काख

काख

ऑफिसात आल्या आल्याचं मी माझ्या केबिनमध्ये शिरलो. समोरच्या भिंतीवर असलेल्या दत्तगुरूंच्या तसबिरीवरचा सुकलेला हार काढून नेहमीच्या सवयी प्रमाणे ताज्या फुलांचा हार चढवला व अगरबत्ती पेटवली. गुरूंचे स्मरण करीत हात जोडले. मला माहित होतं नेहमीप्रमाणे आजही माझी मदतनीस नीना केबिनच्या दाराच्या चौकटीत माझी देवपूजा आटोपण्याची वाट पहात उभी असणार. तिच्याकडे कटाक्ष न टाकताच मी तिला आत येण्यास सांगितले. आत येताच तिने माझ्या दिवसभराच्या कामाचं वेळापत्रक हातात सोपवलं, आणि छापण्यासाठी आलेल्या स्क्रिप्टस् , कादंबऱ्यांच्या टाईप केलेल्या काही कॉपीज् तसेच मॅन्यु स्क्रिप्टस् म्हणजे हस्तलिखितांचे भेंडोळे माझ्यासमोर ठेवले. प्रसिद्ध भयकथा लेखक श्री. जी. बी. अघोरी मला भेटायला ठीक अकरा वाजता येणार असल्याचे सांगून ती निघून गेली. मी दिवसभराच्या कामांचा आढावा घेत समोर ठेवलेल्या कादंबऱ्यांच्या कॉपीज् चाळायला सुरुवात केली. तेच तेच विषय, तेच सामाजिक मानसिक नाट्य, त्याच समस्या, तीच दुःख आणि तेच मानवी भाव भावनांचे कल्लोळ. या व्यतिरिक्त त्या कादंबऱ्यांत काहीच नवीन नव्हते. वैतागून मी आता ठारवून टाकले होते की यापुढे अशा कादंबऱ्या मुळीच प्रकाशित करायच्या नाहीत. कितीही झालं तरी वाचकांना सतत नवीन विषयांवरील कादंबऱ्या देणाऱ्या निवडक प्रकाशकांमध्ये माझे नाव अग्र क्रमांकावर होते आणि हि माझी ख्याती मला ढासळू द्यायची नव्हती. मी राघवेंद्र सबनीस एक यशस्वी प्रकाशक. कुठल्याही कादंबरीचा वेगळेपणा लक्षात घेऊनच त्या छापणे आणि वाचकाला हवे असलेले शब्दांचे, कल्पनांचे नवनवीन खाद्य पुरवणे हेच तर माझं वैशिष्ठ्य होतं. असा स्वतः बद्दल अभिमानाने विचार करीत असतानाच जाड काळ्या पेपर मध्ये पॅक केलेल्या एका पॅकेट कडे माझे लक्ष गेले. त्यावर नाव नव्हते. फक्त माझ्या ऑफिसचा हा पत्ता. मी वेळ न दवडता उत्सुकतेने पटापट कव्हर पेपर फाडून टाकला. त्यात एक ठळक अक्षरातील हस्तलिखित होते. कागद थोडे जुनाट वाटत होते. पण लिखाण नुकतेच केल्या सारखे होते. मी ते हातात घेऊन चाळू लागलो. त्या कादंबरीचे शिर्षकच मोठे गंमतीदार आणि विचित्र वाटले. मानवी शरीरावरील ज्या भागाकडे आपले फारसे लक्ष नसते, जो भाग आपल्याला तितकासा आवडत हि नाही. नेमका तो भाग म्हणजे या कादंबरीचे शीर्षक होते. ते म्हणजे 'काख'..! पण लेखकाने या कादंबरीला काख हेच शीर्षक का बरं दिलं असावं? एवढं काय असेल या कथानकात? मी उत्सुकतेपोटी ते हस्तलिखित घेतलं आणि आधी लेखकाचे नाव शोधू लागलो. पण त्यावर काख कादंबरीच्या लेखकाचे नाव किंवा पत्ता काहीच नव्हते. कुणी पाठवली असेल हि कादंबरी. छापून आल्यास मिळणारा मोबदला, प्रसिद्धी कुणाला नको असते का?

आता मात्र काख वाचण्याचा मोह मला आवरेना. कदाचित हि कादंबरी छापून आल्यास लेखक स्वतः संपर्क साधेलच. मी काखच्या विचारचक्रात पूर्णपणे बुडून गेलो होतो. एवढ्यात नीना च्या आवाजाने मी भानावर आलो.

"सर, ते भुताखेतांवर कादंबऱ्या लिहिणारे जी.बी.अघोरी आले आहेत तुम्हाला भेटायला. त्यांना आत पाठवू ?" एवढेच बोलून माझ्या उत्तराची वाट पहात ती थांबली. त्या अघोरी लेखकाला आत पाठवायला सांगून मी ती काखची मॅन्यु स्क्रिप्ट माझ्या ब्रिफकेस मध्ये ठेऊन दिली.

संध्याकाळी जरा लवकरच मी घरी परतलो. आज दुपार पासूनच उजवा खांदा दुखत असल्याने मी थोडासा बेचैनच होतो. त्यामुळे ऑफिसातून निघतानाच मी ठरवून टाकलं होतं कि, घरी गेल्या गेल्या फ्रेश होऊन सरळ झोपून द्यायचं. पण घरी येताच मंजुचे सतरा प्रश्न सुरु झाले. मी झोपायला गेलो तर तिचा पहिलाच प्रश्न माझ्या कानावर आदळला, "अहो..! काय झालं तुम्हाला ? असे भलत्यावेळी झोपताय ते?"

खांदा दुखत असल्याचं सांगताच पटापट ती पुढे विचारतच गेली, "आता खांदा कशाने दुखतोय तुमचा? नीट आठवा तरी, काल रात्री एका कुशीवर झोपला होतात का? कि कुठे आपटलात?नाहीतर कशाचा धक्का वगैरे लागला असेल." तिच्या या बोलण्यावर मी मस्करीत बोललो, "हो ! सकाळी ऑफिसात जायला निघालो तेव्हा तुझाच धक्का लागला असेल." मी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी असं बोललो पण आश्चर्य म्हणजे ती आज रागावली नाही. एरव्ही मात्र मी तिच्या जाडेपणा बद्दल थोडी जरी थट्टा केली तर ती अख्ख घर डोक्यावर घ्यायची. पण आज कदाचित माझी तब्येत ठीक नाही म्हणून ती रागावली नसेल. अजूनही तीचं एकच पालुपद सुरु होतं. "खांदा कशाने दुखतोय ते नीट आठवा." आता ते आठवून काय तो बरा होणार होता का? दुखत होता एवढंच काय ते मला कळत होतं. पण तिचे ते तर्क, ते प्रश्न ऐकून खांदा तर सोडाच पण आता मात्र माझं डोकं दुखायला लागेलसं मला वाटू लागलं. झोप तर केव्हाचीच पळून गेली होती. मंजुने खांद्याला आयोडेक्स चोळून दिलं. बर्फ़ाचा शेक दिला. हे करताना तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. दुखणं माझं पण वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. क्षणभरात विचार आला की, किती प्रेम करते मंजू माझ्यावर.! अशी काळजी घेणारी प्रेमळ पत्नी मला लाभली हे हि नसे थोडके. मुलं काय ! असतील नशिबात तर होतील. नाहीतर नाही. घरात आम्ही दोघंच असलो तरी हिच्या अशा बडबडण्यानेच घर कसं भरल्यासारखं वाटायचं.

आता मात्र आराम करणं अशक्यच होतं. मी सरळ उठलो ब्रिफकेस उघडून आतली 'काख'ची मॅन्युस्क्रिप्ट बाहेर काढली. या क्षणी ती कादंबरी वाचण्याचा मोह मला अधिकच होऊ लागला. कारण मंजू मला वाचताना कधीच डिस्टर्ब करत नसे. उलट घर शांत ठेवण्याचाच प्रयत्न करायची. तिच्या मते या छापण्याकरिता येणाऱ्या कादंबऱ्या म्हणजेच आमच्या घरातील लक्ष्मी होती. तेव्हा या कादंबऱ्या वाचताना अडवणं म्हणजे घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडवण्यासारखं होतं. तिचंहि खरंच होतं म्हणा, एक प्रकाशक या नात्याने कादंबऱ्या, पुस्तकं प्रकाशित करणं हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय होता. तेव्हा असे काही वाचन करताना ती मला अजिबात हटकत नसे. मी 'काख' चाळायला सुरुवात केली. त्यातल्या एकेक शब्दाने जणू माझी पकड घेतली. क्षणभर वाटले मी माझा उरलोच नाही. वेगळ्याच विश्वात गेलो. सत्य-असत्याच्या भ्रमात गुरफटला जात होतो. माझ्या छातीचे ठोके मला जाणवत होते. वाचता वाचता मी रंगून गेलो. मंत्रमुग्ध होऊन पुढे पुढे वाचतच गेलो.

....सकाळी बँकेत गेलो. बॅगेतून चेकबुक काढलं. हातात पेन धरलं पण, लिहिण्या इतका हातात जोरच नव्हता. प्रयत्न करून पाहिला पण खांद्यातली कळ हातात आणि हातातून मेंदू पर्यंत झिणझिण्या देऊन गेली. मग मी तो लिहिण्याचा वेडा अट्टाहास थांबवला आणि चेकबुक बॅगेत ठेऊन तसाच घरी परतलो. एव्हाना हाताचं दुखणं खूपच वाढलं होतं. घरात येताच आईस बॅग खांद्यावर ठेवली. थोडंफार बरं वाटलं.

दिवसेंदिवस दुखणे वाढतच चालले होते. सतराशे साठ डॉक्टर्स, वैद्य, गल्ली-बोळ्यातले हकीम, जो जे काही सांगेल ते सारे उपाय करून झाले. परिणाम मात्र शून्य. एक्स-रे रिपोर्टस् देखील नॉर्मल आले. गोळ्यांचा तर काहीच उपयोग होत नसल्याने त्या घेणे मी बंदच करून टाकले. बायकोने मग बाहेरची काही बाधा असेल या संशयाने कुठल्याशा बाबाकडे मला नेले. मंत्र-तंत्र, गंडे-दोरे हे प्रकार देखील करून पाहिले. पण फरक काहीच पडेना. या दुखण्याने मी पुरता वैतागून गेलो. हाताचे हे दुखणे खांद्याच्या दुखण्याने सुरु झाले खरे पण आता काखेतून कळा येऊ लागल्याने मला धड कार देखील चालवणे कठीण होऊ लागले. स्टेअरिंगवर ताबाच रहात नसे. काखेत गाठ यावी तसे ते दुखणे होते पण गाठ मात्र कुठेही दिसत नव्हती. उजवा खांदा थोडा उंच करूनच चालावे लागत असल्याने रस्त्यातून चालणेहि कठीण होऊन बसले. घरातून बाहेर पडायचीच मला लाज वाटू लागली आणि नॉर्मल हात ठेवण्याचा प्रयत्न केला तर काखेतून असह्य कळा येऊ लागायच्या.

एक दिवस याच दुखण्याने पछाडलेल्या अवस्थेत मी ऑफिसात माझ्या केबिनमध्ये बसलो असताना अचानक माझा शर्ट काखेत ओढला जाऊ लागला. मी एकसारखा तो बाहेर ओढून काढत होतो आणि तो आपला एकसारखा काखेतच शिरत होता. सरतेशेवटी त्या गोंधळलेल्या अवस्थेतच मी घर गाठले. बायकोने मला असे यावेळी घरी आल्याचे पहाताच लवकर येण्याचे कारण विचारले. पण तिला काहीच उत्तर न देता मी तडक बाथरूम मध्ये शिरलो. अंगातला शर्ट पटापट काढून फेकला. उजवा हात वर करून आरशात पाहिले. डोळ्यांवर विश्वास बसेना. माझ्या काखेत लिबलिबीत ओठांचा आकार उमटला होता. मधोमध आपल्या तोंडाप्रमाणेच फट तयार झाली होती. मी जसजसा हात वर करीत गेलो तसतसे ते ओठ एकमेकांपासून विलग होत गेले आणि आपण देतो तशीच जांभई त्यांनी दिली. ते पाहून मी हादरलोच. माझे सर्वांग थंडगार पडले, माथ्यावरील घामाचे थेंब थरथरून वाहू लागले. अभद्र भीतीच्या शहाऱ्याने मस्तक गोठून गेले. उरला सुरला मनाचा धीटपणा एकत्र करत डाव्या हाताच्या बोटाने त्या ओठांना स्पर्श केला. बोट जवळ नेताच एखादया नवजात शिशुने आपल्या मातेचे स्तन चोखावे तसेच ते ओठ माझे बोट चोखू लागले. ओठांच्या त्या किळसवाण्या बुळबुळीत स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. या ओठांमुळेच आज इतके दिवस मला हे हाताचे दुखणे त्रास देत होते तर! पण आज माझ्या काखेत हे ओठ फुटलेत उद्या कदाचित त्यात दातही येतील. परमेश्वरा..! मी त्याच भान हरपलेल्या स्थितीत बाथरुम बाहेर आलो आणि बायकोला हात वर करून ते ओठ दाखवू लागलो. मला क्षणात सारे ब्रह्मांड आठवले. पण दुसऱ्याच क्षणी काखेत ओठ दिसणे हा निव्वळ माझा भास असल्याचे सिद्ध झाले. मी हात वर करून दाखवताच ती म्हणाली, "कुठे काय? इथे तर कसलाच व्रण दिसत नाहीय उगाच काय बरळताय? अहो ! ओठांचा आकार सोडा साधा ओरखडा देखील नाहीय. काहीतरीच असतं तुमचं. चेष्टा करताय कि काय माझी?"

ती हसत हसतच स्वयंपाक घरात निघून गेली. मी पुन्हा आरशात पाहिले, ते ओठ तिथेच होते. अगदी स्पष्ट तोंड. हिला ते का दिसत नाहीत? मी आश्चर्य आणि भीती या संभ्रमात गोंधळून गेलो.

त्या ओठांमुळे होणारा त्रास जसजसा वाढत होता तसतशी माझ्या छातीत धडधड वाढत होती. काळीज फाटून बाहेर पडतंय की काय असे वाटू लागले. बगलेत त्या ओठांचा स्पर्श मला स्पष्टपणे जाणवत होता. दुपारी ऑफिसात शिपायाचं लक्ष गेलं, "साहेब ! तुमचा शर्ट एकाच बाजूने काखेत केवढा भिजलाय." - मी दचकून पाहिलं तर खरंच माझा शर्ट उजव्या बाजूच्या काखेतून चिंब भिजून अंगाला चिकटला होता. पण तो घामाने निश्चितच भिजला नव्हता. केबिन मधला एसी चालू असताना घाम येणं शक्यच नव्हतं. मी माझ्या केबिनमध्ये स्वतःला कोंडून घेतलं. आणि शर्ट काढून आरशात पाहिलं. माझ्या काखेतले ते ओठ किंचित हसल्यासारखे भासले. त्या ओठांतून एकसारखी लाळ गळत होती. आतून वळवळणारी जीभ माझा हात चाटत होती. त्या गळणाऱ्या लाळेमुळे माझे शर्ट ओले झाले होते. शी..! मला स्वतःचीच किळस वाटली. सरतेशेवटी मी ठरवलं या काखेचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय ऑफिसात यायचे नाही.

त्याच दिवशी संध्याकाळी आधी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घडत असलेला सारा प्रकार सांगितला. पण ते हसतच राहिले. माझ्या काखेत तपासले. तिथे काहीच झालेले नव्हते. त्यांनी कंप्लिट चेकअप करून हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्याचं सांगून वीतभर प्रिस्क्रिप्शन आणि स्वतः जवळच्या रंगीबेरंगी गोळ्यांचं पुडकं माझ्या हातात दिलं. "हायपर टेन्शन! काळजी करू नका. जास्त विचार केल्याने होतं असं कधीकधी." असा सल्ला देत क्लिनिकच्या दरवाजापर्यंत मला सोडलं. आता त्यांनी मला सोडलं कि बाहेर हाकलून दिलं कुणास ठाऊक? मी आपला थोबाडात मारल्यासारखा घराकडे परतलो. आता मात्र डोक्यात विचार नव्या त्रासाचा रक्तदाबाचा. हायपर टेन्शन.

मी घरातच जास्तीत जास्त वेळ रहायला लागलो. आता या काखेतील तोंडाचे चाळे थोडेफार कमी व्हायला लागले तसे मी ऑफिसात जाणे पुन्हा सुरु केले. काही दिवस बरे गेले. पण एक दिवस ऑफिसात निघताना हि मला म्हणाली,"काय हो ! हे काय? तुमचं शर्ट तर काखेतून उसवलं आहे. हे घालून का तुम्ही ऑफिसात जाणार?"

मी शर्ट बदलला आणि ऑफिसात आलो. आता काखेत माझा शर्ट चांगलाच अडकून बसलेला ऑफिसातल्या सर्वांनीच पाहिला. मी शर्टाला हिसका देत बाहेर ओढला आणि मोकळेपणाचा आव आणत वावरू लागलो. पण ते नाटक वठवायला मला ठिकसं जमेना. कारण शर्टाला काखेतून एकसारखी ओढ लागली होती. डाव्या हाताने शर्ट खाली ओढत, हिसके देत माझा शर्ट आणि ऑफिसात उरली-सुरली अब्रू वाचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करू लागलो. माझी अशी होणारी तारांबळ सारा स्टाफ पहात होता. पण त्यांना याचे कारण कळत नव्हते. एका जागी शांतपणे उभे राहणे मला आता जड जाऊ लागले. मनात पुन्हा एकदा विचार आला की एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जावे. पण हे ओठ, हा काखेतला विचित्र प्रकार कुणालाच दिसत नव्हता. तो फक्त एकट्याला मलाच दिसत होता. त्यामुळे हि माझ्या एकट्याचीच डोकेदुखी होऊन बसली होती.

संध्याकाळी घरी येईपर्यंत हा शर्ट देखील काखेतून फाटला होता. रोजच्या प्रमाणे आताही मी सरळ बाथरूम मध्ये शिरून काखेला निरखून पाहू लागलो. हि काख अशी तासंतास निरखून पहाणे हा माझ्या नित्यातल्या कामातलाच एक भाग होऊन गेला होता. आरशात पहाताच माझी बुबुळ गोठल्यासारखी स्थिर झाली. शेवटी मला जी शंका होती तेच झालं. त्या ओठांच्या बोळक्यात आता टोकेरी, अणकुचीदार दात आले होते आणि त्यांची वाढ झपाट्याने होत होती. मी घाबरलो. आता काहीतरी विपरीत घडणार, मी मरणार. मी धास्तावलो. डोकं सुन्न झालं, हात-पाय बधिर झाले. चक्रावून गेलो. तसाच बाथरूम बाहेर आलो. मला गरगरत होतं. जिवाच्या आकांताने बायकोला हाका मारल्या. एक हात वर उंच करत काखेतले ते भयंकर तोंड दाखवू लागलो. तिच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य नव्हते. उलट माझ्या बद्दलच्या काळजीने ती चिंताग्रस्त झाल्यासारखी दिसली. ती शांतपणे मला बसवत,पाणी देऊ लागली. मी उद्विग्नपणे कासावीस होत तरीही तिला समजावून सांगत राहिलो. पण,तिच्या चेहऱ्यावरची रेघहि हलली नाही. माझ्या बोलण्यावर तिचा बहुदा विश्वासच नसावा अशी ती माझ्याकडे पहात होती. अखेर मला रडू कोसळलं. तिला बिलगून मी कितीतरी वेळ रडत राहिलो. ती मला सांत्वना देत होती. तिला माझ्या काखेत होणारे भयावह बदल दिसत नव्हते. तिलाच काय पण कुणालाच ते दिसत नसल्याने भ्रमिष्टा सारखा मी गोंधळून गेलो होतो. एकटा पडलो होतो अगदी माणसांच्या गर्दीत सुद्धा ,एकटा ! कसं समजाऊ कुणाला? हा त्रास, हा अविश्वसनीय थरार फक्त मीच अनुभवू शकत होतो आणि हे एकशे एक टक्के सत्य होतं. मी वेडा नाही, हा भास तर मुळीच नाही. अनाकलनीय, विलक्षण सत्य..! माझ्या काखेत तोंड उगवलं आणि ते माझ्याशिवाय कुणालाच दिसत नाही. असं का?

दुसऱ्याच दिवशी माझं काही एक ऐकून न घेता जबरदस्ती बायको एका मानसोपचार तज्ञाकडे घेऊन गेली. पण मला काही वेडं नव्हतं लागलं किंवा माझ्या डोक्यावर मानसिक परिणाम देखील झाला नव्हता. फक्त या साऱ्या विचारांनी, ताण-तणावामुळे रक्तदाब वाढला होता इतकंच. पण एव्हाना माझ्याकडे समाजाचा पहाण्याचा दृष्टिकोण एक 'मनोरुग्ण' म्हणून झाला होता.

त्या मानसोपचार तज्ञाने नाही नाही ते उलट सुलट प्रश्न विचारून मला बेजार केलं. शेवटी शर्ट काढून मी काखेतले ते तोंड त्यांना दाखवले आणि एक हात वर करून बेंबीच्या देठापासून ओरडत त्यांना सांगू लागलो,"पहा ! पहा ! याचाच त्रास होतोय मला. दिसलं का तुम्हाला ? झालं समाधान ? तोंड फुटलंय काखेत माझ्या. कुणीच विश्वास नाही ठेवत माझ्यावर. मी वेडा नाही. हा भ्रम नाही." असे म्हणत हातांच्या ओंजळीत चेहरा खुपसून मी रडत राहिलो. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना कसोशीने आवरण्याचा प्रयत्न करीत राहिलो. माझी बायको डॉक्टरांशी बोलत होती. आत्तापर्यंत घडलेले सारे प्रसंग सांगत होती. मी अंगात पुन्हा शर्ट चढवले. तिच्याकडे माझे लक्षच नव्हते. नेमके त्याच वेळेस काखेतल्या तोंडाने माझा शर्ट खाण्यास प्रारंभ केला. त्या सरशी या संधीचा फायदा घेत मी त्या डॉक्टरला माझ्या शर्टाची दशा दाखवली. पण तेवढ्यात हि माझी डॅम्बीस काख शर्ट खाता खाता थांबली. बगलेत शर्टाला मोठ्ठाले भगदाड पडले होते. ते पहाताच माझ्या बायकोच्या तोंडून कळकळीने शब्द बाहेर पडले, "डॉक्टर पाहिलंत तुम्ही हे हल्ली असेच काखेतून नेहमी स्वतःची शर्ट फाडत असतात. घरातील जवळ पास सारे शर्ट्स काखेतून फाटले तरी आहेत किंवा उसवले तरी आहेत. काहितरी करा डॉक्टर. यांना अखेर काय झालंय तरी काय?"

तिच्या बोलण्याने मला आता फारच संताप आला. अरे..! मी काय ××× आहे? एवढं जीव तोडून हिला सांगतोय आज इतके दिवस कि माझ्या काखेतलं तोंड शर्ट खातं, मला त्रास देतं तरी हिचा माझ्यावर विश्वास नाही? ह्या परक्या डॉक्टरवर हिचा विश्वास ? काय कळतंय त्याला? बोडकं..! माझं काय डोकं फिरलंय का स्वतःची भारी किमतीची शर्टस् फाडायला आणि हा दिडदमडीचा डॉक्टर काय करणार आहे मला मदत? मानसोपचार तज्ञ म्हणे ! अरे ! मानसिक आणि शारीरिक त्रास काय असतो नि कसा असतो ? ते मी सहन करतोय. मलाच ठाऊक या यातना. असह्य..! माझा राग वाढतच चालला होता. जाणवत होतं मला म्हणूनच स्वतःला कसंबस सावरलं. मनातच धुमसत राहिलो. थोड्याच वेळाने डॉक्टरने मला बाहेरच्या रूम मध्ये बसण्यास सांगितले. आता तर मी जामच चवताळलो. ए..! बाबा..! अरे..! पेशंट मी आहे आणि हा डॉक्टर कन्सल्टिंग रूम मध्ये माझ्या बायकोला सोबत बसवून काय तपासणार आहे? कप्पाळ..! पण हे हिला कळायला नको? बायकांना अक्कल नसते म्हणतात तेच खरं. कुठे काय बोलायचं हेच हिला कळत नाही. तरीही मनातल्या मनात चरफडत मी गुपचूप येऊन बाहेर बसलो. हात थोडा जरी जवळ घेतला तरी ते दात मला चांगलेच टोचत होते. शेवटचाच एक प्रयोग करायचे ठरवून, सगळी लाज बाजूला सारून अंगातला शर्ट काढून भिरकावून दिला. तिथे इतर पेशंटस् ची बरीच रांग लागली होती उजवा हात वर करून मी सर्वांच्या समक्ष उघडा उभा राहिलो. हे पहाण्यासाठी की यापैकी कुणालातरी माझ्या काखेतला हा अनाकलनीय, भयंकर प्रकार दिसेल. पण उलटच झाले. सर्वजण मला तसे पाहून घाबरून गेले. तो मानसोपचार तज्ञ माझ्या पत्नी सोबत बाहेर आला. कसलंस औषध, बहुदा गुंगीचं असावं ते सिरींजमध्ये भरून त्याने इशारा केला तत्क्षणी दोघांनी मला धरून माझा प्रतिकार तोकडा पाडला आणि त्याने माझ्या दंडात ती सुई टोचली. काही कळायच्या आत माझ्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार पसरला.

जाग आली तेव्हा पाहिलं मी माझ्या बेडरूम मध्ये माझ्याच बेडवर झोपलो होतो. आमचं पत्नी रत्न त्याच डॉक्टरशी बोलत माझ्या जवळ बसल होतं. हा माझ्या घरात इथे कशाला आला? मला जाग आलेली पहाताच तिच्या चेहऱ्यावर एक निर्विकार हास्य उमटले. मला पूर्णपणे शुद्धीवर आलेलं पहाताच त्या मॅड डॉक्टरने मला तपासलं. बीपी वाढल्याचं सांगितलं. 'नवीन काहीतरी बोल कि मूर्खां...बीपीचा आजार घेऊन आलेलो का तुझ्याकडे?' - पुन्हा असे झाल्यास झोपेची गोळी देण्याचे त्याने बायकोला सुचवले. आमच्या मिसेस् तो बोलतोय ते सर्व काही समजल्यासारखं तिथेच मान डोलवत उभ्या राहिल्या. तो निघाला तशा बाईसाहेब पण त्याच्या मागोमाग गेल्या. त्याला दारापर्यंत सोडायला. पण मी म्हणतो काय गरज होती त्याला तसं सोडायला जायची? उगाचंच त्या हारामखोराला हिरवा सिग्नल दिल्यासारखं. मला बेशुद्ध करून या लांडग्याने हिच्यावर काही जादू तर केली नसेल ना? देव जाणे...

तो गेला... ती माझ्या जवळ येऊन बसली. डोक्यावरून हळुवार हात फिरवू लागली. पण का कोण जाणे तिचा स्पर्श मला नकोसा वाटला. परका वाटला. तिच्या चेहऱ्याच्या जागी मला त्या मानसोपचार तज्ञाचा चेहरा दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित आणि जिंकल्याचा भाव होता. मी त्वेषाने हिचा हात झिडकारला. आणि तोंड फिरवून स्वस्थ पडून राहिलो. माझ्या डोक्यात आता विचारांचे काहूर माजले होते. बायकोचा विचार, त्या डॉक्टरचा विचार, काखेतील तोंडाचा विचार शिवाय माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार आणि याच परिस्थितीत माझ्या मनाने पत्नी बद्दल संशयाचे घर तयार केले. मी आयुष्यातून उठलो. आता सगळं संपलंय. माझा अंत जवळ आलाय. साशंक अवस्थेने पोटात भीतीचा गोळा आला. संपूर्ण गात्रन गात्र शिथिल झाली. विचार करण्याची शक्ती खुंटून गेली. शरीरात जणू चेतनाच उरली नाही. नैराश्याने ग्रासून टाकलं. अखेर मेंदू थकून निद्राधीन कधी झाला ते देखील मला उमगले नाही. खडबडून जागा झालो ते हिच्याच आवाजाने. पण हिच्या आवाजात आता प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नसल्याचे मला प्रखर जाणवले. ती खरोखरंच रागाने बोलत होती. कुणास ठाऊक कधी पासून मला हलवून उठवण्याचा प्रयत्न करीत होती.

"अहो ! उठा ! पहा जरा काय केलंत हे तुम्ही ? केवढं मोठ्ठ भगदाड पाडून ठेवलंत हे गादीला.नवीन बेडशीटच्या काय ह्या चिंध्या करून टाकल्यात तुम्ही."

हिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसेना. मी उठून पाहिले तर खरोखरीच माझ्या उजव्या कुशीकडील भागातील गादी माझ्या काखेने अक्षरशः पिंजून काढली होती. बेडशीट देखील फाटून गेली होती. उगाच त्रागा न करता मी निर्विकारपणे उठलो. तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळत तसाच पायात चप्पल चढवून बाहेर पडलो. आता या वेळी आक्रस्ताळेपणा करण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण माझ्या बोलण्यावर तर तिचा विश्वासच बसला नसता. तिची एव्हाना पूर्णपणे खात्रीच झाली होती की माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. काखेतल्या तोंडाने गादी खाल्ली हे सत्य तिला पटणारं नव्हतं. तेव्हा काहीच बोलण्यात अर्थ नव्हता. म्हणून मग घरातून बाहेर पडणच मला योग्य वाटलं.

मी थेट समुद्र किनारा गाठला. एकटाच येऊन तेथील एका दगडावर बसलो. शांत, निवांत, सुन्न. शरीरापासून हात लांब धरल्याने हाताला थोड्याच वेळात रग लागली आणि न रहाऊन महत्प्रयासाने मी हात नॉर्मल स्थितीत आणला. पण तत्क्षणी काखेने माझ्या दंडाच्या आतल्या बाजूकडील मांसल भागाचा लचकाच तोडला. मी वेदनेने विव्हळलो. हातातून भळाभळा रक्त वाहू लागले. वेदनेच्या तीव्र कळा मस्तकाशी जाऊन भिडल्या. डॉक्टरकडे जायचा विचार धुडकावून देत मी पळत घर गाठले. निदान आतातरी हिचा माझ्यावर विश्वास बसेल. या एका वेड्या आशेने ती दुखरी जखम आणि वाहणारं रक्त घेऊन धापा टाकत मी घरात शिरलो. मला पाहताच तिचा चेहरा काळजीने व्याकुळ झाला. चेहऱ्यावर एकामागोमाग एक प्रश्न उमटले. म्हणजे अजूनही हिला माझी काळजी होती तर..? माझ्यावर प्रेम होते ह्या जाणिवेने थोडे समाधान वाटले. मी तिला ती काखेतून वाहणारी जखम दाखवू लागलो. माझीच काख मला खरोखरीच चावली होती. ऐकायला थोडं अजब वाटलं तरी हेच सत्य होतं. आधी फक्त शर्टाचे तुकडे खाऊन तीचं पोट भरायचं बहुतेक. मग संधी मिळताच तिने गादीचा कापूस खाऊन आपली वाढती भूक शमवली असावी आणि आता तर कहरच..! तिला रक्ताची चटक लागली. माझ्या हाताचा लचकाच तोडलाय तिने. किती रक्त वहातंय त्यातून. मी बोलत होतो सारं हिला सांगत होतो. पण तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं, सांत्वनेचं चिन्हच दिसेना. ती तशीच पुतळी सारखी स्तब्ध उभी राहून माझ्याकडे पहात होती. आता मात्र माझं डोकं जाम भडकलं. मी तावातावाने तिला म्हणालो, "अगं..! बाई आहेस का कोण ? माझी बायको म्हणवतेस स्वतःला. एवढं रक्त बघून सुद्धा तुझं समाधान नाही झालं? आता माझ्या बोलण्यातली सत्यता तुला कशी पटवून देऊ? वाहणाऱ्या जखमेवर पट्टी बांधायची सोडून तू अशी माझ्याकडे पहात काय उभी आहेस?"

तरी देखील ती जागेवरून हलली नाही. तिला तशीच उभी राहिलेलं पाहून माझा रागावरचा संयम सुटला. मी नाही नाही ते तिला बोलतच गेलो. ती डोळे विस्फारून माझ्याकडे पहात होती. माझ्या बोलण्याकडे तिचं मुळात लक्षच नसावं. तिच्या जवळ जात मी तिचे खांदे धरून गदागदा हलवलं, तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. पण माझा स्पर्श होताच वीचेचा करंट सर्वांगाचा थरार करीत जावा तशी ती एकदम स्वतःला माझ्यापासून दूर नेत ओरडलीच, "तुम्हाला वेड लागलंय, डोकं फिरलंय तुमचं, तुम्ही वेडे झाले अहात. स्वतःचे भास इतरांना पटवून देण्यासाठी तुम्ही हा असा मार्ग अवलंबाल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आता तरी भानावर या. काय केलंत हे तुम्ही? जरा नीट विचार करा. काखेत कधी कुणाला तोंड फुटत का? हा तुमचा भ्रम आहे. या तुमच्या भ्रमावर इतरांनी विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही आज स्वतःच्या हातालाच ईजा करून घेतलीत. तुमची काख नाही, तुम्हीच तुमच्या जीवावर उठला अहात. तुम्हाला आता यातून कुणीच बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच या भ्रमाच्या अंधारातून बाहेर यावं लागेल."

तिचे हे शब्द कानात लाव्ह्यासारखे गेले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिच्याबद्दलचा संशय आता माझ्या मनात पक्का झाला. मी चवताळून तिला म्हणालो,"तू मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न का करतेयस ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? त्या मानसोपचार तज्ञाकडे नेऊन मला मनोरुग्ण म्हणून सिद्ध करायचंय ना तुला? सगळेजण तुला सामील आहेत माझ्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे. मला वेड्यांच्या हॉस्पिटलात पाठवून तू ईथे त्या डॉक्टरसोबत मजा मारण्याच्या विचारात असशील तर विसरून जा. मी हे कधीच होऊ देणार नाही. बघून घेईन एकेकाला. त्या डॉक्टरचं आणि तुझं काय चाललंय ते मला माहित नाही असं वाटतंय काय तुला? मी काही वेडा नाही समजलीस ? तुम्ही सगळे वेडे आहात वेडे..."

बराच वेळ मी असंच काहीसं बरळत होतो. जेव्हा कधीतरी थकून गप्प झालो तेव्हा कळालं कि ती मला सोडून निघून गेली होती. मी तिच्या मनाला लागेल असं तर काही बोललो नाही ना? अरे..! हाट..! जा लागलं तर लागलं मनाला मला वेडा म्हणाली ती. तेव्हा माझ्या मनाचा विचार केला का तिने? 'म्हणे तुम्ही वेडे अहात...' मी वेडा...? नाही, मी वेडा नाही...मी वेडा नाही...

हातातून वाहणारं रक्त माझ्या शर्टावर केव्हाच सुकून अंगाला चिकटून गेले होते. जखमेकडे देखील माझं लक्ष नव्हतं. त्या जखमेतून होणाऱ्या वेदनेपलिकडे आता माझं विश्व होतं. एकट्याचं...!

समाधिस्त गाढ निद्रेनंतर जाग यावी तसंच काहीसं मला जाणवत होतं. मिटलेल्या पापण्यांखाली काळोखात झगमगाटी डोळे दिपवून टाकणारा लख्ख प्रकाश उजळावा तसा उन्हाचा कवडसा थेट माझ्या डोळ्यावर पडला. मी जागा झालो. तशीच सर्वत्र नजर फिरवली. पण भोवतालचा परिसर अनोळखी होता. परिचयाचा नक्कीच नव्हता. माझं घर तर नाहीच, ऑफिस सुद्धा नव्हतं ते. कसाबसा उठून जड डोळ्यांनी पाहिलं. खोलीत एक पलंग आणि मीच. लोखंडी दरवाज्याला गज असलेली एक छोटीशी खिडकी. भिंतींना मऊ गादया लावलेल्या. शांत, हळुवार संगीताची धून, हवेवर लयदार हेलकावे घेत कानातून आत अंतर्मनात शिरत होती. या अशा स्वर्गीय शांततेला तडा जाणारी आर्त किंकाळी आसमंतात घुमली. मनाचा थरकाप उडवणारी. बाहेरच्या बाजूस असलेल्या छोटयाशा खिडकीच्या आडोशाला आसरा शोधणारी पाखरं देखील त्या कर्कश आवाजाने उडून गेली. पाठोपाठ असंबद्ध बडबडीने वातावरण गजबजले. मी सारी शक्ती एकवटून खोलीतल्या त्या लोखंडी गजाच्या खिडकी पाशी गेलो. बाहेरील दृश्य विदारक होते. एका विस्कटलेल्या स्त्रीला चार-पाचजणांनी पकडून ठेवले होते. ती विचित्र हसत होती, रडत होती, गयावया करत होती. एका पांढऱ्या कोटातल्या लेडी डॉक्टरने तिला इंजेक्शन दिलं आणि तत्क्षणी ती शांत झाली. माझ्या समोरच्या खिडकीतून देखील असाच कोणीतरी डोकावून हरवलेल्या नजरेने हे सारे पहात होता. मला कळून चुकलं, मी वेड्यांच्या इस्पितळात आहे. मी ईथे कसा आलो? कुणी आणलं मला ईथे? कसं शक्य आहे हे? विचारांचे काहूर माजले. त्या सरशी मी दरवाज्यापास्न लांब झालो. सुन्न मनाने..!

एवढ्यात वॉर्डबॉयने दरवाजा उघडला. एक नर्स आत आली. माझा रक्तदाब तपासण्यासाठी. ती माझ्याशी खूप छान बोलत होती. माझा उजवा हात मी सवयीप्रमाणे उंच धरला होता. जवळ घेतला तर पुन्हा ते तोंड मला चावेल. पाहिले तर त्यावर पट्टी बांधली होती. नर्सने माझ्या हाताला झालेल्या जखमे बद्दल विचारताच मी तिला काखेची सारी कहाणी ऐकवली. विशेष म्हणजे तिला काखेचा तो रहस्यमय प्रकार पटला. मी लगेच वेळ न दवडता शर्ट काढून तिला ते दाखवले आणि आश्चर्य म्हणजे तिला ते तोंड, ते दात दिसले. ती आपुलकीने म्हणाली,"हे पहा ! तुम्ही काहीही काळजी करू नका. ते जसं आपोआप उगवलं तसंच ते आपोआप जाईल. होतं असं एखाद्याला. म्हणूनच ईलाजासाठी तुम्हाला इथे आणलं आहे आम्ही. ईथे येणारे सगळेच काही वेडे नसतात. काहीजण तुमच्या सारखेही असतात."

तिच्या बोलण्याने अंगात हिम्मत आली, धीर वाटला. जणू साऱ्या देहात नवचैतन्य संचारलं. माझं बोलणं आज कुणाला का होईना पटलं होतं. म्हणजे हा काही माझा भ्रम नव्हता. पाहिलंत ना तुम्ही..?

मी काही वेडा नाही. हे सत्य आहे. माझ्या काखेत तोंड आहे. पण आता या काखेला मी सोडणार नाही. हिचा मी पूर्णपणे काटा काढणार. हिच्यामुळे माझं आयुष्य उध्वस्त झालं. आता एकतर ती किंवा मी. असं म्हणत मी माझ्या डाव्या हाताने उजव्या काखेवर ठोसे लगावण्यास सुरुवात केली. त्या नर्सला कदाचित हा प्रसंग विचित्र वाटला असावा. ती डॉक्टरांच्या नावाने हाका मारत पळून गेली. वॉर्डबॉय ने दरवाजा बंद केला. माझं कोणाकडेही लक्ष नव्हतं. मी काखेवर ठोसे मारतच होतो. पण क्षणात ठोसे लगावण्यासाठी पुढे झालेला माझा डावा हात माझ्या काखेने तोंडात आपल्या तीक्ष्ण दातांनी पकडला. तिचे दात माझ्या हातात रुतत गेले तसा मी वेदनेने विव्हळलो. हतबल झालो. मी माझा डावा हात तिच्या तावडीतून सोडू शकत नव्हतो. या संधीचा फायदा घेत माझा संपूर्ण हात जबड्यात घट्ट पकडत काखेने चावायला सुरुवात केली. रक्ताच्या धारा चहूकडे उडू लागल्या. रक्ताचे लाल भडक कारंजेच म्हणावे असे. डाव्या हातासोबत माझे संपूर्ण शरीरच काखेमध्ये ओढले जाऊ लागले. बरगड्या तटतटू लागल्या, आणि काखेच्या तोंडात चघळल्या जाऊ लागल्या. हाडे पीळवटत गेली. रक्ताचा सडा खोलीभर पसरला. काखेतल्या तोंडाची ताकद वाढत गेली. ते तोंड विक्राळ झाले. त्या धारदार दातांत माझ्या शरीराचा लगदा तयार होऊ लागला. मी आता मी उरलोच नाही मी काखेत विलिन झालो. अखेर माझा अंत झाला. तिने, माझ्या काखेनेच मला गिळले....'

"एक्सट्रीमली सूपर्ब, फँटॅस्टिक !" मी जवळपास ओरडलोच. 'काख' कादंबरीचे ते मॅन्युस्क्रिप्ट वाचून संपले. मी ते मिटून ठेवले. भानावर आलो तेव्हा दरदरून घाम फुटला होता. मंजू आतल्या बेडरूम मध्ये एव्हाना मध्यरात्रीच्या धुंदीत होती, नशीब माझा आवाज तिच्या कानापर्यंत गेला नाही. हि कादंबरी मीच छापणार. हंगामा होणार. अखेर नवीन एक्सायटिंग असं काहीतरी जे मी शोधत होतो ते मला मिळालं. वाचता-वाचता वेळेचं भानच राहिलं नव्हतं. घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते. मंजू निद्रादेवीच्या साधनेत ध्यानस्थ झाली होती. मी तसाच उठलो. फ्रिजमधले थंडगार पाणी प्यायलो. सिगारेट शिलगावली. धुराचे लोट काळोखात विरले. खरोखरीच अप्रतिम कादंबरी आहे. लेखकाने काय भन्नाट कल्पना केली आहे. त्याला हि कशी सुचली असावी ? खरंच ही कल्पना आहे की सत्य? विचार येताच मी मनातून थोडा चरकलोच. मी 'काख' छापण्याचे मनोमनी ठरवून टाकले. कादंबरीचा लेखक प्रकाशन सोहळ्याला तर नक्कीच येईल. साऱ्या माध्यमांचा वापर करू नोव्हेल लॉन्च च्या जाहिरातीसाठी. तो जिथे कुठे असेल तिथून नक्कीच येईल. एवढ्यात खांद्यावर हात पडला नि मी एकदम दचकलोच. मंजू होती. तिला पहाताच मी सिगारेट अॅशट्रेत चुरगळली.

"एवढं काय होतं त्या कथानकात? मी काहीच बोलत नाही म्हणून किती वेळ वाचन करावं? चला झोपा बघू आता." मंजुच्या स्वरात माझ्या बद्दलची काळजी आणि प्रेम दाटून आलं होतं. मी तिचा हात हातात घेतला,"मंजू तुही वाच. छानच आहे आवडेल तुला. अगं..! रहस्य फक्त वातावरणात नसतात. तर ती आपल्याच शरीराच्या कुठल्या ना कुठल्या अवयवात दडलेली असतात. गूढ शोधायचेच असेल तर ते आधी स्वतःच्या शरीरातच शोधले पाहिजे. बरीच रहस्य सापडतील..."

पण माझ्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते. तिच्या डोळ्यांवर झोपेची धुंदी होती. माझे बोलणे तिने मधेच तोडले,"झोपेत देखील बरीच रहस्य दडलेली आहेत. पण ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी झोपलं पाहिजे. चला बघू आता झोपायला."

.........टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण हॉल दणाणून गेला. मोठमोठ्या लेखकांची, राजकीय, सिने क्षेत्रातल्या मान्यवरांची भाषणे चालली होती. 'काख'-कादंबरीचा प्रकाशन सोहळा अगदी रंगात आला. टीव्ही वाहिन्या न्यूज कव्हरेज मध्ये गुंग होत्या. शहरात मोठमोठे बॅनर्स आणि जाहिराती देखील चालू होत्याच. त्याला एव्हाना हि बातमी समजली असणारच. त्यामुळे माझे डोळे एकसारखे त्यालाच शोधत होते. 'काख' चा लेखक. कसा दिसत असेल तो? का नसेल आला? आला असेल तरी या गर्दीत त्याला कसा ओळखायचा? याच विचारांत मी माईकवर काय भाषण ठोकले ईश्वर जाणो.

मी चहूकडे नजर फिरवत होतो. अपरिचित असा कोणताच चेहरा दिसत नव्हता. संशयास्पद अशी कुणाचीच नजर दिसत नव्हती. हि कादंबरी लिहिणारा तो लेखक अखेर होता तरी कोण? हाच प्रश्न एकसारखा मला भेडसावत होता. एवढ्यात माझ्या उजव्या खांद्याला पुन्हा रग लागल्याने मी तसाच खुर्चीत बसलो आणि थोड्याच वेळात मला जाणवले माझा शर्ट उजव्या काखेत ओढला जातोय.....

हे सारं जाणिवेच्या पलीकडचं होतं....

मी हादरलो. किंचाळावेसे वाटले....

भयंकर घाबरलो. काहीच सुचेनासे झाले....

मी काखेतून शर्ट पटकन बाहेर ओढला.....

पण, तो पुन्हा काखेतच शिरत जात असल्याचे मला जाणवले. आणि हा काही भास नव्हता....

***

Rate & Review

Mayuresh Ingle

Mayuresh Ingle 1 year ago

Surekha

Surekha 1 year ago

From Turkey

From Turkey 2 years ago

Varsha Gangurde Jadhav
Paurnima

Paurnima 2 years ago