सं...वेदना..!!

                                    सं..! वेदना..!
  साल -  2099
                   रिसर्च लॅब मधले लाल दिवे हाय अॅलर्ट सिक्युरिटी अलार्मसह धगधगु लागले. इमारतीच्या भिंती आवाजाने कापू लागल्या. बाहेर होणारे गन फायरिंगचे आवाज आत घुमू लागले.ताबडतोब संपूर्ण इमारतीभोवती असलेले टंगस्टॅनियमचे मेटल शिल्ड अॅक्टिव्ह करण्यात आले. त्यावर करंट पास होऊ लागला. टंगस्टॅनियमचे सुरक्षा कवच अभेद्य होते आणि बाहेर तैनात रोबोटिक्स आर्मीचा निशाणा अचूक होता. रक्षा प्रणाली कितीही आधुनिक, सतर्क, भक्कम असली तरीही सतत भीतीचे सावट वातावरण गढूळ करून टाकत होते. एवढ्यात चैतन्य धावत पळत लॅब मध्ये आला. "ते...ते...लॅब मध्ये एंटर झालेत. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवे..!!! कम ऑन..!! फास्ट..!" - चैतन्य ला धाप लागली होती. धड बोलताही येईना. त्याला पहाताच साऱ्यांना धक्का बसला होता. कारण, त्याचे कपडे मळलेले, ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. कुणाशी तरी जबरदस्त दोन हात करावे लागले असावे असा एकंदरीत त्याचा अवतार दिसत होता. आत येताच त्याने स्वतःला आयसोल्युशन रूम मध्ये कोंडून घेतले. त्याक्षणी सर्वांना कळून चुकले की, एक्स व्हायरस इन्फेक्टेड व्यक्तीच्या कचाट्यात तो सापडला असावा. वेळ न दवडता ताबडतोब डॉ. जॅक ने चैतन्य ला तपासले कुठेही इन्फेक्शन झाले नव्हते. चैतन्य ने स्वच्छ आंघोळ केली, स्वतःला सॅनिटाईझ केले. डॉ. जॅक तसे पहाता एक रोबोट होता पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची अभूतपूर्व कमाल म्हणावी लागेल. कारण, जॅक रोबोट असून देखील त्याच्यात मानवाच्या साऱ्या भावभावना  होत्या. शिवाय मानवासारखाच तो दिसत होता. रिसर्च लॅब मध्ये त्याला डॉक्टर जॅक नावाने ओळखले जात होते जे नाव त्याला त्याच्या रचेत्याने म्हणजे चैतन्यनेच दिले होते. चैतन्य न्यूरोसायंटिस्ट होता. जॅक मध्ये एका निष्णात सायंटिस्टचे सारे गुण आणि ज्ञान फीड केले गेले होते. खरे तर जॅक एक अशी मानवनिर्मित मशीन होता जो विज्ञान शाखेत लपून असलेली रहस्ये उलगडण्यात शास्त्रज्ञांना मदत करण्यास सक्षम होता. जॅक सारखेच कैक रोबोट्स आपापल्या क्षमते नुसार प्रशासनाचे मदतनीस म्हणून वेगवेगळ्या शाखेत कार्यरत होते. 
         विश्व आधुनिक सुख सुविधांनी नटले होते. नवनविन तंत्रज्ञान साकारत होते. सामान्य मानवासाठी चंद्रयात्रा करणे शक्य झाले होते. अतिशय चिवट अशी मानव जात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील होती. टेक्नॉलॉजी आणि विज्ञान जितके विकसित होत होते तितकीच विकसित आव्हाने मानवासमोर अक्राळविक्राळ रूप घेऊन उभी ठाकत होती. कधी नैसर्गिक तर कधी मानव निर्मित आपत्ती तितकीच भीषण होत चालली होती. नवनवे प्रयोग आणि उपाय योजना समोर येत होत्या. रोगा आधीच त्यावर मात करता यावी यासाठी प्रत्येक देशातील रिसर्च लॅब सतत कार्यरत होत्या. असाध्य रोगांवर देखिल उपचार करणे सहज शक्य होऊ लागले होते. परंतु असे असले जरी, तरी विकसित होणाऱ्या मानव प्रजातीच्या अस्तित्वाचा लवकरच पूर्णपणे लोप पावेल असा भयंकर साथीचा रोग सध्या जगभरात थैमान घालत होता. मानवाचे स्वातंत्र्य हिरावले गेले होते. सारे जग आपापल्या घरात बंदिस्त झाले होते. दिवसा तेवढे बाहेर निघता यायचे तरीही घराबाहेर पडण्याची जोखीम कोणीही पत्करायला तयार नव्हते. कारण काळोखात दबा धरून ते बसले होते. इन्फेक्शन च्या भीतीने बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना इमारतींच्या टेरेसवर खाद्य पुरवठा हेलिकॉप्टर ने करण्यात येत होता. एक्स व्हायरसच्या महामारीला घाबरून कोणीच घराबाहेर पडत नव्हते. आज संपूर्ण जग या महामारीच्या संकटा समोर गुडघे टेकून झुकले होते. झपाट्याने लोकसंख्या घटत चालली होती. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सारे विचारवंत एक झाले होते. अशावेळी राजकिय मतभेद, सत्ता, वर्चस्व या सगळ्या बाबी बाजूला सारत सारे विश्व एकजुटीने या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना आखत होते. जगभरातून काही तज्ञ शास्त्रज्ञ या एकमेव रिसर्च लॅब च्या भव्य इमारतीत सध्याच्या ग्लोबल पॅन्डेमीक एक्स व्हायरस डिसीज वर लस बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पण आधी पाहूया एक्स व्हायरसचा जन्म कसा आणि जगातील कुठल्या प्रांतातून झाला..? एवढी वर्षं हा व्हायरस कुठे होता..? आणि एकाएकी कसा गायब झाला होता..? ईतकी वर्षे दबा धरून बसलेला हा व्हायरस आजच कसा संक्रमित झाला..? हे संक्रमण कोणी पसरविले..? एक्स व्हायरस हा रेबिस व इन्फ्लुएंझा व्हायरस चे हायब्रीड कॉम्बिनेशन होते जे इबोला व्हायरसच्या आरएनए सोबत  मोडीफाय केले गेले होते. त्यामुळे हा मानवनिर्मित व्हायरस होता यावर जगभरातून एकमत झाले होते. आणि अभ्यासानुसार यावर एकेकाळी लस देखील बनली होती. ज्यामुळे हे संक्रमण त्याकाळी आटोक्यात ठेवण्यात यश आले होते. जगभर याचा प्रसार झाला नव्हता. पण आज ती लस कोणत्याच देशाकडे का नाही..? त्याचा पॅटर्न कुठे आहे..? त्यासाठी भूतकाळात डोकवावे लागेल.........

तारीख - 21 जून 2022, 
स्थान - युलीन, ग्वान्गशी, चायना 
          व्हायरॉलॉजीमध्ये शिक्षण घेत असलेला पंचवीस वर्षांचा तरुण चँग ली आपल्या कोलमडत जाणाऱ्या आर्थिक परिस्थितीला पार कंटाळून गेला होता. एकेकाळी धनाढ्य असल्याने एवढ्या मोठ्या घराची निगा राखणे आता कठीण जात होते. हळूहळू सारे फर्निचर विकले गेले. मौल्यवान वस्तू विकाव्या लागल्या. तरीही पैसा पुरत नसल्याने चँग ला शिक्षण मधेच सोडावे लागले होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती त्यावेळी चिकित्सेपोटी घरातल्या घरात अभ्यासासाठी त्याने स्वतःच आपली अशी छोटीशी व्हायरॉलॉजी रिसर्च लॅब तयार केली होती. पण त्याचे वडील म्हातारपणाने जसजसे थकत गेले आर्थिक बाजूही खचत गेली. त्यात भर म्हणजे त्यांच्या सतत काही ना काही तब्येतीच्या तक्रारी असल्याने चँग वडिलांना सोडून कुठे जाऊही शकत नव्हता. व्हायरॉलॉजिस्ट म्हणून पुढील शिक्षण घेण्यासाठी ना त्याच्याकडे वेळ होता ना पैसा. तरीही चँग ने व्हायरॉलॉजी चा अभ्यास सोडला नव्हता. वेळ मिळेल तेंव्हा लॅबमध्ये तो प्रॅक्टिस करत रहायचा. तेवढाच विरंगुळा. तीच त्याची आवड होती. तरीही पोटापाण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत होते. दिवस रात्र मेहनत केल्या नंतर जे काही पैसे हाती यायचे ते देखील वडिलांच्या आजारपणात खर्च होत होते. व्हायरॉलॉजिस्ट बनणे हे त्याचे स्वप्नं पूर्णत्वास येता येता राहिले होते. भंगलेली स्वप्नं, ईच्छा, उमेद, एकटेपणा आणि नैराश्येने कदाचित त्याने कधीच आत्महत्या केली असती पण जीन मुळे जगण्याची उमेद टिकून होती. जीन..!! त्याचा पेट डॉग नव्हे त्याचा मित्रच होता. सोनेरी रंगाचा असल्याने त्याचे नाव जीन ठेवले होते.  त्या संध्याकाळी चँग घरी परतला मात्र नेहमी सारखा जीन शेपूट हलवत त्याच्या स्वागतासाठी अंगणात धावत आला नाही. चँग बेचैन झाला आणि रात्रभर त्याचा शोध घेऊन हतबल होऊन घरी आला. जीन असा एकाएकी गायब होणं शक्य नव्हतं. त्यावेळी त्याच्या डोक्यात विचार चमकला आणि भीतीची कळ सणकुन हृदयातून होत मस्तकात गेली. आजच सुरू झालेले डॉग फेस्टिव्हल..!!! जीन ला कुणी चोरून तर नेले नसेल..??
           एकीकडे डॉग मिट लव्हर्स गर्दी करून मिट फूड खाण्यात मग्न होते. तर दुसरीकडे कुत्र्यांची वाढती मागणी लक्षात घेता पाळीव कुत्र्यांनाच नव्हे तर रस्त्यावर फिरणाऱ्या दिसेल त्या कुत्र्याला पकडून बाजारात विक्रीसाठी आणले जात होते. त्यातल्या त्यात पाळीव कुत्र्यांची डिमांड जास्त होती आणि त्यांची किंमत देखिल फार होती. कारण त्यांचे खाणे व राहणीमान उत्तम असल्याने त्यांचे मांस देखील चविष्ट असते. असे श्रीमंत गिऱ्हाईकांचे म्हणणे होते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात ना केवळ कुत्रे, मांजरी तर ईतर पशुपक्ष्यांचा समावेश देखिल मोठ्या प्रमाणावर केला जात होता. दर वर्षी तब्बल दहा हजार तरी कुत्र्यांची कत्तल एकवीस ते तीस जून या कालावधीत केली जात होती. या फेस्टिव्हलचा जगभरातून विरोध केला जात असून देखिल केवळ युलीन प्रांतातील स्थानिक लोकांचा हा उत्सव असल्याने यावर चायनीज प्रशासन काहीच कारवाई करण्यास तयार नव्हते. 
          मनात विचार चमकता क्षणी चँग डॉग फेस्टिव्हल च्या दिशेने झपझप पावले टाकत पोहोचला. कुत्र्यांचे वेदनेने विव्हळणे आसमंत चिरून टाकत होते. चँग ला तिथली हृदय हेलावून टाकणारी दृश्ये पाहून भोवळ येत होती तरीही त्याची नजर जीन ला शोधत होती. छोट्याशा पिंजऱ्यात दहा बारा बंदीस्त कुत्रे जीव मुठीत धरून भीतीने थरथरत कसेबसे दाटीवाटीने कोंबले गेले होते. लहानगी पिल्ले आपल्या निरागस नजरेने मानवाचे हे क्रौर्य पाहून रडत होती. हे सारे विदीर्ण करणारे दृश्य पाहून चँग चे काळीज गलबलून येत होते. जिवंत कुत्र्यांना उकळत्या पाण्यात टाकले जात होते तर कुठे त्यांना जाळण्यात येत होते. सहन न होणाऱ्या त्या वेदना. त्यांची होणारी तडफड, त्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करीत लोक त्यांचे मांस भक्षण करण्याचा आस्वाद लुटत होते. राक्षसी प्रवृत्ती चे प्रतिकच जणू. चँग लहानपणापासून कधीच डॉग फेस्टिव्हल मध्ये सहभागी झाला नव्हता. त्याच्या वडिलांनी या उत्सवाच्या विरोधात बरेच प्रयत्न केले होते. ज्यासाठी त्यांना जबर मारहाण देखील केली गेली होती. आणि आता तर तब्येतीमुळे त्यांना काहीच करणे शक्य नव्हते परंतु त्यांनी स्थापन केलेली 'सेव्ह डॉग्स' संघटना मात्र आज ही कार्यरत होती. सरतेशेवटी चँग ला त्यांचीच मदत घ्यावी लागली. जीन ला शोधण्याची मोहीम आता संघटनेतील साऱ्या तरुण सभासदांनी आपल्या हाती घेतली. चँग च्या या शोध मोहिमेला अखेर तिसऱ्या दिवशी यश आले आणि अशाच एका पिंजऱ्यात हतबल, घाबरून गेलेला जीन सापडला. 'सेव्ह डॉग्स' संघटने मुळे जीन सोबत दोनशे कुत्र्यांना सोडवण्यात आले. जीन पुन्हा घरी आल्याने चँग फार खुश झाला.
          पण चँग चा लाडका जीन  आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो चँग ला ओळखत सुद्धा नव्हता उलट त्याच्यावर भुंकत रहायचा. जीन ला कधी नव्हे ते दोरखंडाने बांधून ठेवावे लागत होते. दोन दिवसानंतर तर परिस्थिती ईतकी गंभीर झाली की, जीन दिसेल त्याला चावण्यासाठी अंगावर धावायला लागला. दोरखंडाला हिसका दिल्याने मानेवर गंभीर जखमा होऊ लागल्या होत्या. तो काहीच खात नव्हता. त्याचे डोळे लालभडक झाले होते, दात सतत बाहेर विचकत होते, अंगावरचे केस झडायला लागले होते, स्वतःच्या शरीरावर स्वतःच नखांनी ओरखडे काढल्याने ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्या जखमांमधून वाहणारे रक्त जीन दिवसभर चाटत बसे. त्याची अवस्था पाहून चँग ला अंदाज आला की बहुदा जीन ला रेबिस तर झाला नसावा..? परंतु आपली शंका खोटी निघावी या आशेने त्याने डॉक्टरला बोलावले. जीन ला खरोखरच रेबिस झाल्याचे निदान समोर आले आणि दुसऱ्याच दिवशी त्याने प्राण सोडला. या साऱ्या घटनेचा चँग वर असा काही विपरित परिणाम झाला की, 'डॉग फेस्टिव्हल' च्या तिरस्काराने तो पेटून उठला. मनात काहीतरी भयंकर विचार आकार घेऊ लागले. चँग ने एका परीक्षा नळीत जीन च्या रक्ताचा नमुना सांभाळून फ्रीज केला आणि मगच त्याचे शव जाळले. 
         मनात ठरवल्या नुसार चँग ने आपल्या लॅब मध्ये व्हायरॉलॉजीचे ज्ञान आजमावण्यास सुरुवात केली. 'डॉग फेस्टिव्हल' मध्ये असे बरेचसे कुत्रे रेबिस ने बाधित असणार यात आता शंकाच नव्हती. पण ईतर प्राण्यांचे काय ? अशा आजारी प्राण्यांचे मांस खाण्यात आल्यास कोणत्या प्रकारचा व्हायरस बनू शकतो ? आणि त्याचे माणसावर काय परिणाम होऊ शकतात ? यावर चँगचे रिसर्च कार्य सुरू झाले. मांजरी मध्ये एनसेफलाईटीस, टॉक्झोप्लाझमोसिस ची लक्षणे विविध व्हायरस मुळे आढळली, टॉक्झोप्लाझमा गोंडीआय हा व्हायरस चँग ने मिट मार्केट मध्ये मिळणाऱ्या मांजरीच्या मांसातून मिळवला. बंदी आणून देखील ब्लॅक मार्केटमध्ये अजूनही मिळणारे वादग्रस्त वाटवाघळाचे मांस ज्यातील प्राणघातक इन्फ्लुएंझा सी व्हायरस वारंवार मानवाच्या जीवनाशी खेळत आला आहे. चँग ने या साऱ्या व्हायरस चे परीक्षण करून एक आरएनए पॅटर्न तयार केला. जवळपास वर्षभराने रेबिस, इन्फ्लुएंझा हायब्रीड व्हायरस आकार घेऊन पूर्ण झाला होता. परंतु चँग एवढ्यावर थांबला नाही. मुक्या जनावरांच्या वेदनेला न्याय देण्यासाठी त्याने इबोला व्हायरस च्या आरएनए सह हा हायब्रीड व्हायरस मोडीफाय केला आणि तयार झाला 'एक्स व्हायरस'.
             आता वेळ आली होती त्याच्या टेस्ट ची. ज्याचे घातक परिणाम चँग ला ठाऊक असल्याने यावर अँटी डॉट तयार करून ठेवणे गरजेचे होते. लॅब मधील उंदरांवर यशस्वी परीक्षण पार पडले. आता ठरवले तसे अंमलात आणणे गरजेचे होते. या चिंतेने तो अस्वस्थ झाला. त्याची ही अस्वस्थता त्याच्या वृद्ध वडिलांच्या थकलेल्या डोळ्यांनी हेरली. आपल्या लाडक्या जीन सोबत जे घडले त्याचे दुःख चँग च्या वडिलांना देखील तितकेच होते कारण चँग च्या आईने ते सोनेरी रंगाचे कुत्र्याचे पिल्लू घरात आणले होते आणि मोठ्या प्रेमाने त्याचे नाव जीन ठेवले होते. बऱ्याच गोड आठवणी जीन शी जोडलेल्या होत्या. 'डॉग फेस्टिव्हल' पूर्णपणे उध्वस्त करून कायमचे बंद करून टाकण्यावर एकच उपाय दिसत होता तो म्हणजे हा एक्स व्हायरस डिसीज फेस्टिव्हल मध्ये संक्रमित करणे. पण हा काम कसे करेल याचा केवळ अंदाज असून उपयोग नव्हता. एक्स व्हायरस मानवी सेल्स ला कशाप्रकारे म्युटेट करत आपले रूप दाखवेल हे प्रत्यक्ष कृतीत आणण्या आधी आजमावणे गरजेचे होती. म्हणजे एखाद्या मानवी देहावर प्रयोग होणे महत्त्वाचे होते. चँग ची ही चिंता अखेर त्याच्या वडिलांनीच दूर केली. त्यांनी स्वेच्छेने स्वतःवर परीक्षण करण्यास तयारी दर्शवली. कारण असेही त्यांचे कितीसे दिवस उरले होते ? मात्र याला चँग चा नकार कायम होता पण फेस्टिव्हल चा दिवस जवळ येत होता हे पाहून वडिलांच्या हट्टापायी चँग हे परीक्षण करण्यास तयार झाला. त्याने सर्वात आधी वडिलांना दोरखंडाने बांधून ठेवले आणि एक्स व्हायरस त्यांच्या शरीरात इंजेक्ट केला. परिणाम काहीच दिसत नव्हता. चँग हताश झाला. मात्र तीन ते चार तासानंतर चँग चे वडील आक्रमक झाले, त्यांची मेमरी पूर्णपणे नष्ट झाली होती. ते आता त्याचे प्रेमळ पिता राहिले नव्हते, तर एक क्रूर मांसभक्षी जिवंत राक्षस बनले. त्यांच्या त्वचेच्या रंध्रांतून हळूहळू रक्त वाहू लागले, डोळे लालभडक, दात खाण्यासाठी शिवशिवत होते, दोरखंडातून स्वतःला सोडवण्यासाठी ते हिसका देऊ लागले, अवघ्या चोवीस तासात त्यांचे शरीर सडायला लागले, दुर्गंधी खोलीत पसरत गेली, भुकेने तोंडातून लाळ गळू लागली, तरीही मेंदूवर एक्स व्हायरस चा पगडा असल्याने बॉडी डिकंपोझ होत असली तरी मृत्यू येत नव्हता. केवळ मेंदूचा हायपोथालेमस हा भाग सक्रिय होता. भुके व्यतिरिक्त दुसरे काहीच सुचत नव्हते, शरीरावरील मृत पेशींवर फंगस आल्याने त्वचा कोरडी होऊ लागली ठिकठिकाणी तिला तडे जाऊन त्यातून पस येऊ लागला. अंती हे सारे पहाणे चँग ला असह्य झाले आणि त्याने ताबडतोब त्यांना अँटी डॉट दिला परंतु परिणाम शून्य. शेवटी त्याने वडिलांच्या छातीत सुरा खुपसला तरीही ते जिवंत होते. त्यांच्या साऱ्या संवेदना मेल्या होत्या. चँग ला यावरून लक्षात आले की एक्स व्हायरस इन्फेक्टेड पर्सन ला लस देऊन वाचवता येऊ शकत नाही. मृत्यू हाच एकमेव पर्याय आहे तोही डोक्यावर वार केला तरच अशा व्यक्तीस मारता येणे शक्य आहे. अखेर त्यांच्या डोक्यावर हातोडी ने वार करीत त्यांची या जीवघेण्या यातनेतून चँग ने सुटका केली. त्यांचे मरण वाया जाऊ द्यायचे नाही. या हेतूने चँग ने 'सेव्ह डॉग्स' च्या सर्व सभासदांना बोलावून घेतले आणि आपला मनसुबा उघड केला. सर्वानुमते 'डॉग फेस्टिव्हल' बंद करण्यासाठी हा उपाय योग्य असल्याचे ठरले. आणि इथूनच चँग च्या सिक्रेट आर्मी चा उदय झाला. सर्व सभासदांचे लसीकरण करण्यात आले. आणि ही आर्मी एक्स व्हायरस च्या संक्रमणासाठी सज्ज झाली.
         पुन्हा एकदा 21 जून 2023, 'डॉग फेस्टिव्हल' चा दिवस उजाडला. ठरल्या नुसार फेस्टिव्हलमध्ये भर गर्दी च्या वेळी एक्स व्हायरसचे संक्रमण करण्यात आले. आणि त्यानंतर युलीन मध्ये जे मृत्यू चे तांडव सुरू झाले ते काही केल्या थांबायचे नाव घेईना. काही तासांत माणसे माणसांनाच खाऊ लागली. झोंबी बनली. एक्स इन्फेक्टेड दुसऱ्याला चावला की तोही झोंबी बनू लागायचा. अशी ही भुकेसाठी राक्षस बनलेली माणसे एकमेकांची शिकार करू लागली.  यातून मुकी जनावरे बचावली. माणूस माणसाच्याच रक्तासाठी वेडापिसा झाला.
         अखेर चायनीज सरकार समोर चँग ने लसीकरणाचा प्रस्ताव मांडला. त्याचे परीक्षण देखील घेण्यात आले. लस दिलेल्या व्यक्तीला झोंबी ने चावा घेतला तरी ती व्यक्ती संक्रमित होत नाही याची खात्री झाल्यावर चँग कडे लसीकरणाचे पॅटर्न मागण्यात आले. पण सर्व हक्क चँग ने स्वतःकडे ठेवले. ते मिळवण्यासाठी सरकारने आधी प्रेमाने त्याच्याशी बोलणी केली, मग त्याला धमकावण्या देखील येऊ लागल्या. तरीही चँग आपल्या वक्तव्यावर अटळ होता. सरतेशेवटी सरकार सोबत एक करार करण्यात आला ज्यात चँग च्या अशाप्रकारे काही अटी होत्या की, "डॉग फेस्टिव्हल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. तसेच जंगली, पाळीव जनावरांची कत्तल थांबवण्यात यावी. जनावरांची कत्तल कायद्याने गुन्हा म्हणून घोषित व्हावे. तसे न झाल्यास भविष्यात कधीही एक्स व्हायरस चे संक्रमण होऊ शकते. मी जिंवत असो वा नसो. जनावरांच्या हितासाठी माझे हितचिंतक सदैव तत्पर असतील. आणि माझ्या सिक्रेट आर्मी च्या  प्रत्येक सभासदाकडे एक्स व्हायरस चे नमुने सांभाळून ठेवले गेले आहेत. जे जगभरात पसरले आहेत. त्यांना कोणीही पकडू शकत नाही. करार ज्या दिवशी मॉडेल एक्स व्हायरस चे रौद्ररूप त्या दिवशी पुन्हा जगाला दिसेल. लसीकरण या अटींवर करण्यात येईल. आणि हे संक्रमण केवळ या अटींवरच थांबविण्यात येत आहे." सरकार सोबत केल्या गेलेल्या या करारानुसार चायना मध्ये चँग ली कायदा लागू झाला जो मुक्या जनावरांच्या हितासाठी राबविला जाऊ लागला. एक्स व्हायरस इन्फेक्टेड हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला परंतु ही आपदा केवळ चीन पुरती मर्यादित राहिली. लसीकरण चँग च्या निदर्शनाखाली त्याच्या संस्थेतील मेंबर्सनीच पार पाडले. व्हायरॉलॉजी रिसर्च सेंटर च्या अध्यक्षपदी चँग ली यांची नियुक्ती झाली असली तरीही त्यांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण केले आणि अधिकृतपणे व्हायरॉलॉजिस्ट म्हणून नावारूपाला आले. एक्स व्हायरस हे मात्र एक न उमजणारे कोडेच राहिले. 
           आयुष्यभर चँग मुक्या जनावरांच्या सुरक्षे साठी झटला. त्याचे कुटुंब म्हणजे ही 'सेव्ह डॉग्स' संस्था होती. आणि यातच काही सिक्रेट विश्वासू मेंबर्स होते. त्याने कधी लग्न केले नाही. चँग चे वय आता वृद्धापकाळाने थकत जाऊ लागले. आणि एका रात्री अचानक प्रकाशाचा दैदिप्यमान झोत चँग च्या दालनातील उघड्या खिडकीतून आत शिरला हे रस्त्यावरन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने पाहिले. तो जसा आला तसाच काही मिनिटांत निघूनही गेला. चँग चे सोबती घाबरून दरवाज्या वर थापा मारू लागले. चँग ने कसाबसा दरवाजा उघडला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट साऱ्यांनी पाहिले. तो केवळ एवढेच म्हणाला, की, "लोक आपली भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे काही सोडणार नाहीत. ही लज्जास्पद बाब आहे."
         या घटनेनंतर एक्स व्हायरस च्या लसीकरणाचा लिखित पॅटर्न आणि अँटी डॉट याबाबत कोणी विचारणा केल्यास चँग हसत सांगायचं की ते अशा सुरक्षित हातात सोपवले गेले आहे की, भविष्यात येणाऱ्या संकटाला तोंड देता येईल. ही घटना घडली 2067 साली आणि त्यानंतर महिन्याभरात हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. आणि एक्स व्हायरस बद्दल हळूहळू लोकांना विसरही पडला.

साल - 2079
चँग यांचे आत्मचरित्र एव्हाना सर्वच शास्त्रज्ञ कोळून प्यायले होते. परंतु एक्स व्हायरस च्या अँटी डॉट चा उलगडा काहिकेल्या होईना. एव्हाना एलियन टेक्नॉलॉजी हाती आल्याने टाइम मशीन वरील काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असल्याची बातमी कानावर आली आणि लॅब मध्ये सर्वांनाच थोडे हायसे वाटले. क्वांटम फिझिसिस्ट नचिकेत चा व्हिडीओ कॉल सारेच व्हर्च्युअल स्क्रीन वर पाहू लागले. टाइम मशीन बनून सज्ज होती टेस्ट देखिल केल्या गेल्या होत्या. आता ठरवल्यानुसार तिचा वापर करून 2067 सालात जाऊन सर चँग ली यांना भेटून सध्याची म्हणजेच त्यांच्यासाठी भविष्यातली एक्स व्हायरस मुळे झालेली भयंकर परिस्थिती त्यांना पटवून द्यायची आणि कोणत्याही परिस्थितीत अँटी डॉट मिळवायचा. पण टाईम मशीनमध्ये अजून माणसाचे परीक्षण केले गेले नव्हते. तसे करण्यास उच्च अधिकाऱ्यांची परवानगी देखील नव्हती. त्यामुळे ही जबाबदारी स्वतःहून डॉ. जॅक ने आपल्याकडे घेतली. तो एक रोबोट असल्याने काही तांत्रिक बिघाड झालाच तर त्याला तो ठीक ही करू शकेल यावर सर्वानुमते होकार मिळाला. चैतन्य यावेळी हळवा झाला होता. जॅकला मिठी मारत त्याने 'सुरक्षित परत येण्याचे त्याच्याकडून वचन घेतले.' चैतन्य ची पाठ थोपटत जॅक 2067 सालात चँग ला भेटायला जायला निघाला. त्याच्या चिपमध्ये स्थळ, काळ, वेळ फिक्स केली गेली. टाईम मशीनशी जॅक चा कॉन्शस कनेक्ट करण्यात आला. केवळ चाळीस सेकंदात जॅक तिथे पोहोचणार होता आणि तेथे जे घडेल ते ईथे साऱ्यांना दिसणार देखील होते. लाईव्ह फुटेज येताच जॅक झोंबीज मुळे जगाची सध्या जगाची जी परिस्थिती झाली आहे याचे दारुण चित्र आपल्या डिस्प्ले वर चँग ना दाखवणार होता. आणि  अँटी डॉट बद्दल बोलणार होता. या साऱ्या साठी त्याच्याकडे केवळ 45 मिनिटे होती. जॅक रेडी झाला तसे त्याला स्पेस लॅबमध्ये नेण्यात आले. तिकडे नचिकेत ने जॅकला सारे समजावून सांगितले आणि बघता क्षणी जॅक प्रकाशाच्या झोतात गायब झाला. जॅक चँग ली यांच्या भव्य दालनातील उघड्या खिडकीतून आत शिरला. त्याला पाहताच चँग आश्चर्या ने थक्क झाले. जॅक कडे वेळ नसल्याने त्याने 2079 ची सद्यस्थिती त्यांना दाखवली आणि संपूर्ण पृथ्वीवर केवळ मोजून बावीस करोड लोक वाचले आहेत. जर अँटी डॉट वेळेत नाही मिळाला तर मानवाचा नाश निश्चित आहे. याचा संपूर्ण देखावा चँग ना दाखविण्यात आला जो पाहून सारासार विचार करत चँग नी  एक्स व्हायरस च्या लसीकरणाचा लिखित पॅटर्न आणि अँटी डॉट जॅकच्या हवाली केले. त्यांचे आभार मानत जॅक प्रकाशाच्या वेगाने परत आला. साऱ्यांचे चेहरे खुलले होते. एकमेकांना चिअर करत वेगाने अँटी डॉट वर काम सुरू झाले. पहिल्या एक हजार लसी बनून तयार होताच त्याची चाचणी करण्यात आली. झोंबीनी चावले तरी इन्फेक्शन होत नाही हे सिद्ध झाले आणि आधी लॅब मधील सर्वांना लसीकरण करण्यात आले. 
             एक्स व्हायरस पीडित झोंबीज एक सरळ रेषेत चालू शकत होते, ते दार उघडणे, पायऱ्या चढणे, असे काही करण्यास असमर्थ होते. दिवसा ते बेसमेंट, पार्किंग लॉट अशा ठिकाणी काळोखात लपून राहत आणि रात्र होताच ते बाहेर पडत. आवाज आणि रक्ताच्या वासाने ते खेचले जात. त्यामुळे सायरन चा आवाज करीत ड्रोन च्या सहाय्याने हजारो झोंबींना मोठ्या पटांगणात एकत्रित केले जाऊ लागले आणि एअर फोर्स च्या मदतीने दररोज हजारो, लाखोंच्या संख्येत एक्स व्हायरस इन्फेक्टेड झोंबीज ना थेट डोक्यात गोळी घालून ठार करण्यात येऊ लागले. जवळपास महिनाभर हे काम सुरू राहीले. प्रदुषण वाचविण्यासाठी मृतांचे देह स्पेस स्टेशनवर  नेऊन तेथेच गॅस चेंबरमध्ये भस्मसात करण्यात आले. लोक हळूहळू आपल्या घरांतून बाहेर येऊ लागले. त्यांना लसीकरण केले जाऊ लागले. या भीषण महामारीत प्रत्येक घरातील लोकांनी आपापल्या परिजनास गमावले होते. विश्व पुन्हा सुरळीत होण्यास कंबर कसून उभे राहिले.
             करारानुसार 'डॉग फेस्टिव्हल' कित्येक वर्षे बंद झाले होते. मग यावेळी एक्स व्हायरस चे संक्रमण का झाले असावे..? कुठेतरी, कोणीतरी नियम मोडला होता एवढे मात्र निश्चित... कारण जाणून घेण्यासाठी जगभरातुन रोबोटिक्स स्पाय एजंट्स शोधायला बाहेर पडले की, मुक्या जनावरांच्या बाबतीत कोण अक्षम्य अपराध करीत आहे..? त्याला कठोर शिक्षा ही होणारच. ब्राझील आणि स्पेन मध्ये बैलांचे फेस्टिव्हल, व्हिएतनाम मध्ये पिग स्लॉटर फेस्टिव्हल (डुकरांची कत्तल), आणि कितीही प्रयत्न केले तरी सुधारणा न होणारा पुन्हा एकदा चीन...!! मांजरींची आणि कुत्र्यांची कत्तल लपून छपून होत असल्याचे उघड झाले. अशा राक्षसी वृत्तीचा नाश होणे कठीण म्हणूनच रोबोट आर्मीला असा गुन्हा करणारे आढळल्यास 'शूट अॅट साईट' ची ऑर्डर दिली गेली.....माणसाच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अजून किती मुक्या जीवांची कत्तल होत रहाणार ? मानवाच्या साऱ्या संवेदना ईतक्या बोथट होत चालल्या आहेत. की, त्यांना एखाद्या जिवंत प्राण्याची वेदना समजू नये..???
        
          


        
          

***