळे खूप हसू लागले.

अजय - "सांगा ना बाबा, मला पण ऐकायचं आहे आता. तुम्ही पहिल्यांदा आईला बघायला गेले होते. तेव्हा कसा कार्यक्रम झाला होता. आम्हाला पण सांगा ना."

अजयचं ऐकून त्याच्या आईला आणि अर्चनाच्या आईला खूप हसू आलं. सगळे दोघींकडे बघू लागले.

अर्चना - "मावशी, काय झालं गं तूम्हाला एवढं हसायला. काही गंमत झाली होती का तेव्हा? आम्हाला पण सांग ना."

अजयची आई - "तुझ्या मावशांनाच विचार काय झालं होतं ते?" आई हसतच म्हणाली.

अमृता - "बाबा, आम्हाला पण सांगा ना काय झालं होतं ते?"

बाबा लटका राग दाखवत त्यांच्याकडेच बघत होते. ते बघून आईला अजूनच हसायला आलं. त्यांना बघून सगळेच खूप हसू लागले.

आई - "ऐका मी सांगते. काय झालं होतं ते. बाबांची गंमत सांगते तुम्हाला मी.. तुझे आजी आजोबा मला बघून गेले होते. त्यांना मी पसंत आले होते आणि आठवड्यानंतर तुझे बाबा कामावरूनच मला बघायला येणार होते. त्यांनी माझा फोटो पण पाहीला नव्हता. तूझे बाबा सारखे कामकाम करत राहायचे. आजीआजोबांचं ऐकायचे नाहीत. मग एक दिवस तुझे आजीआजोबा खूप ओरडले होते तूझ्या बाबांना की एकदा जाऊन मुलगी बघून ये म्हणून. मग पुढची बोलणी करायला बरं पडेल आम्हाला असं. तुझे बाबा कंडक्टरच्या युनिफॉर्म मध्येच मला बघायला आले होते. गावातली सगळी शाळेची मुलं तुझ्या बाबांना ओळखायची म्हणून हे गावात आले तसे सगळे मुलं त्यांना आवाज देऊ लागले. तुझ्या बाबांना घरचा पत्ता व्यवस्थित माहीती नव्हता. म्हणून त्यांनी मुलांना माझं नाव सांगितलं आणि घर दाखवायला सांगितलं."

गावामध्ये अजून एक सविता नावाची मुलगी होती. लहान मुलं ती त्यांना एवढं काय माहिती, त्यांनी दुसऱ्या सविता नावाच्या मुलीचं घर दाखवलं. आणि तिथूनच सगळी गंमत सुरू झाली. तुझे बाबा त्यांच्या घरी गेले. आणि नेमकं त्याचदिवशी तिला पण मुलगा बघायला येणार होता. तीच्या घरच्यांना वाटलं की हाच मुलगा आहे. त्यांनी तुझ्या बाबांचा छान पाहुणचार केला. बाबांना कांदेपोहे खाऊ घातले. बाबांनी त्या सविताला पण पाहीलं. आणि तूझ्या बाबांना ती सविता पण खूप आवडली होती. आणि अजून काय सांगू पुढे तुझे बाबा पण तीला पसंत आले होते."

एवढं बोलून आईने रागात नाकच मुरडलं. सगळेच खूप हासत होते. बाबा मात्र सगळ्यांना रागातच बघत होते. आणि गालातल्या गालातच त्यांना हसू पण येत होतं.

अर्चना - "मावशी, मग पुढे काय झालं होतं ग ?"

अजयचे बाबा - "काय सावी तू पण, पोरांना सगळं सांगून कशाला त्यांच्यासमोर माझी लाज काढतेस ?"

अजयची आई - "विषय तर तुम्हीच काढला ना, मग सांगायला नको का पोरांना."

अजय - "आई तू बोल गं. आम्हाला ऐकायचं आहे आता. मग पुढे काय झालं ते सांग..."

अजयची आई - "मग पुढे काय होणार ? तीला जो मुलगा बघायला येणार होता. थोड्या वेळाने तो मुलगा पण त्यांच्या घरी आला. तिच्या घरचे पार गोंधळून गेले. तुझे बाबा आणि तो मुलगा पण गोंधळून गेला. सगळे एकमेकांकडे बघतच राहिले. मग त्या मुलीच्या वडिलांनी तुझ्या बाबांची सगळी चौकशी केली. तेव्हा मग त्यांना सगळा घोळ कळला. पण एक गंमत म्हणजे त्या मुलापेक्षा त्या मुलीला आणि तीच्या घरच्यांना तुझे बाबाच जास्त आवडले होते. त्यांनी सरळ तुझ्या बाबांनाच विचारलं की माझ्या मुलीशी लग्न करशील का असं.... या गोष्टीचा त्या मुलाला खूप राग आला. आणि तो मुलगा तिथुन रागावून निघून गेला. आणि तूझ्या बाबांना काय करावं कळत नव्हतं. बाबांना तुझ्या खूप टेन्शन आलं आणि घाबरले पण आणि त्यांना म्हणाले अहो काका नाही नाही माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी दुसरीच मुलगी पसंत केलंय. नावं सारखीच दोघींची म्हणून थोडा गोंधळ झाला माझा. चूकून आलो मी तुमच्या घरी एवढं बोलून तुझ्या बाबांनी काढला पळ तिथून..." आई हसतच म्हणाली.

सगळे खूप जोरजोरात पोट धरून हसत होते. आणि त्यांना बघून अजयचे बाबा पण खूप हसू लागले.

अर्चनाचा नवरा - "बाबा, मग काय केलंत तुम्ही ? तिथून आईच्या घरी गेलात की डायरेक्ट घरी पळालात ?"

अजयचे बाबा - "आधीच एवढा गोंधळ घालून ठेवला होता मी की यांच्या घरी परत जाण्याची माझी हिंमतच झाली नाही. तिथून सरळ घरीच पळ काढला. घरी आलो आणि आईबाबांना सांगितलं सगळं. आईबाबा मला खूप हसले आणि त्यांत आई हसता हसता ओरडू पण लागली. मला तर एवढं ओशाळल्यासारखं झालं होतं खरंच..." बाबा हसतच म्हणाले.

अजयची आई - "आजपण तुझे बाबा तिथून जाताना मान खाली घालूनच येतात आणि मान खाली घालूनच जातात. आणि त्या मुलीचे वडील आजपण तुझ्या बाबांना आवाज देतात... काय हो नकली जावईबापू कसे आहात ? आणि बाबा तुझे एवढे लाजतात...." आई हसतच म्हणाली.
सगळे बाबांना खूप हसत होते.....

अर्चना - "काहीही म्हणा मावशा पण खरंच या सेम नावाचा खूप गोंधळ होत असतो. राधिका वहीनीचा पण असाच गोंधळ झाला होता हो की नाही अजय..." ती हसतच म्हणाली. तीचा नवरा, अजय, अमृता सगळेच खूप हसू लागले.

अजयचे बाबा - "का तिचा काय प्रॉब्लेम झाला होता ?"

अर्चनाने राधिकाला अजय आणि तिच्याबद्दल झालेला गैरसमज तिने सगळ्यांना सांगितला. तसे सगळे खूप हसू लागले.

अमृता - "बिचारीची तिची तरी काय चूक होती बाबा ? यांची तिच्याशी एवढी चांगली मैत्री असून तिला काही सांगितलं नाही. या दोघांनी यांच्या नात्याबद्दल तिला सांगायला नको होतं का ? चूक या दोघांचीच होती."

अर्चना - "बिचारी एवढी ओशाळली होती ना त्यादिवशी खरंच. घाईघाईतच बाहेर निघून गेली." ती हसतच म्हणाली.

अर्चनाचा नवरा अजय - "असो... तीचा गैरसमज दूर केला ना अजयने बस झालं. आता ती पण आपल्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे. म्हणून आधीच तिची सर्वांसोबत ओळख करून द्या म्हणजे झालं..." तो हसतच म्हणाला.
सगळ्यांच्या अशाच गप्पा चालू होत्या.

-------------------------------------------------------------

--श्रीरामपूर-- भालेकर वाडा---

"तूला काही अक्कल आहे की नाही गाढवा. हेच दिवस पाहण्यासाठी मी एवढी मेहनत केली होती का? अरे हे जे काही केलंय मी ते सगळं तुझ्यासाठीच केलंय आणि तू रात्रंदिवस दारू, जूगार ह्या गोष्टीतच मश्गूल असतोस. अरे आता तरी सुधार जरा स्वतःला. कुठे कुठे लक्ष देऊ मी एकटी ?" कुसुम भालेकर (राधिकाची आत्या) ती आपल्या मुलाला रागात बडबड करत होती.

श्रीरामपूर मध्ये त्यांचा चांगला ऐसपैस वाडा होता. भरपूर शेतीवाडी, सोबत तीच्या मुलाने गोविंद भालेकरने दारूचा व्यवसाय चालू केला होता. रात्रंदिवस तो दारूच्या नशेत असायचा, गुंडागर्दी, दादागिरी यातच त्याचे दिवस जायचे.
आजपण तो दारू पिऊन आला होता. कुसूम त्याला बडबड करत होती.

"अगं आई, तू एकटी कुठे आहेस? घरात एवढे नोकरचाकर आहेत ना. त्यांच्याकडे लक्ष दे की. आणि कशाला, कोणासाठी सुधरू मी. इथे सुधरलेल्या चांगल्या माणसांना कोण इज्जत देते गं. आपल्या सारख्या गुंडागर्दी करणार्‍यांनाच लोक जास्त इज्जत देत असतात, समजलं का. बघ बरं संपूर्ण गावात तुझ्या मुलाची किती इज्जत आहे ते. आणि माझ्यामुळेच लोकं तुझी इज्जत करतात, समजलं ना..."

कुसुम - "पण अशी गुंडागर्दी करून कमावलेली इज्जत काय कामाची ती... लग्नाच्या वयाचा झालास आता तू, असंच रात्रंदिवस दारूत बुडून राहशील, दादागिरी करत फिरशील तर अशाने लग्नासाठी कोण मुलगी देणार आहे तूला?"

गोविंद - "कशाला कोणी दुसरी मुलगी हवी मला?तुझ्या भावाची नाम्या मामाची मुलगी आहे ना. सोज्वळ, सुंदर तीच मला बायको म्हणून हवी. जा आणि मामाशी लग्नाची बोलणी करून ये. आणि परत जर मामाने नाही ऐकलं ना तर मग मला सांग. काय करायचं ते मी बघतो पुढे..." तो दारूच्या नशेतच बोलत होता.

"तूला काय वाटलं, मी काय बोलली नसेल का त्यांना तुमच्या लग्नाविषयी? मागे त्यांच्या घरी गेली होती तेव्हा सरू वहीनीला सांगून आली होती. राधिकाला विचारून घे म्हणून... आणि तूझा तो नाम्या मामा तर त्याच्या बहीणीशी बोलायला तयार नाही..." ती रागातच बोलत होती.

"आई, तूझा फक्त नोकरचाकरांवरच दरारा असतो बस. बाकी काही कामाची नाहीस तू. मलाच काहीतरी करावं लागेल. पण मी लग्न करेन तर तिच्याशीच करेन बघ तू..." तो बोलला आणि नशेतच बेडवर जाऊन पडला. कुसूमने डोक्यात हातच मारून घेतला.

"एकुलतं एक पोरगं माझं, ते पण नशेत वाया गेलेलं. त्याच्यासाठी एवढं काही करतेय आणि त्यालाच कसली काही पडलेली नाही...." अशी तिची बडबड चालूच होती.

-------------------------------------------------------------

इथे राधिकाच्या घरी सर्वच खूप खुश होते. सगळे जेवायला बसले होते. राधिकाच्या बाबांना पण आता बरं वाटू लागलं होतं.

बाबा - "सरू, आता मला बरं वाटतेय. मी पण उद्यापासून कामाला जातो. अजून किती दिवस घरी राहू. आता राधीच्या लग्नासाठी पण पैसा जमवायला हवा ना... एवढे दिवस झाले राधी एकटीच घर सांभाळतेय. आता मला पण हातपाय चालवायला हवेत."

आई - "हो बरोबर आहे तुमचं पण."

राधिका - "बाबा, माझ्या लग्नासाठी खूप काही पैसा खर्च करण्याची गरज नाही... साधाच लग्न कार्यक्रम करूया आणि अजून वेळ आहे लग्नाला माझ्या. आत्ताच का टेन्शन घेताय तुम्ही... आत्ताच आजारातून बरे झालात आणि टेन्शन घेतलं तर पुन्हा त्रास होईल तुम्हाला... म्हणून जास्त विचार नका करू. होईल सर्व ठीक..."

बाबा - "अगं राधी, तू काळजीपोटी बोलते माहीती आहे मला. पण अजून किती दिवस असं चालणार ना आणि मला बरं वाटतेय आता. नको काळजी करूस एवढी. काही होत नाही मला. आणि थोडाफार पैसा तर हवाच ना हातात, तो साठवायला नको का?"

राधिका - "पण तुम्हाला पुर्ण बरं वाटत असेल तरच कामाला जावा तुम्ही. नाहीतर अजून थोडे दिवस आराम करा घरी आणि नंतर जा तुम्ही."

आई - "हो राधी बरोबर बोलतेय. बरं वाटत असेल तरच बाहेर पडा."

बाबा - "अगं तुम्ही मायलेकी नका एवढी काळजी करू माझी. एवढे दिवस मी घरी आराम केलाय ना. आता एकदम टकाटक तब्येत आहे माझी. आणि आपल्या राधीच्या लग्नानंतर आपल्या मेघूसाठी पण तर वांग्याची वाडी असणारा मुलगा शोधायचा आहे की नाही. मग त्यासाठी घराबाहेर पडायला हवं ना मला... काय मेघू बरोबर बोलतोय ना मी...." ते हसतच म्हणाले.

मेघा - "काय बाबा तुम्ही पण माझी मस्करी करताय ना..."
सगळे खूपच हसत होते.


क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २१

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀